Anna Hajare News : कृषी कायद्यांविरोधातील अण्णा हजारे यांचे आंदोलन स्थगित

एमपीसीन्यूज : शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा 50 टक्के जास्त हमीभाव द्यावा तसेच स्वामीनाथन आयोगाला स्वायत्तता द्यावी, या मागण्यांसाठी उद्यापासून ( शनिवारी) सुरु करण्यात येणारे आंदोलन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज स्थगित केले. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी व राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांच्याशी केलेल्या यशस्वी चर्चेनंतर संयुक्त पत्रकारपरिषदेत हजारे यांनी आंदोलन स्थगित केल्याची माहिती दिली.

शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा 50 टक्के जास्त हमीभाव द्यावा तसेच स्वामीनाथन आयोगाला स्वायत्तता द्यावी, या मागण्यांसाठी अण्णा हजारे यांनी शनिवारपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

त्यानंतर मोदी सरकार आणि भाजपच्यावतीने त्यांच्या मानधरणीचे प्रयत्न सुरु होते. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई यशस्वी ठरली. केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनांवर आपण समाधानी असल्याचे सांगत अण्णा हजारे यांनी आपले आंदोलन स्थगित केले.

अण्णा हजारे यांनी केलेल्या मागणीनुसार सरकारकडून एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली असून या समितीत अण्णा हजारे यांना निमंत्रित सदस्य म्हणून विशेष स्थान दिले जाणार आहे.

येत्या सहा महिन्यांमध्ये ही समिती निर्णय घेऊन प्रत्यक्ष कार्यवाही करणार आहे.

त्याचबरोबर लोकपाल, लोकायुक्त तसेच निवडणुक पद्धतींमध्ये अण्णा हजारे यांनी सुचवलेल्या सुधारणा आणि केलेल्या मागण्यांवरही चर्चा करण्यात आली.

या मागण्याही लवकरच मार्गी लावण्यात येणार आहेत. त्यासाठी अण्णा हजारे यांना दिल्ली येथे बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.