सोमवार, डिसेंबर 5, 2022

Nigdi News : अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा – महेश लांडगे

एमपीसी न्यूज – लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य क्षेत्रातील कार्य अद्वितीय असून भारत सरकारने त्यांच्या कार्याची दखल घ्यावी आणि अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च पुरस्कार मिळावा यासाठी प्रयत्नशील आहोत, असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

पिंपरी- चिंचवड महापालिकेच्यावतीने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाचा समारोपाचा दिवस काल विविध कार्यक्रमांनी पार पडला. त्यादरम्यान मान्यवरांचा सत्कार आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संजय ससाणे, सहाय्यक आयुक्त राजेश आगळे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, माजी नगरसदस्य शांताराम बापू भालेकर, किसन नेटके,बिभीषण चौधरी, माजी नगरसदस्या अनुराधा गोरखे, सुलक्षणा धर, जनता संपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक तसेच दशरथ सकट, मयूर जाधव, नितीन घोलप,अरुण जोगदंड, संदीप जाधव, मनोज तोरडमल, दत्तू चव्हाण, सुनील भिसे, गणेश साठे, शिवाजी साळवे, भाऊसाहेब अडागळे, संदिपान झोंबाडे, नितीन घोलप, सतीश भवाळ, अनिल सौंदडे, सविता आव्हाड, ज्योती वैरागर, केशरबाई लांडगे आदी उपस्थित होते.

या समारोप कार्यक्रमास विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे यांनी देखील भेट दिली. आमदार खापरे म्हणाल्या नागरिकांनी,विद्यार्थ्यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा, कार्याचा अभ्यास करून आपली शैक्षणिक पात्रता वाढविणे गरजेचे आहे असे सांगून कार्यक्रमास उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समितीच्या वतीने विविध पुरस्काराचे वितरण आमदार खापरे यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यामध्ये आसाराम कसबे (कला रत्ना पुरस्कार)  तानाजीराव बळवंत देशमुख,श्रेयस अशोक कुमार पगरिया (समाज मित्र पुरस्कार) सचिन परशुराम नागणे,प्रवीण जाधव (समाज मित्र पुरस्कार),विजय कुमार धुमाळ- सहायक पोलिस निरीक्षक (समाज मित्र पिरस्कार), रमेश (तात्या)गालफाडे (समाज सेवक) यांचा समावेश आहे.

समारोप कार्यक्रमाला पारंपरिक सनईवादनाने सुरुवात झाली. त्यानंतर मुकुंद वेदपाठक यांनी “ गाथा लोकशाहीराची” हा संगीतमय कार्यक्रम सादर केला. त्यामध्ये झी २४ तास वाहिरीवरील स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील पार्श्वगायक संदीप उबाळे यांनी सादर केलेल्या पार्श्वगीताने उपस्थितांची वाहवा मिळवली. त्यानंतर ख्यातनाम गायक राहुल शिंदे यांचा प्रबोधन कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर वेद शिक्षणाचा आणि गरज रोजगाराची या विषयावर परिसंवाद पार पडला. त्यामध्ये प्राध्यापक डॉ. बबन जोगदंड, डॉ. किशोर खिलारे डॉ. यशवंत इंगळे, संतोष कसबे यांनी सहभाग घेतला आणि शिक्षणाचे महत्व सांगून रोजगारासाठी शिक्षणाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. परिसंवादाचे प्रास्ताविक संदिपान झोंबाडे यांनी, सूत्रसंचालन दशरथ सकट यांनी तर परिसंवादाच्या व्यक्तींचे आभार शिवाजी साळवे यांनी मानले.

त्यानंतर ख्यातनाम गायक विष्णु शिंदे यांचा प्रबोधनात्मक गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर स्वाती महाडिक यांचा गण गवळण लावणी बतावणी चा कार्यक्रम झाला आणि कार्यक्रमाची सांगता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित विजय उलपे यांच्या संगीतमय कार्यक्रमाने झाली. आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते जनता संपर्क विभागातील प्रफुल पुराणिक यांचा नियोजनाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पौर्णिमा भोर, भानुदास साळवे यांनी केले तर आभार संजय ससाणे यांनी मानले.

Latest news
Related news