BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : अण्णासाहेब मगर बँक; काल अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड अन्‌ आज तीन संचालकांचे तडकाफडकी राजीनामे 

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – भोसरीतील अण्णासाहेब मगर सहकारी बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्षांची काल निवड करण्यात आली. तर, आज बँकेतील कारभार, आर्थिक परिस्थिती, कर्जवाटप, त्याच्या वसुलीत होत असलेला हस्तक्षेप आणि दिरंगाई याच्याशी असहमती दर्शवत विद्यमान वरिष्ठ तीन संचालकांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. या राजीमान्याची जोरदार चर्चा सहकार क्षेत्रात सुरु झाली आहे.

अण्णासाहेब मगर सहकारी बँकेत कर्जवाटप, आर्थिक व्यवहारामध्ये रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बँकेचे तत्कालीन अध्यक्ष नंदकुमार लांडे यांनी अध्यक्ष व संचालकपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या बँकेच्या अध्यक्षपदी राजेश सस्ते व उपाध्यक्षपदी मनोज बोरसे यांची काल जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बँकेच्या सभेत निवड करण्यात आली होती.

त्यानंतर आज लगेच सद्यस्थितीत बँकेत चालू असलेला कारभार, आर्थिक परिस्थिती, कर्जवाटप व  त्याच्या वसुलीत होत असलेला हस्तक्षेप आणि जाणुबूजून होत असलेली दिरंगाई याच्याशी असहमत असल्याने बँकेचे माजी उपाध्यक्ष, ज्येष्ठ संचालक विठ्ठल पांडुरंग सांडभोर, सुलोचना रामेश्वर भोवरे आणि सविता दिलीप मोहरुत या तिघांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक, पुण्याचे जिल्हा उपनिबंधक व निवडणूक निर्णय अधिकारी, सहकार आयुक्त व सचिव यांना राजीनाम्याची प्रत पाठविली आहे.

उर्वरित संचालक मंडळ आमचे राजीनामे मंजूर करण्यास दिरंगाई करण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँकेला आपल्या अधिकारात हे राजीनामे त्वरित मंजूर करुन आमच्या जागा रिक्त झाल्याचे कळविण्याची विनंती तिघांनीही सहकार आयुक्त, उपनिबंधक व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे.

HB_POST_END_FTR-A2

.