Pavana Sahakari Bank : पवना सहकारी बँकेवर अण्णासाहेब मगर सहकार पॅनलची एकहाती सत्ता

पॅनेलचे 17 उमेदवार विजयी, दोघांची यापूर्वीच बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज – पवना सहकारी बँकेवर अण्णासाहेब मगर सहकार पॅनलची (Pavana Sahakari Bank) एकहाती सत्ता आली आहे. पॅनेलचे सर्वाच्या सर्व 17 उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. तर, 2 उमेदवारांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली होती. भागधारक, खातेधारक, सभासदांनी पुन्हा एकदा माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून बँक त्यांच्या ताब्यात दिली. विजयानंतर समर्थकांनी मोठा जल्लोष केला. दरम्यान, निवडणूक लादणाऱ्या पवना प्रगती पॅनलच्या सातही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले असून सभासदांनी त्यांना सपशेल नाकारले आहे.

पवना सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 2023 ते 2028 या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सर्वसाधरण गटातील 14 पुरुष, सर्वधारण गटातील 2 महिला आणि अनुसूचित जाती-जमातील गटातील 1 अशा 17 जागांसाठी मतदान झाले. माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांच्या नेतृत्वाखाली अण्णासाहेब मगर सहकार पॅनल आणि पवना प्रगती असे दोन पॅनेल निवडणूक रिंगणात होते. सोमवारी मतमोजणी पार पडली.

पहिल्या फेरीपासून अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचे सर्व उमेदवार आघाडीवर होते. पॅनेलचे 17 ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. पॅनेल प्रमुख ज्ञानेश्वर लांडगे यांना सर्वाधिक मते मिळाली. तर, पॅनेलमधील इतर मागासवर्गीय गटातून वसंत लोंढे आणि भटक्या विमुक्त जाती गटातून संभाजी दौडकर यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली.

निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शीतल पाटील यांनी विजयी उमेदवार घोषित केले. पॅनेलचा एकतर्फी विजय होताच सर्वांनी मोठा जल्लोष केला.

अण्णासाहेब मगर सहकार पॅनलच्या प्रचाराची धुरा माजी महापौर संजोग वाघेरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष ऍड. नितीन लांडगे यांनी यशस्वीपणे सांभाळली. प्रचाराचे उत्तम नियोजन करून सर्व सभासदांपर्यंत पोहोचले. त्याचा निवडणुकीत मोठा फायदा झाला. पॅनेलमधील सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.

पवना सहकारी बँक ही शहरातील सर्वांत जुनी बँक आहे. या बँकेची स्थापना शहराचे भाग्यविधाते दिवंगत अण्णासाहेब मगर यांनी केलेली आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात बँकेला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. माजी आमदार ज्ञानेश्‍वर लांडगे यांनी सर्वांना बरोबर घेऊन बँकेची यशस्वीपणे वाटचाल सुरु ठेवली. सर्वांना सोबत घेवून बँकेच्या प्रगतीचा आलेख कायम उंचावत ठेवला. सभासदांनी पुन्हा ज्ञानेश्वर लांडगे यांच्यावर विश्वास ठेवला. त्यांच्या पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी (Pavana Sahakari Bank) झाले.

पॅनेल प्रमुख ज्ञानेश्वर लांडगे म्हणाले, सर्वांना सोबत घेवून बँकेच्या प्रगतीसाठी यापुढेही एकोप्याने काम केले जाईल. निवडणूक संपली आता राजकारण संपले. सर्वजण एकत्रित बँकेच्या हितासाठी काम करतील. बँकेचे कार्यक्षेत्र आणि कार्यकक्षा विस्तारीकरणासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील राहील. पवना बँकेला ‘शेड्युल बँके’चा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.

Pimpri : महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उद्यापासून पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्व

अण्णासाहेब मगर सहकार पॅनलमधील विजयी उमेदवार आणि मिळालेली मते –

सर्वसाधारण गट-

लांडगे ज्ञानेश्वर पांडुरंग – 3155
काळभोर विठ्ठल सोमजी – 3108
गराडे शांताराम दगडू – 2885
काटे जयनाथ नारायण – 3024
गावडे अमित राजेंद्र – 3093
फुगे शामराव हिरामण – 2994
वाघेरे शिवाजी हरिभाऊ – 3048
काळभोर शरद दिगंबर – 3077
लांडगे जितेंद्र मुरलीधर – 2985
चिंचवडे सचिन बाजीराव – 3031
काळभोर सचिन ज्ञानेश्वर – 3053
गावडे चेतन बाळासाहेब – 3050
गव्हाणे सुनील शंकर – 3049
नाणेकर बिपीन निवृत्ती – 3013

महिला राखीव गट-

गावडे जयश्री वसंत – 2957
काळभोर ऊर्मिला तुळशीराम – 3011

अनुसूचित जाती / जमाती गट-

डोळस दादू लक्ष्मण – 3074

तर, पॅनेलमधील इतर मागासवर्गीय गटातून वसंत लोंढे आणि भटक्या विमुक्त जाती गटातून संभाजी दौडकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.