Pune News: पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतून लष्करातील आणखी एक अधिकारी जाळ्यात

एमपीसी न्यूज : लष्कर भरती प्रक्रियेतील पेपर फुटी प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे दिल्ली कनेक्शन असल्याचे बोलले जात आहे. पथकाने दिल्लीत छापे टाकून लष्करातील आणखी एका अधिकार्‍याला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  ताब्यात घेतलेल्या अधिकार्‍याचे नाव तपास यंत्रणांनी गुप्त ठेवले आहे. पुणे पोलिस व लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेने ही संयुक्त कारवाई केली आहे.

पुणे पोलिसांनी दोन दिवसापूर्वीच तमिळनाडू येथून मेजर रँकचा लष्करी अधिकारी थिरू मुरुगन थंगवेलू (वय 47, रा. निलगिरी, तमिळनाडू) याला अटक केली आहे. आता दुसर्‍या लष्करी अधिकार्‍याला अटक केल्यामुळे खळबळ उडाली आहे. मुरुगन याने  त्याच्याकडील व्हॉट्सपवरून भरती प्रक्रियेची प्रश्नपत्रिका पुण्यात पाठविल्याचा धक्कादायक प्रकार तपासामध्ये समोर आला आहे. सध्या मुरूगन पोलिसांच्या कोठडीत आहे.

प्रकरणात यापूर्वी किशोर महादेव गिरी (वय 40 रा. माळेगाव, बारामती), माधव शेषराव गित्ते (वय 38, रा. सॅपर्स विहार कॉलनी), गोपाळ युवराज कोळी (वय 31, रा. बीईजी सेंटर, खडकी, दिघी), उदय दत्तू आवटी (वय 23 रा. बीईजी, खडकी), अली अख्तरखान (वय 47), आजादलाल महमद खान (वय 38, दोघेही रा. गणेशनगर, बोपखेल, मूळ रा. गाझीपूर, उत्तर प्रदेश), महेंद्र चंद्रभान सोनवणे (वय 37, रा. गायकवाडनगर, दिघी) यांच्यासह सेवानिवृत्त अधिकारी भारत लक्ष्मण अडकमोळ (वय 37, रा. पाचोरा, ता. पाचोरा, जि. पुणे मूळ रा. ता. भडगाव, नगरदेवळा, जळगाव) याला अटक करण्यात आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.