Pune News : पुण्यात मंगलदास बांदल विरोधात आणखी एक गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष तथा पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्याविरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगलदास बांदल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चार चाकी गाडी मध्ये डांबून ठेवत रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जमिनीचे गहाणखत करून तब्बल 6 कोटी 75 लाख रुपये परस्पर काढून घेतल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.

मंगलदास बांदल यांच्यासह संदीप भोंडवे, विकास भोंडवे, सचिन पलांडे आणि शिवाजीराव भोसले बँकेतील एक अधिकारी यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गंगाराम सावळा मासाळकर (वय 74) यांनी फिर्याद दिली आहे. 2013 पासून वेळोवेळी हा प्रकार घडत होता.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी गंगाराम मासाळकर यांचे हवेली तालुक्यात जमीन आहे. वरील आरोपींनी आपसात संगणमत करून फिर्यादीला चार चाकी गाडी मध्ये डांबून ठेवले. तसेच रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जबरदस्तीने त्यांच्या जमिनीचे गहाणखत करून सहा कोटी 75 लाख रुपये परस्पर काढून घेतले. तसेच जमिनीवरील बोजा कमी करण्यासाठी त्यांच्याकडे एक कोटी रुपयांची मागणी केली.

दरम्यान मंगलदास बांदल याचे राजकीय लागेबांधे असल्याने त्याच्या विरोधात तक्रार दिल्यास फिर्यादीच्या कुटुंबांना त्रास होईल म्हणून त्यांनी आजवर तक्रार दिली नव्हती. परंतु आजपर्यंत फिर्यादीच्या जमिनीवरील बोजा कमी केला नाही म्हणून त्यांनी अखेर तक्रार दिली. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.