New Turn In Sushant Case: सुशांतच्या मृत्यूप्रकरणी आणखी एक ट्विस्ट

Another twist on Sushant singh rajput suicide case ओ.पी. सिंह यांनी सुशांतला त्यांच्या पत्नीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता.

एमपीसी न्यूज – अभिनेता सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या हा आता राष्ट्रीय पातळीवरील प्रश्न झाला असून दररोज त्यात नवनवीन ट्विस्ट आणि टर्न येत आहेत. सुमारे दीड महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटल्यावर त्यातील गुंता अधिकच वाढत चालला आहे. कधी त्यात पोलिसांच्या भूमिकेवर संशय घेतला जातो, तर कधी मैत्रीण रियाच कशी खलनायिका आहे हे ध्यानात येते. सध्या याची तपासणी मुंबई व बिहार पोलीस सखोलपणे आणि स्वतंत्रपणे करत आहेत. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

आता या प्रकरणात सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी याने देखील उडी घेतली आहे. त्याने सुशांतच्या मोठ्या बहिणीचे पती ओ.पी. सिंह यांच्या एका व्हॉट्सअॅप मेसेजचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. या मेसेजमार्फत केलेल्या दाव्यानुसार, ओ.पी. सिंह यांनी सुशांतला त्यांच्या पत्नीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता.

‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार ओ.पी. सिंह सुशांतशी संपर्क साधण्यासाठी सिद्धार्थ पिठाणीची मदत घ्यायचे. हा दावा सिद्ध करण्यासाठी सिद्धार्थने एक व्हॉट्सअॅप मेसेज शेअर केला आहे.

हा मेसेज ओ.पी. सिंह यांनी सुशांतसाठी सिद्धार्थच्या फोनवर पाठवला होता. ‘मी चंदीगढला पोहोचलो आहे. मुंबईत येण्याचं आमंत्रण दिल्याबद्दल धन्यवाद. त्यामुळे मला माझ्या जुन्या मित्रांना भेटण्याची संधी मिळाली. मला आनंद आहे की तू तुझ्या करिअरचे निर्णय स्वत: घेत नाही.

मी योग्य अंदाज लावला आणि माझ्या प्रवासाचं नियोजन आखलं. कृपया माझ्या पत्नीला तुझ्या समस्यांपासून दूर ठेव. तुझी संगत, वाईट सवयी आणि मिस मॅनेजमेंटचा तिला त्रास होईल. मला खात्री करुन घ्यायची आहे की माझ्या पत्नीला त्रास होणार नाही, कारण ती खूप चांगली आहे’, अशा आशयाचा हा मेसेज आहे.

या मेसेजचे स्क्रिनशॉट सिद्धार्थने मुंबई पोलिसांकडे देखील सुपूर्त केले आहेत. सुशांतचे कुटुंबीय त्याच्या सवयींमुळे नाराज होते, असाही दावा त्याने केला आहे. या मेसेजचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावरदेखील व्हायरल होत आहेत. या व्हायरल होणाऱ्या मेसेजमुळे सुशांत मृत्यू प्रकरणाला आता वेगळी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.