Bhosari : जीवघेण्या मांजाची आणखी एक शिकार

एमपीसी न्यूज – पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा मांजा अतिशय घातक आणि जीवघेणा आहे. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. या मांजाच्या विळख्यातून पशु पक्षीसुद्धा सुटत नाहीत. पिंपरी-चिंचवड शहरात अनेक पक्षी मांजामध्ये अडकले, त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवनदान दिले. हा मांजाचा विळखा कमी होत नाही. नुकताच दुचाकीवरून जात असलेल्या तरुणीच्या गळ्याभोवती मांजा गुंडाळला गेल्याने तिचा मृत्यू झाला. यामुळे शहरात मांजाची अदृश्य दहशत वाहन चालकांमध्ये पसरली आहे.

डॉ. कृपाली निकम (वय 26, रा. पिंपळे सौदागर. मूळ रा. चाळीसगाव, जळगाव), असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. ही घटना रविवारी (दि. 7) सायंकाळी सातच्या सुमारास पुणे भोसरी मार्गावर कासारवाडी येथे असलेल्या जे आर डी टाटा उड्डाणपुलावर घडली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. कृपाली पिंपळे सौदागर येथील ओएनपी रुग्णालयात नोकरी करीत होत्या. त्यांना एक लहान भाऊ असून तो आकुर्डी येथे शिक्षण घेत आहे. त्या मूळच्या जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील आहेत. शिक्षण आणि नोकरीनिमित्त त्यांचे कुटुंब पुण्यात आले होते. रविवारी दुपारी त्यांची मैत्रीण त्यांच्या घरी आली होती. घरचा संपूर्ण पाहुणचार झाल्यानंतर मैत्रिणीला सोडण्यासाठी डॉ. कृपाली अॅक्टिवा दुचाकीवरून पुणे रेल्वे स्थानकावर गेल्या. पुणे रेल्वे स्थानकावरून भोसरीच्या दिशेने जात होत्या. दरम्यान कासारवाडी येथील जे आर डी टाटा उड्डाणपुलावर आल्या असता त्यांच्या गळ्याला मांजा अडकला. गाडीचा वेग थोडा जास्त होता.

अचानक गळ्याला अडकलेल्या मांजामुळे त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्या खाली पडल्या. पण तोपर्यंत मांजाने त्यांच्या गळ्याला कापले होते. ही जखम मोठी होती. त्यामुळे रक्तस्त्राव देखील खूप झाला. त्यांना तात्काळ उपचारासाठी भोसरी येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. उडडाणपुलाच्या आसपासच्या परिसरातून हा मांजा उडत येऊन उड्डाणपुलावरील खांबाला अडकला. त्यानंतर तो वाऱ्याच्या झुळकीने उडून रस्त्याने जाणा-या तरुणीच्या गळ्याला गुंडाळला गेला, असल्याचेही गाडे यांनी सांगितले.

पतंग उडवण्यासाठी चिनी नायलॉन मांजाचा वापर वाढला असून हा मांजा जीवघेणा ठरु लागला आहे. नायलॉन मांजा पशुपक्ष्यांसह मानवी जीवनाला घातक ठरत असल्यामुळे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) तसेच सर्वोच्च न्यायालयानेही काचेचे लेपण लावलेल्या नायलॉन, तंगुस अशा कृत्रिम दोऱ्यांपासून बनवलेला ‘मांजा’ उत्पादन, साठा, विक्री व खरेदीवर बंदी घातली होती. परंतू न्यायालयाच्या निर्णयाला धाब्यावर बसवून, नायलॉन मांजा शहरात सर्रासपणे विकला जात आहे. हे तितकेच सत्य आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या रस्त्यावरील सुरक्षिततेविषयी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) प्रमुख न्यायाधीश स्वतंत्रकुमार यांच्या खंडपीठासमोर याबाबत सुनावणी झाली होती. आदेशात म्हटले आहे की, कृत्रिम मांजा किंवा नायलॉनचे दोरे; तसेच इतर सर्व प्रकारचे कृत्रिम धागे यांचे उत्पादन, विक्री, साठा, खरेदी आणि वापर यांवर तात्काळ बंदी घालण्यात येत आहे.’ मांजा हाताने सहजासहजी तुटत नाही. पतंग उडविताना ब-याचदा हा मांजा झाडे व इमारतीमध्ये अडकला जातो. त्यातून वा-याबरोबर हा मांजा रस्त्यावर आल्यास वाहन चालकांच्या गळ्याला अडकून जीवितास धोका होऊ शकतो. या मांजामुळे काळेवाडी येथून नातेवाईकासोबत दुचाकीवरुन जाणा-या दोन वर्षाच्या मुलाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती. काळेवाडीतच दुचाकीवरुन जाणा-या एका वृद्धाच्या गळ्याला आणि हाताला मांजा लागून गंभीर दुखापत झाली. पुण्यात मांजा गळ्याला गुंडाळल्याने एका महिलेला जीव गमवावा लागला.

या मांजामुळे अनेक पशु-पक्षी जखमी झाले असून काही पक्षांचा मृत्यू देखील झाला आहे. पवना नगर येथे 50 फूट उंचीवर नारळाच्या झाडावर अडकलेल्या मांजात एक घार अडकली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तिची सुटका केली. काळेवाडी येथे उंच झाडावर मांजात अडकलेल्या कावळ्याला जीवनदान दिले. त्यामुळे हा मांजा नागरिकांसह पशु पक्ष्यांना देखील जीवघेणा ठरत आहे. या मांजाच्या वापरावर कठोर उपाययोजना करणे हाच यावर उपाय असेल, असे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.