Pune : औंध येथील जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना तंबाखूचे दुष्परिणाम सांगून केली तंबाखू मुक्तीची जनजागृती

Anti tobacco campaign at Aundh Hospital on the occasion of World Anti Tobacco Day. जिल्हा रुग्णालयात जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा

एमपीसी न्यूज – तंबाखू सेवनामुळे कर्करोग, हृदयरोग, यकृताचा, फुफ्फुसाचा आजार असे गंभीर आजार होतात. दरवर्षी लाखो लोकांचा केवळ तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांमुळे मृत्यू  होतो. याबरोबरच पक्षाघात, मोतीबिंदू, नपुंसकत्व, कमी वजनाचे, व्यंग असलेले, मृत्यू पावलेले बाळ जन्माला येणे यासारख्या व्याधी जडण्याचे प्रमाणही वाढत आहे. असे तंबाखूचे दुष्परिणाम नागरिकांना सांगून औंध येथील पुणे जिल्हा रुग्णालयात जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यात आला.

यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भगवान काकणे, नेत्रतज्ञ डॉ. प्रकाश रोकडे, अस्थिरोगतज्ञ डॉ. अनिल संतापुरे, सर्जन डॉ. नितीन देशमाने, आयुष अधिकारी, सामाजिक वैद्यकीय अधिकारी, रुग्णालयातील कर्मचारी आदि उपस्थित होते.

दरवर्षी 31 मे हा ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यापासून लोकांना रोखण्याचा हा दिवस आहे. या निमित्ताने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थामुळे होणाऱ्या जीवघेण्या परिणामांची जगभर जनजागृती केली जाते.

‘तंबाखू कंपन्यांचा युवकांसाठी चक्रव्यूव्ह! युवकांना यापासून वाचवा, तंबाखू व निकोटीनच्या व्यसनापासून दूर ठेवा’ असे यावर्षी तंबाखू सेवनास विरोध करण्यासाठी घोषवाक्य बनविण्यात आले आहे.

युवकांना तंबाखूजन्य पदार्थांची सवय लावणे तसेच त्याच्या आहारी पाडणे असाच प्रयत्न तंबाखू कंपन्यांचा सातत्याने असतो. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या त्यासाठी ठिकठिकाणी प्रलोभन देणारी छायाचित्रे लाऊन, पुरस्कृत कार्यक्रम घेऊन, अन्य विविध माध्यमातून तंबाखूजन्य पदार्थांची जाहीरात करतात.

तंबाखूच्या सेवनाने भारतात सुमारे 10 लाख लोकांचा विविध आजारांनी मृत्यू होत असल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्रात आज सुमारे 36 टक्के पुरुष  5 टक्के महिला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात.

तंबाखूमुळे हृदयरोग, कर्करोग, यकृताचा आजार, फुफ्फुसाचे आजार, टि.बी. यासारखे प्राणघातक आजार होतात.

त्याचबरोबर पक्षाघात, मोतीबिंदू, नपुंसकत्व, कमी वजनाचे, व्यंग असलेले, मृत्यू पावलेले बाळ जन्माला येणे यासारख्या व्याधी जडण्याचे प्रमाणही वाढते. यामुळे लोकांमध्ये अकाली मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.

देशात बिडी, गुटखा, तंबाखू, सिगारेट, मावा, खैनी, मिशेरी, चिलीम ओढणे यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन मोठ्या प्रमाणात केले जाते.

सध्याच्या कोरोना महामारीमध्येही सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने, तसेच एकच बीडी, सिगारेट 2 ते 3 लोकांमध्ये ओढल्यामुळे कोरोना रोग पसरु शकतो, असे तज्ज्ञांच्या निदर्शनास आले आहे.

त्यामुळेच कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास आर्थिक दंड, शिक्षा केली जाते.

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या, धुम्रपान करणाऱ्यास मुंबई पोलीस अधिनियमानुसार पहिल्या गुन्ह्यासाठी एक हजार रुपये दंड व एक दिवस सार्वजनिक सेवा करावी लागेल. त्याच व्यक्तीच्या दुसऱ्या गुन्ह्यासाठी तीन हजार रुपये दंड व तीन दिवस सार्वजनिक सेवा करावी लागेल. तिसऱ्या व त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी पाच हजार रुपये दंड व पाच दिवस सार्वजनिक सेवा करावी लागेल. अशी शिक्षेची तरतूद आहे.

भारतीय दंड संहितनेनुसार विविध कलमांनुसार सहा महिने, दोन वर्ष कारागृहाची शिक्षा व दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. या सोबतच तंबाखू नियंत्रण कायदा 2003 नुसार देखील अशा उल्लंघनांवर कार्यवाही केली जाणार आहे.

त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, धुम्रपान करू नये, असे आवाहन जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक नांदापुरकर यांनी केले आहे.

औंध येथील जिल्हा रुग्णालयात तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ, सिगारेट यांच्या सेवनाने होणारे शारीरिक, आर्थिक सामाजिक दुष्परिणाम याबाबत माहिती फलक घेऊन जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली.

त्यात तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाच्या दुष्परिणामांची व्याप्ती, उपचार व प्रतिबंधक ऊपाय याचाही समावेश होता. तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणार नाही आणि इतरांनाही करू देणार नाही अशी यावेळी उपस्थितांनी शपथ घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.