Anushka Salutes Kanta: कांता यांच्या निरपेक्ष सेवेला अनुष्काने केला सलाम

महापालिकेचे कर्मचारी पाण्याचा निचरा करण्यासाठी येत नसल्याचं पाहून कांता यांनी एका बाईकस्वाराच्या मदतीने रस्त्यावरील मॅनहोलचं झाकण उघडलं आणि रस्त्यावर साचलेल्या पाण्याला वेगळी वाट करुन दिली.

एमपीसी न्यूज- काही दिवसांपूर्वी राज्यात पावसाचे पुनरागमन झाले. या सीझनमध्ये पहिल्यांदाच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईतही चांगलाच पाऊस झाला. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात मुंबईच्या माटुंगा परिसरातील तुळसी पाईप रोडवर एक महिला भर पावसात मॅनहोल शेजारी उभी राहून येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांचा अपघात होऊ नये म्हणून त्यांना मार्ग दाखवताना दिसली. कांता मारुती कलन असं या महिलेचं नाव असून ती माटुंगा स्थानकाबाहेरील फुटपाथवरील झोपडपट्टीत राहते.

भर पावसाची तमा न बाळगता कांता यांनी जे काम केले त्याला तोड नाही. अशीच भावना जर प्रत्येक नागरिकांच्या मनात जागी राहिली तर देशात खरोखरीचे रामराज्य येईल यात काही शंका नाही. कांता यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनेदेखील या महिलेला सलाम केला आहे. अनुष्काने कांता यांच्याबद्दल नितांत आदर व्यक्त केला आहे. तसेच तिच्या निरपेक्ष भावनेने केलेल्या सेवेला सलाम केला आहे. अनुष्काने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचा फोटो पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत.

3 ऑगस्ट रोजी मुंबईत मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं होतं. दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे पाईप लाईन भागात पाणी साचायला लागलं. महापालिकेचे कर्मचारी पाण्याचा निचरा करण्यासाठी येत नसल्याचं पाहून कांता यांनी एका बाईकस्वाराच्या मदतीने रस्त्यावरील मॅनहोलचं झाकण उघडलं आणि रस्त्यावर साचलेल्या पाण्याला वेगळी वाट करुन दिली.

मॅनहोलचे झाकण उघडल्यानंतर वाहनचालकांचा अपघात होईल हे त्यांना लक्षात आल्यानंतर कांता सहा वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत तिथेच उभ्या राहून वाहनांना सुरक्षित वाट दाखवत होत्या. काही वर्षांपूर्वी असेच उघडे मॅनहोल न दिसल्याने त्यात पडून मुंबईतील एका नामांकित डॉक्टरांचा मृत्यू झाला होता. कांता यांना ही घटना कदाचित माहितीदेखील नसेल पण त्यांनी यावेळी प्रसंगावधान दाखवत जे काम केले त्याला तोड नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.