Pimpri News : इंग्लंडमधील पदव्युत्तर शिक्षणासाठी आर्थिक मदतीचे आवाहन

एमपीसी न्यूज  – इग्लंडमध्ये एक्सरसाईज अँड मेडिसीन या पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळालाय, पण घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे पुढे काय असा प्रश्न पिंपरीतील अमित आढाव या तरूणाला पडला आहे.

पिंपरीतील एका झोपडपट्टीत अमित आढाव हा आई कल्पना हिच्यासोबत राहतो. लहान पाणीच त्याचे वडील त्याला आणि आईला सोडून निघून गेले. आलेल्या परिस्थितीपुढे न डगमगता अमितची आई जिद्दीने उभी राहिली. घरकामासह इतर कामे करण्यास सुरवात केली. त्यानंतर कल्पना आढाव यांना महापालिकेच्या सुरक्षा विभागात मानधनावर काम मिळाले. कल्पना यांनी चिकाटी आणि मेहनतीने मुलगा अमितचे संगोपन करत त्याला चांगले शिक्षण दिले.

अमितने देखील आईचा संघर्ष लक्षात घेत प्रचंड मेहनत घेतली आणि ‘बॅचलर इन फिजिओथेरपी’चे शिक्षण घेत मोठी मजल मारली. त्याला इंग्लंडमध्ये एक्सरसाईज अँड मेडिसीन या पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळाला आहे. मात्र, या शिक्षणासाठी 21 लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे हे शिक्षण घ्यायचे कसे असा प्रश्न अमित आणि त्याच्या आईपुढे आ वासून उभा राहिला आहे.

आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने शिक्षणासाठी लागणारा 21 लाख रुपयांचा खर्च कसा पेलायचा ही विवंचना माय-लेकाला पडली आहे. अमितने या शिक्षणाकरिता बँकेत कर्ज मिळण्यासाठी अर्ज केला आहे. पण घरची परिस्थिती पाहता कोणती बँक त्याला कर्ज देण्यासाठी पुढे येईल, ही शंकाच आहे. त्यामुळे अमितच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी परिसरातील दानशुर संस्था, संघटनांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.