Pimpri : पसंती क्रमांकासाठी अर्ज करण्याचे ‘आरटीओ’चे आवाहन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन क्रमांकाची मालिका सुरु करण्यात येणार आहे. पंसती क्रमांकासाठी वाहनधारकांनी अर्ज करावेत, असे आवाहन पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी केले आहे. 

दुचाकी वाहनांसाठी ‘एचए’ ही नवीन मालिका सुरू करण्यात येणार आहे. नवीन मालिका सुरू होण्याच्या दिवशी कार्यालयात होणारी गर्दी, तसेच अन्य नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी आवडता क्रमांक हवा असणा-या वाहनधारकांकडून अर्ज मागविण्यात येतात. त्यासाठीचे आवश्‍यक शुल्क भरून तो क्रमांक देण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधितांनी क्रमांकासाठी आवश्‍यक रकमेचा डीडी, पुराव्याचा पत्ता, ओळखपत्र आणि पॅनकार्डची झेरॉक्‍ससह आज (सोमवारी) तर दुचाकीसाठी क्रमांक हवा असल्यास मंगळवारी (दि. 10 ) सकाळी अकरा ते दुपारी अडीच या वेळेत अर्ज सादर करणे आवश्‍यक आहे. 

एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक चारचाकी वाहनधारकांचे अर्ज आल्यास त्याची यादी मंगळवारी नोटीस बोर्डावर लावण्यात येणार आहे. त्याचदिवशी दुपारी साडेचार वाजता लिलावाद्वारे अधिक रकमेचा डीडी सादर करणा-या वाहनधारकास त्याचा पसंतीचा क्रमांक देण्यात येणार आहे. दुचाकीधारकांची यादी बुधवारी (दि. 11) सकाळी अकरा वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येणार आहे. त्याचदिवशी दुपारी साडेचार वाजता लिलावाद्वारे दुचाकी वाहनधारकांना त्यांचा पसंतीचा क्रमांक देण्यात येणार आहे. राखून ठेवण्यात आलेला क्रमांक बदलून देण्यात येणार नाही, याची नोंद वाहनधारकांनी घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.