Nashik News :  हुतात्मा दिनी दोन मिनिटांचे मौन पाळावे : जिल्हादंडाधिकारी सूरज मांढरे      

एमपीसी न्यूज : भारतीय स्वातंत्र्य संग्रामात प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्यांरणच्या स्मरणार्थ शनिवार 30 जानेवारी 2021 रोजी हुतात्मा दिन पाळण्यात येणार असून यादिवशी सकाळी 11 ते 11:02 या दोन मिनिटांच्या कालावधीत सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, आस्थापना यांनी स्तब्धतेने मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सूरज मांढरे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

शासकीय प्रसिद्धीपत्रकात नमुद केल्यानुसार, जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, आस्थापना, शैक्षणिक संस्था, विद्यापीठांमधील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी कर्मचारी, विद्यार्थी तसेच नागरिकांनी 30 जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात यावा.

या दिवशी नाशिक शहरात नागरी संरक्षण विभागामार्फत सकाळी 10:59 मिनिटांपासून 11 वाजेपर्यंत इशारा भोंगा वाजविण्यात येवून यानंतर सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांनी दोन मिनिटे स्तब्धतेने मौन पाळावे. त्यानंतर सकाळी 11:02 मिनिटांनी मौन संपल्यासंबंधिचा इशारा भोंगा सकाळी  11:03 मिनिटांपर्यंत वाजविण्यात येणार आहे.

हुतात्मा दिन कार्यक्रमाच्या वेळी कोविड-19 विषाणु प्रादुर्भावाच्या अनुषंगाने शासनामार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या सूचना व नियमांचे पालन करण्यात यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.