Appeal From Central Railway : रेल्वे स्थानकांवर गर्दी झाल्याचे जुने व्हिडीओ पसरवू नका; मध्य रेल्वेचे आवाहन

एमपीसी न्यूज – रेल्वे स्थानकांवर गर्दी झाली आहे. कामगार, नागरिक आपापल्या गावी जाण्यासाठी रेल्वे स्थानकाच्या बाहेर मोठ्या संख्येने एकत्र झाल्याचे जुने व फेक व्हिडीओ सोशल मीडियावर पसरवू नयेत. तसेच कोरोना संबंधित प्रत्येक नियमाचे पालन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी केले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असेही मित्तल यांनी म्हटले आहे.

संजीव मित्तल यांनी ऑनलाईन माध्यमातून पत्रकार परिषद घेतली. त्यात ते बोलत होते. मित्तल म्हणाले, काही माध्यमांमधून देखील रेल्वे स्थानकांवर गर्दी झाल्या संबंधित वृत्त प्रकाशित केली जात आहेत. कोरोनाच्या परिस्थितीतून आपल्या सर्वांना बाहेर पडायचं आहे.

_MPC_DIR_MPU_II

रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी उन्हाळ्यात अधिक रेल्वे गाड्या चालवल्या जात आहेत. त्यामुळे अधिकच्या चालवल्या जाणाऱ्या  रेल्वे गाड्यांमध्ये मुबलक प्रमाणात तिकीट उपलब्ध आहेत. त्यामुळे कन्फर्म तिकीट घेऊनच प्रवाशांनी रेल्वेने प्रवास करावा. रेल्वे प्रवासाच्या वेळी कोरोना संबंधित सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना प्रवाशांना देण्यात येत असल्याचेही मित्तल यांनी सांगितले.

मुंबई रेल्वे मंडळाचे व्यवस्थापक शलभ गोयल यांनी देखील रेल्वे प्रवाशांनी मास्क वापरावा, साबण आणि पाण्याने वेळोवेळी हात धुवावे, सनीटायझर वापरावे असे आवाहन केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सामाजिक अंतर पाळणे देखील गरजेचे असल्याचे गोयल यांनी सांगितले.

मुंबई मंडळातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, ठाणे, दादर आणि पनवेल या स्थानकांवर प्लटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्यात आली असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.