Mumbai: मृत्यू दर रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स नेमा  – मुख्यमंत्री

Appoint a task force of expert doctors in each district to curb the death rate - CM

रुग्णांचे संपर्क शोधण्यात अजिबात ढिलाई नको

एमपीसी न्यूज – कोरोनाशी आपण गेल्या तीन महिन्यांपासून लढत आहोत. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग आपण चांगल्या पद्धतीने रोखला असला तरी मृत्यूदर वाढणे बरोबर नाही. लॉकडाऊन शिथिल केला आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत काही जिल्ह्यांत वाढ होत आहे. ती रोखण्यासाठी रुग्ण शोधणे आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क जलदरित्या शोधणे हा एकमेव मार्ग आहे, या कामांत अजिबात ढिलाई नको. यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये तेथील तज्ज्ञ डॉक्टर्सचे टास्क फोर्स नेमावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. 

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज, शुक्रवारी राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांच्याकडून कोरोना परिस्थितीचा व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील या कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई येथे डॉक्टर्सचा टास्क फोर्स स्थापन केला त्याचा चांगला उपयोग झाला. आता प्रत्येक जिल्ह्यात किंवा विभागात असा टास्क फोर्स करणे गरजेचे आहे. यामध्ये तेथील जुने जाणते, तज्ज्ञ डॉक्टर्स असावेत आणि त्यांचा मुंबईच्या डॉक्टर्सशी देखील कायम संपर्क असावा.

आरोग्य मंत्रालयाकडून उपचार पद्धती, औषधी याबाबत विविध सूचना येत असतात, त्यात बदलही होत असतात. त्यादृष्टीने वरिष्ठ डॉक्टर्सचा सहभाग वाढवणे महत्वाचे आहे. वेळेत औषधे मिळाली तर रुग्ण बरे होत आहेत हे कितीतरी प्रकरणात सिध्द झाले आहे.

आपले रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही खूप चांगले आहे. प्रयोगशाळांमधून चाचणीचे अहवाल आता लगेच मिळायला पाहिजेत अशा सुचना असतांना काही ठिकाणी ७२ तास लागत असतील तर ती गंभीर बाब आहे, असे सांगत कोणत्याही परिस्थितीत ढिलाई झाली नाही पाहिजे असे, मुख्यमंत्र्यांनी बजावले.

ट्रॅकिंग आणि ट्रेसिंगच्या बाबतीत केंद्राने आणि राज्याने व्यवस्थित मार्गदर्शिका दिल्या आहेत त्याप्रमाणे कार्यवाही पाहिजे. काही ठिकाणी वरिष्ठ डॉक्टर्स हे आपले वय आणि इतर आजार असल्याने कोविड रुग्णांना तपासत नाहीत. तेथे कनिष्ठ डॉक्टर्स कोविड जबाबदारी सांभाळत आहेत असे निदर्शनास आले आहे.

या वरिष्ठ डॉक्टर्सनी थेट कोविड उपचार करायचे नसतील तर रुग्णालयांत उपस्थित राहून इतर डॉक्टर्सना मार्गदर्शन करू शकतात किंवा संगणक ,स्मार्ट फोन कॅमेरा या माध्यमातून स्वत:ला सुरक्षित ठेवून उपचारांचे मार्गदर्शन करणे सहज शक्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील अधिक गतीने रुग्णांचे संपर्क शोधणे गरजेचे आहे असे सांगितले. आता पावसाला सुरुवात झाली असून इतर रोगांमध्येही वाढ होऊ शकते अशा वेळी नॉन कोविड रुग्णांना त्वरित उपचार मिळणे गरजेचे आहे.

राज्यांतील जिल्ह्यांमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टर्सची देखील टास्क फोर्समध्ये मदत घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी मीरा भाईंदर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, धुळे, लातूर, अमरावती, औरंगाबाद या जिल्ह्यांचा व महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना साथीचा आढावा घेण्यात आला.

प्रारंभी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी रुग्ण दुप्पट होण्याचे दिवस २१.३ वरून २३.१ झाले आहेत. तर सध्याचा रिकव्हरी रेट ५०.४ असून देशाचा रिकव्हरी रेट ५३.८ इतका तसेच मृत्यू दर ३.७ वरून ४.८ टक्के झाल्याची माहिती दिली.

रुग्णांच्या माहितीचे सुयोग्य व्यवस्थापन होणे गरजेचे असून नियमित समायोजन करावे व माहिती अद्ययावत करीत राहावी असे निर्देश मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिले.

जिथे प्रत्येक रुग्णांचे १० पेक्षा कमी संपर्क शोधण्यात येतात तिथे संसर्गाचे प्रमाण जास्त असल्याचे आढळल्याचे ते म्हणाले.

एखाद्या इमारतीत एखाद्या अपार्टमेंटमध्ये कोविड रुग्ण आढळल्यास त्या इमारतीवर दररोज लक्ष ठेवून तेथील रहिवाशांच्या तब्येतीकडे बारकाईने लक्ष ठेवावे तसेच किमान फोनवरून तरी चौकशी करीत राहणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.