Pimpri : औद्योगिक सुरक्षा, संभाव्य अपघात धोके, टाळण्यासाठी कंपन्यांमध्ये प्रशिक्षणासाठी अधिकारी नेमा – गजानन बाबर

एमपीसी न्यूज – कंपनीला आग लागणे,  अपघात घडून जीवितहानी, वित्तहानी झाल्यानंतर निष्कर्ष काढण्याऐवजी खबरदारी म्हणून कंपन्यांमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी विभागवार अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे. अधिका-यांमार्फत संभाव्य धोक्यांची माहिती दिल्यास अधिक काळजी घेण्यास मदत होईल. जेणेकरुन जीवितहानी व राष्ट्रीय संपत्ती वाचवण्यात मोलाचा हातभार लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

याबाबत औद्योगिक सुरक्षा, आरोग्य विभागाचे उपसंचालक यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात बाबर यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिराव फुले, नारायण मेघाजी लोखंडे या दोन नेत्यांच्या नेतृत्वाखाली कामगार चळवळीला सुरुवात झाली. कामगार कायदे हे सामाजिक सुरक्षेचा भाग आहे. कारखान्यातील कामगारांची सुरक्षा कल्याण आणि आरोग्य हे महत्वाचे आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी होणारे संभाव्य अपघात, आरोग्याचे धोके विचारात घेऊन ते समाधानकारकरित्या कमी करणे हे आपल्या विभागाचे काम आहे. भारतात फॅक्टरी अॅक्ट 1948 साली आणि महाराष्ट्रात 1963 साली या कायद्याचे नियमन लागू झाले. नॅशनल सेफ्टी कॉन्सिल 1966 साली स्थापन झाल्यानंतर 1972 सालापासून ख-या अर्थाने राष्ट्रीय सुरक्षा आठवडा साजरा करण्यात आला.

महाराष्ट्रात जवळपास 40 हजार नोंदणीकृत कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये 25 लाख कामगार आहेत. कंपन्या फॅक्टरी अॅक्ट 1948 नुसार सेफ्टी कमिटी तयार करणे, सुरक्षा उपक्रमात सहभाग घेणे. सुरक्षा धोरण बनविणे. तसेच वैधानिक आवश्यकतेप्रमाणे हवा प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण उपकर कायदा, पाणी प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण कायदा, पर्यावरण, घातक कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम 1989 प्रमाणे सर्व नियम पाळताना दिसतात. आपत्कालीन कार्यकारी संघटना, त्यांच्यावरील जबाबदा-या कंपन्यांमध्ये आलार्म पद्धत, प्राथमिक वैद्यकीय विभाग, फायर हायड्रंट सिस्टीम, मॉकड्रील व अपघात माहिती पद्धत हे सर्व कंपन्यांमध्ये पहायला मिळते. त्यामुळे कारवाई, निष्कर्ष यापेक्षा वेळेस सावधानी, प्रशिक्षण सर्वंच कंपन्यांना द्यावे. त्यासाठी विभागावर प्रशिक्षण अधिकारी नेमावा. जेणेकरुन जीवितहानी व राष्ट्रीय संपत्ती वाचवण्यात मोलाचा हातभार लागेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.