Pimpri News : मैला पंप हाऊस देखभाल-दुरूस्तीसाठी पाच वेगवेगळ्या ठेकेदारांची नेमणूक

10 कोटी 60 लाखांचा होणार खर्च  

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड, लांडेवाडी, काळेवाडी, पिंपळेसौदागर, दापोडी – फुगेवाडी आणि किवळे येथील मैलाशुद्धीकरण केंद्रातील पंप हाऊसची वार्षिक देखभाल-दुरूस्ती करण्यात येणार आहे. या पाचही वेगवेगळ्या पंप हाऊसच्या कामासाठी तीन वर्ष कालावधीकरिता तब्बल 10 कोटी 60  लाख रूपये ठेकेदारांना देण्यात येणार आहेत.

पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. शहरात दररोज 450 दश लक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यापैकी सुमारे 290 दशलक्ष लिटर सांडपाणी निर्माण होते. या सांडपाणी, मैलापाण्यावर प्रक्रीया करण्यासाठी शहरात 14 मैलाशुद्धीकरण केंद्र बांधण्यात आले आहेत. मैलाशुद्धीकरण केंद्र आणि पंपहाऊसची वार्षिक देखभाल-दुरूस्ती ठेकेदारांमार्फत करण्यात येते.

पर्यावरण अभियांत्रिकी विभागामार्फत चिंचवड मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत गोखले पार्क, काकडे पार्क, केशवनगर, देऊळमळा येथील पंप हाऊस, कासारवाडी टप्पा दोन अंतर्गत भोसरी-लांडेवाडी येथील पंप हाऊस, कासारवाडी टप्पा एक अंतर्गत काळेवाडी आणि पिंपळेसौदागर येथील मैलापाणी पंप हाऊस, कासारवाडी टप्पा तीन अंतर्गत दापोडी, फुगेवाडी येथील पंप हाऊस तसेच किवळे येथील मैला पंप हाऊसची वार्षिक देखभाल-दुरूस्ती करण्यात येणार आहे.

या पाचही ठिकाणच्या पंप हाऊसच्या कामांसाठी ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. या पाचही वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या ठेकेदारांची नेमणूक करण्यात आली आहे. चिंचवड मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत गोखले पार्क, काकडे पार्क, केशवनगर, देऊळमळा येथील पंप हाऊसच्या  देखभाल-दुरूस्तीसाठी पाच ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यामध्ये फ्लोमॅक इंजिनिअरींग कॉर्पोरेशन यांनी निविदा दरापेक्षा 16.90 टक्के कमी म्हणजेच 3 कोटी 13  लाख रूपये लघुत्तम दर सादर केला.

कासारवाडी टप्पा दोन अंतर्गत भोसरी-लांडेवाडी येथील पंप हाऊसच्या  देखभाल-दुरूस्तीसाठी चार ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यामध्ये एक्सेल इलेक्ट्रीक्ल्स यांनी निविदा दरापेक्षा 16.20  टक्के कमी म्हणजेच 3 कोटी 33  लाख रूपये लघुत्तम दर सादर केला. कासारवाडी टप्पा एक अंतर्गत काळेवाडी आणि पिंपळेसौदागर येथील मैलापाणी पंप हाऊसच्या चालन देखभाल-दुरूस्तीसाठी चार ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यामध्ये फ्लोमॅक इंजिनिअरींग कॉर्पोरेशन यांनी निविदा दरापेक्षा 15.90  टक्के कमी म्हणजेच 1 कोटी 73 लाख रूपये लघुत्तम दर सादर केला.

कासारवाडी टप्पा तीन अंतर्गत दापोडी, फुगेवाडी येथील पंप हाऊसच्या चालन देखभाल-दुरूस्तीसाठी पाच ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यामध्ये इलेक्ट्रोकुल इंजिनिअरींग यांनी निविदा दरापेक्षा 16.60 टक्के कमी म्हणजेच 1 कोटी 51 लाख रूपये कमी दर सादर केला.

किवळे येथील मैला पंप हाऊसची वार्षिक चालन आणि देखभाल-दुरूस्तीच्या कामासाठी पाच ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यामध्ये इलेक्ट्रोकुल इंजिनिअरींग यांनी निविदा दरापेक्षा 16.60 टक्के कमी म्हणजेच 88 लाख 44 हजार रूपये लघुत्तम दर सादर केला. लघुत्तम दर सादर केलेल्या या ठेकेदारांसमवेत करारनामा करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.