Pimpri News: महापालिकेच्या रूग्णालयांमध्ये ‘आऊटसोर्सिंगद्वारे’ वैद्यकीय अधिका-यांसह कर्मचा-यांची नेमणूक 

मनुष्यबळ पुरविण्यासाठी तीन ठेकेदारांची नियुक्ती  

एमपीसी न्यूज  – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयासह इतर नऊ  रूग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिका-यांपासून स्टाफनर्स, पॅरामेडीकल स्टाफसह इतर कर्मचा-यांची आऊटसोर्सिंगद्वारे नेमणूक केली जाणार आहे. या रूग्णालयांमध्ये मनुष्यबळ पुरविण्यासाठी तीन ठेकेदारांची दोन वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

मात्र, सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे तीन महिन्यांसाठी ही कंत्राटी  भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी 11 कोटी 75 लाख रूपये खर्च होणार आहे. तर, दोन वर्षासाठी या रूग्णालयांमधील 1 हजार 38 कर्मचा-यांवर 94 कोटीचा खर्च होणार आहे.

महापालिकेच्या 700 खाटांच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयासह यमुनानगर रूग्णालय, थेरगाव, जिजामाता, सांगवी, नवीन भोसरी, जुने भोसरी,  जुने आकुर्डी, तालेरा आणि आकुर्डीतील नवीन रूग्णालय ही नऊ रूग्णालये आहेत. या रूग्णालयांमध्ये महापालिकेचा कायमस्वरूपी अधिकारी, कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. तसेच महापालिकेतर्फे वैद्यकीय अधिका-यांपासून इतर पॅरामेडीकल स्टाफची सहा महिने कालावधीसाठी मानधनावर नेमणूक केली जाते.

मात्र, महापालिकेने आता वायसीएम रूग्णालयासह इतर नऊ रूग्णालयांमधील कर्मचारी भरतीचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या रूग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिका-यांपासून स्टाफनर्स, पॅरामेडीकल स्टाफसह इतर कर्मचा-यांची आऊटसोर्सिंगद्वारे नेमणूक केली जाणार आहे.

या रूग्णालयांमध्ये मनुष्यबळ पुरविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून बीव्हीजी इंडीया लिमिटेड, श्रीकृपा सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि रूबी एल केअर सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमिटेड या तीन पुरवठाधारकांची दोन वर्षासाठी नेमणूक करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. 31 ऑगस्ट रोजी झालेल्या पुरवठाधारकांच्या सभेत लॉटरी पद्धतीने पुरवठाधारकांना रूग्णालयांचे वाटप निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार, बीव्हीजी इंडीया यांना वायसीएम रूग्णालय आणि वायसीएम रूग्णालयातील कुटुंब कल्याण विभागासाठी मनुष्यबळ पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले आहे.

श्रीकृपा सर्व्हीसेस यांना यमुनानगर, थेरगाव, जिजामाता आणि सांगवी रूग्णालयात तर, रूबी एलकेअर सर्व्हीसेस यांना नवीन भोसरी, जुने भोसरी,  जुने आकुर्डी, तालेरा आणि आकुर्डीतील कै. प्रभाकर कुटे रूग्णालयात मनुष्यबळ पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. या प्लेसमेंट एजन्सींना दोन वर्षासाठी मनुष्यबळ पुरवठ्याचे कामकाज देण्यात आले आहे.

मात्र, सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे प्रारंभी तीन महिने कंत्राट कालावधी आहे. मनुष्यबळ पुरविण्यासाठी तीन महिन्यांकरिता 11 कोटी 33 लाख 77 हजार रूपये तर सेवाशुल्कापोटी 41 लाख 76 हजार रुपयांचा खर्च महापालिकेला सोसावा लागणार आहे. आयुक्तांनी मांडलेल्या या आयत्यावेळच्या प्रस्तावास स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली.

वायसीएम रूग्णालय आणि वायसीएम रूग्णालयातील कुटुंब कल्याण विभागासाठी एकूण 343 अधिकारी, कर्मचा-यांची नेमणूक केली जाणार आहे. त्यांच्या वेतनापोटी एक महिन्याकरिता 96 लाख 65 हजार रूपये खर्च होणार आहे. तर, तीन महिने कालावधीसाठी 3 कोटी 60 हजार रूपये खर्च होणार आहे. यमुनानगर, थेरगाव, जिजामाता आणि सांगवी रूग्णालयासाठी एकूण 356  अधिकारी, कर्मचा-यांची नेमणूक केली जाणार आहे.

त्यांच्या वेतनापोटी एक महिन्याकरिता 1 कोटी 36 लाख 58 हजार रूपये खर्च होणार आहे. तर, तीन महिने कालावधीसाठी 4 कोटी 25 लाख 22 हजार रूपये खर्च होणार आहे. नवीन भोसरी, जुने भोसरी,  जुने आकुर्डी, तालेरा आणि आकुर्डीतील नवीन प्रभाकर कुटे रूग्णालयासाठी एकूण 339 अधिकारी, कर्मचा-यांची नेमणूक केली जाणार आहे. त्यांच्या वेतनापोटी एक महिन्याकरिता 1 कोटी 30 लाख 75 हजार रूपये खर्च होणार आहे. तर, तीन महिने कालावधीसाठी 4 कोटी 7 लाख 94 हजार रूपये खर्च होणार आहे.

आऊटसोर्सिंगद्वारे ही पदे भरणार!

वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस), दंतशल्य चिकीत्सक, फार्मासिस्ट, स्टाफनर्स, एएनएम, लॅब टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, सीएसएसडी टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन, ब्लड बँक टेक्निशियन, ब्लड बँक कौन्सिलर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता (मेडीकल सोशल वर्कर, डायलीसीस टेक्निशियन, फिजिओथेरपिस्ट, डाटा एन्ट्री ऑपरेटर, भांडारपाल (स्टोअर किपर), बायोमेडीकल इंजिनिअर, वॉर्डबॉय, वॉर्ड आया आदी मनुष्यबळ आऊटसोर्सिंगद्वारे भरती करण्यात येणार आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.