PCMC : पालखी मार्गावर 200 मीटर अंतरावर 10 अधिकाऱ्यांच्या पथकांची नेमणूक

एमपीसी न्यूज – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर प्रति 200 मीटर अंतरावर 10 अधिकाऱ्यांच्या पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. अशी 12 पथके पालखी मार्गावर तैनात असतील. या पथकांना 200 मीटरचा भाग निश्चित करून देण्यात आला आहे.

Nigdi : प्राधिकरणात दोन दिवस संगीत महोत्सव

शिवाय महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यात येणार आहे. वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहू नये यासाठी या पथकांद्वारे काम करण्यात येणार असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी महापालिकेची (PCMC) यंत्रणा सज्ज झाली आहे. यंदाची वारी हरितवारी-निर्मलवारी-प्लास्टिकमुक्त वारी करण्याच्या संकल्पपुर्तीसाठी आपण कृतीशील सहभाग नोंदवावा असे आवाहनही त्यांनी केले. आषाढीवारीच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीने स्थापत्य, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, सुरक्षा व्यवस्थेबरोबरच यंदाची वारी पर्यावरणपूरक,प्लास्टिक मुक्त, हरितवारी करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले असून त्या अनुषंगाने संबंधित विभागांना तातडीने कामकाम करण्याच्या, आपसात समन्वय राखण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, ज्ञानदेव जुंधारे, संजय खाबडे, संजय कुलकर्णी, सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, उप आयुक्त अजय चारठाणकर, मनोज लोणकर, रविकिरण घोडके, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी अनिता कोटलवार, सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख, विजयकुमार थोरात, यशवंत माने, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, क्षेत्रिय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, शीतल वाकडे, ज्ञानेश्वर ढाकणे, किरण मोरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरूण दगडे यांच्यासह पाणीपुरवठा, विद्युत, स्थापत्य,  अणुविद्युत, बीआरटी, जलनिसारण विभागाचे अभियंता तसेच विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी महापालिकेच्या वतीने सुक्ष्मनियोजन करण्यात आले आहे. पालखी मार्ग तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी नियंत्रण आणि समन्वय ठेवण्यासाठी ग्रुप कमांडर, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. अपात्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मुख्य नियंत्रण कक्षाला सुचित करून सर्व यंत्रणा तात्काळ कार्यरत होतील अशा प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे.

संत तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम आकुर्डी येथे असतो. याठिकाणी नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे. शिवाय दिंड्यांच्या मुक्कामासाठी महापालिकेने शाळा उपलब्ध करून दिल्या आहेत. याठिकाणी स्वतंत्र समन्वय नेमण्यात आले असून महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र शौचालय, स्नानगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. पालखी मुक्काम तसेच पालखी मार्गावर तात्पुरत्या विश्रांती कक्ष तयार करण्यात आले असून यामध्ये महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन व वेंडिंग मशिन ठेवण्यात आली आहे. स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्षाची सोयदेखील करण्यात आली आहे.

वैद्यकीय सुविधा, औषधे यांच्यासह फिरती रुग्णवाहिका पालखी मार्गावर उपलब्ध असणार आहे. वैद्यकीय पथकामध्ये स्त्री रोग तज्ञांची नेमणूक देखील करण्यात आली आहे. संत तुकाराम महाराज पालखीसोबत देहू ते पंढरपूरपर्यंत कर्मचाऱ्यांसह अग्निशामक वाहन, पिण्याच्या पाण्याचे टॅंकर दिले जाणार आहेत.

यावर्षी दिंडी प्रमुखांचे स्वागत करताना महापालिकेच्या वतीने त्यांना कापडी पिशवी, प्रथमोपचार पेटी, रोप तसेच झाडांच्या बियांचे वाटप करण्यात येणार आहे. महापालिकेच्या वतीने सेवासुविधांमध्ये कमतरता राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊन यंदाची वारी आनंदी वातावरणात पार पाडण्यासाठी महापालिका (PCMC ) प्रशासन सर्वोतपरी प्रयत्न करेल, असे आयुक्त सिंह यांनी सांगितले.

पालखी सोहळ्यासाठी सेवा सुविधा पुरविताना महापालिकेचे विविध विभाग तसेच पोलीस यंत्रणा, महावितरण, अन्न व औषध प्रशासन, परिवहन आदी सर्व यंत्रणांनी आपसात समन्वय ठेवावा असे निर्देशही त्यांनी दिले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.