Pune: अप्रेंटिसशिप योजना ही उद्योगजगतासाठी वरदान- सुदीप देव

Apprenticeship scheme is a boon for the industry says sudeep dev in pune

एमपीसी न्यूज- केंद्र सरकारची अप्रेन्टिसशिप योजना ही उद्योगजगतासाठी निश्चितच वरदान आहे, असे मत व्हॉल्व्हो आयशर कमर्शिअल व्हेईकल्स लि.च्या मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाचे उपाध्यक्ष सुदीप देव यांनी व्यक्त केले.

नॅशनल इन्स्टिटूयट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (एनआयपीएम)च्या पुणे विभागाच्यावतीने अप्रेंटिसशिप योजनेविषयी आयोजित वेबिनारमध्ये ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, जर्मनीसारख्या देशातून उगम पावलेली ‘अप्रेन्टिसशिप’ ही संकल्पना अनेक राष्ट्रांनी स्वीकारली असून जगातील अनेक नामांकित कंपन्यांच्या वरिष्ठ पदावर विराजमान असलेल्या पदाधिकाऱ्यानी ‘अप्रेन्टिस’ म्हणूनच कारकिर्दीला सुरुवात केल्याची उदाहरणे आहेत.

व्हॉल्व्हो आयशर कंपनीतसुद्धा अनेक अप्रेन्टिस प्रशिक्षणार्थ्यांना कंपनीत नोकरीवर कायम केले आहे. अप्रेन्टिस योजनेमुळे बेरोजगार युवकांना रोजगारक्षम बनण्याची संधी मिळते असेही सुदीप देव यांनी सांगितले.

तर अप्रेन्टिस योजनेचे वरिष्ठ सल्लागार प्रमुख सुरजित रॉय यांनी आपल्या मनोगतात अप्रेन्टिस योजना उद्योगजगतासाठी आर्थिकदृष्ठ्या कशी फायदेशीर आहे हे सांगत या योजेनचे स्वरूप, या योजनेत सहभागी होण्याची प्रक्रिया आदी बाबी सविस्तर समजावून सांगितल्या.

तसेच अप्रेन्टिस योजनेमुळे देशातील उद्योगक्षेत्राच्या अर्थचक्राला गती मिळण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला.

नॅशनल इन्स्टिटूयट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंटचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी अप्रेन्टिस योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारच्यावतीने नियुक्त करण्यात आलेल्या टिपीए (थर्ड पार्टी एग्रीगेटर) म्हणून कार्यरत संस्थांच्या माध्यमातून औद्योगिक कंपन्यांना अप्रेन्टिस योजना प्रभावीपणे कशाप्रकारे राबविता येते हे उदाहरणांसह सांगितले.

ते म्हणाले की, सध्याच्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर असंख्य परप्रांतीय कामगारांचे स्थलांतर झाल्यामुळे स्थानिक युवकांना अप्रेन्टिस योजनेच्या माध्यमातून रोजगार संधी उपलब्ध होऊ शकतात असे सांगितले.

या वेबिनारमध्ये एनआयपीएम पुणे अध्यक्ष कॅप्टन डॉ.सी.एम.चितळे यांनी मान्यवरांसह सर्वांचे स्वागत केले. तर सचिव नरेंद्र पाटील यांनी आभार प्रदर्शन व समन्वयन सुनील नेवे यांनी केले.

या वेबिनारमध्ये विविध औद्योगिक कंपन्यांचे मनुष्यबळ व्यवस्थापक पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.