Pune : ‘भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठी शिक्षण ट्रस्ट स्थापन करण्यासाठी मंजुरी द्या’

महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेचे प्रस्तावित भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट स्थापन करण्यासाठी राज्य शासनाची मान्यता मिळावी, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट स्थापन करण्याबाबतची प्रशासकीय कारवाई सुरू आहे. नगर विकास विभागाने दि. 21 नोव्हेंबर 2019 रोजी या वैद्यकीय ट्रस्ट बाबत विचारणा केली होती. त्याबाबत महापालिका आयुक्तांनी खुलासा केलेला आहे. त्यामुळे पुणे महापालिकेमार्फत प्रस्तावित केलेल्या वैद्यकीय महाविद्यालय स्थापित करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट स्थापन करण्यासाठी मान्यता मिळण्यासाठी निर्देश देण्याची विनंती महापौरांनी पत्रात मुख्यमंत्र्यांना केली आहे.

दरम्यान, महापालिकेचे हे वैद्यकीय महाविद्यालय अहमदाबादच्या धर्तीवर उभारण्यात येणार आहे. सर्वसामान्यांना या हॉस्पिटलचा खर्च परवडेल. या वैद्यकीय महाविद्यालयात जून २०२१ पर्यंत प्रवेश दिले जातील याकरिता आवश्यक सर्व परवानग्या व विश्वस्त नियुक्तीसाठी राज्य शासनाशी समन्वय साधून, याबाबत खुलासा दोन दिवसात प्रशासनाने करावा़, असे महापौरांनी यापूर्वी बैठक घेऊन आयुक्तांना सांगितले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.