Chakan : पावसाळी अधिवेशनात खेडमधील अकरा कामांना मंजुरी 

उरण - भीमाशंकर रस्त्याचा प्रश्न मार्गी ;  खेडसाठी २० कोटी ५२ लाख रुपयांचा निधी 

आमदार सुरेश गोरे यांची माहिती 
एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील पूल व रस्त्यांच्या अकरा महत्वाच्या कामांसाठी नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात २० कोटी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तर तालुक्यातील महत्वाचे विषय तारांकित प्रश्न, लक्षवेधी, अशासकीय ठराव व विधेयकाच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत.  दरम्यान उरण – भिमाशंकर रस्त्यामधील खेड तालुक्यातील भागाचे काम करण्यासाठी एक कोटी रुपये निधी मंजूर झाल्याने या रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे.

खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी चाकणमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. पुढे त्यांनी सागितले की, राज्याच्या अर्थसंकल्पीय पावसाळी अधिवेशनात सन २०१९-२० साठी यावर्षी खेड तालुक्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. तालुक्यातील महत्वाच्या अशा एकूण ११ कामांना एकूण २० कोटी ५२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तालुक्यातील दळणवळण सुरळीत होऊन शेतकऱ्यांच्या विकासात वाढ होण्यासाठी तालुक्यातील मुख्य रस्ते दुरुस्त करून मजबूत करण्यासाठी भरीव निधी उपलब्ध झाल्याने तालुक्यातील जवळपास सर्वच मुख्य रस्ते गेल्या ४ ते ५ वर्षांपासून वाहतुकीसाठी सुस्थितीत ठेवण्यात यश आले आहे.

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या भिमाशंकर या पवित्र तीर्थक्षेत्राला येण्यासाठी मुंबई मार्गे भिमाशंकरला येण्यासाठी २००८ पासून प्रलंबित असलेला उरण-भिमाशंकर हा रस्ता मंजूर करण्यासाठी यावर्षी खेड तालुक्यातील वन विभागाच्या बाहेरचा रस्ता करण्यासाठी १ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याने आता खेड तालूक्यातील या रस्त्याचा प्रलंबित विषय मार्गी लागणार आहे.

तालुक्यातील महत्वाच्या रस्त्यांसाठी यंदाच्या पावसाळी अधिवेशनात (२०१९) उरण-भीमाशंकर रस्ता खेड हद्दीपासून पडारवाडीपर्यंत रस्ता करण्यासाठी १ कोटी रुपये, खेड-वाडा-भीमाशंकर रस्ता चासकमान धरणापासून वाडा गावापर्यंत रस्ता सुधारणा करण्यासाठी २ कोटी ५० लाख रुपये, कुडे गाव आणि घोटवडी येथे पूल बांधण्यासाठी १ कोटी ५० लाख रुपये, पिंपरी-वाकी-काळूस या रस्त्यामधील पिंपरी बु ते भाम फाटा, वाकी ते टेमगिरवाडी फाटा येथील रस्ता सुधारणा करण्यासाठी १ कोटी ५० लाख रुपये, किवळे ते कोरेगाव रस्ता सुधारणा करण्यासाठी १ कोटी ५० लाख रुपये, खेड ते गुळाणी घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यात खेड, राक्षेवाडी ते गुळाणी घाटपर्यंत डांबरी रस्ता करणे

तसेच खेड/राक्षेवाडी हद्दीत सिमेंट कॉंंक्रिट रस्ता करण्यासाठी ३ कोटी रुपये, दावडी ते निमगाव रस्ता रुंदीकरण/डांबरीकरण तसेच दावडी येथे पूल बांधण्यासाठी ४ कोटी ५० लाख रुपये, डेहणे ते पोखरी रस्ता सुधारणा करण्यासाठी ५१ लाख रुपये, चाकण पासून राक्षेवाडी, काळूस, माळवाडी ते दावडी रस्ता सुधारणा करण्यासाठी २ कोटी रुपये, कान्हेवाडी ते वेताळे रस्ता सुधारणा करण्यासाठी ५१ लाख रुपये, खरपुडी (बु) गावाला बाह्यवळण रस्ता करण्यासाठी २ कोटी रुपये असे एकूण २० कोटी ५२ लाख रुपये तालुक्यासाठी मंजूर करण्यात आल्याने या सर्व मुख्य रस्त्यांची सुधारणा लवकरच होणार असल्याचे आमदार सुरेश गोरे यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी सेनेचे उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे, तालुकाप्रमुख रामदास धनवटे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.