Maharashtra Police :पोलीस शिपायांची12,528 पदे भरण्यास मान्यता

एमपीसी न्यूज : राज्य शासनाच्या पदभरतीवर वित्त विभागाने आणलेल्या निर्बंधातून सूट देत पोलीस शिपायांची 12,528 पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश गुरुवारी काढण्यात आला. यापैकी 2019 मधील रिक्त 5,297 पदे भरण्याला पहिल्या टप्प्यात अनुमती देण्यात आली असून, उर्वरित पदांसाठीचा आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे राज्याच्या आर्थिक स्रोतांवर प्रतिकूल परिणाम झाला होता. त्या पार्श्वभूमीवर 4 मे 2020रोजी एक आदेश काढून वित्त विभागाने सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग वगळता अन्य विभागांनी नवीन कोणतीही पदे भरण्यावर निर्बंध घातले होते. आजच्या आदेशाने गृह विभागाला पोलीस भरतीसाठी त्यातून सूट देण्यात आली आहे.

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस शिपायांची पदे 100 टक्के भरण्याला अनुमती देण्यात येत असल्याचे वित्त विभागाने गुरुवारच्या आदेशात स्पष्ट केले आहे. दिनांक 13 नोव्हेंबर 2020च्या मंत्रिमंडळ बैठकीत पोलीस शिपायांची 2019 मधील रिक्त  5,297 पदे तसेच 2020 मधील 6,726 पदे, मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी 505 अशी एकूण 12,528 पदे भरण्यासाठी आधीचे निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यासंबंधीचा शासन आदेश आज (गुरुवारी) काढण्यात आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.