Nigdi News: यमुनानगर रुग्णालयाच्या विकासासाठी पाच कोटींचा निधी मंजूर करा – प्रा. उत्तम केंदळे 

एमपीसी न्यूज –  सेक्टर नंबर 22 या भागातील यमुनानगर रुग्णालयात विविध सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालयाचे नूतनीकरण  करणे गरजेचे आहे. रुग्णालय अस्तित्वात आल्यापासून   महापालिकेकडून दुर्लक्ष करण्यात आलेला आहे. नेहमीच किरकोळ स्वरूपाचा निधी देण्यात आला. त्यामुळे भौतिक सुविधा विकास करण्यासाठी पाच कोटींचा निधी देण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.

केंदळे यांनी पत्रकात  म्हटले आहे की,गोरगरीब रुग्णांसाठी यमुनानगर रुग्णालय संजीवनी आहे. रुपीनगर, तळवडे, सेक्टर नंबर 22, निगडी, यमुनानगर, त्रिवेणीनगर,सहयोगनगर या भागातील नागरिक खाजगी रुग्णालयात न जाता विश्वासाहर्ता जपल्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असतात.महिला प्रसूतिगृह, ओपीडी वगैरे इतर अनेक उपचार याठिकाणी होतात.

करोनाचे लसीकरण  या ठिकाणी होत आहे.परिसरातील रुग्णांची गर्दी पाहता या ठिकाणी जागा अपुरी पडत आहे. रुग्णालयाची जागा आणि सोयी सुविधा मिळत नसल्याने रुग्णाचे हाल होत आहेत.परिसरातील रुग्णांची संख्या लक्षात घेता येथे नव्याने तात्पुरत्या स्वरूपातील रूम बांधणे अपेक्षित आहे.

कोरोना काळातही या दवाखान्याने रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.या ठिकाणी दवाखान्याच्या आजूबाजूला मोकळी जागा आहे. काही महिन्यापूर्वी मी मागणी केलेल्या स्मशानभूमीसाठी तीन टप्प्यात आपण पंधरा कोटी मंजूर केले आहेत. त्याचप्रमाणे यमुनानगर रुग्णालयासाठी पाच कोटीच काम काढावे अशी मागणी फ प्रभागात झालेल्या बैठकीत  नगरसेवक उत्तम केंदळे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

केंदळे यांच्या मागणीचा विचार करता यमुनानगर रुग्णालय विकसित करण्यासाठी आयुक्त राजेश पाटील यांनी अनुकूलता दर्शवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.