pimpri : आखाडा विधानसभेचा! भाजपच्या राजेश पिल्ले यांची पिंपरीतून जोरदार तयारी

भाजपकडून प्रबळ दावेदार म्हणून पिल्ले यांचे नाव आघाडीवर

एमपीसी न्यूज – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केवळ एका महिन्याचा कालावधी शिल्लक असून सप्टेंबरच्या पंधरवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजप-शिवसेना युतीबाबत शेवटच्या क्षणापर्यंत काही होईल हे सांगता येत नसल्याने पिंपरी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या दक्षिण भारतीय आघाडीचे अध्यक्ष राजेश पिल्ले यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. पक्षाकडून प्रबळ दावेदार म्हणून त्यांचे नाव आघाडीवर आहे.

2014 लोकसभेच्या अगोदर भारतीय जनता पार्टीमध्ये राजेश पिल्ले यांचा प्रवेश दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे व विनोद तावडे यांच्या उपस्थितीत झाला. संपूर्ण महाराष्ट्रामधील हा पहिला प्रवेश होता. दिवंगत राष्ट्रसंत भैय्युजी महाराज यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याशी चर्चा करुन हा प्रवेश घडवून आणला.

2014 च्या विधानसभेला भाजपमधून तीव्र इच्छुक राजेश पिल्ले यांना गोपीनाथ मुंडे यांची पिंपरी विधानसभेसाठी उमेदवारी देऊ अशी भैय्यू महाराजांबरोबर चर्चा झाली होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पिंपरीची जागा आरपीआय लढल्यामुळे राजेश पिल्ले यांना पक्ष संघटनेने प्रदेशावर काम करण्याची संधी दिली.

माजी अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांनी दक्षिण भारतीय आघाडी नव्याने स्थापित करून संघटनेचे काम करण्याची संधी अध्यक्ष रुपाने दिली. पिल्ले यांनी सतत 3 वर्ष महाराष्ट्राच्या 32 जिल्ह्यांमधे दौरा करुन दक्षिण भारतीय लोकांना संघटीत करुन संघटनेची कार्यकारिणी पूर्ण केली. त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर राज्य नेतृत्व समाधानकारक असल्याचे बोलले जात आहे. संघटनेचे काम करत असताना पिल्ले यांच्या वरील राजकीय पातळीवर घनिष्ठ संबंध तयार झालेले आहेत.

कर्नाटक विधानसभा व तेलंगणा विधानसभामध्ये 2 महिने पूर्णवेळ त्यांना पक्षाच्या कामासाठी प्रभारी म्हणून जबाबदारी दिली होती.
पिंपरी-चिंचवड शहरामधे मागील चाळीस वर्षांपासून ते स्थायिक असून त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत उत्तम संबंध आहेत. शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सोबत त्यांचे पंचवीस वर्षांपासून जवळचे संबंध असून जगताप यांचे विश्वासू सहकारी म्हणून संघटनेमध्ये काम करत आहेत. पिल्ले यांचे संघटन कौशल्य असल्यामूळे अनेक जबाबदारी पार पाडत असतात म्हणून भाजपमधील सर्व ज्येष्ठ नेते यांच्या कामाचे कौतुक करत असतात.

राजेश पिल्ले सुशिक्षित अभ्यासू आणि स्वतः खेळाडू आहेत. पिल्ले आणि चोख नियोजन एक समीकरण म्हणून पक्ष संघटनेत सर्व कार्यकर्त्यांबरोबर त्यांचे व्यक्तिगत संबंध आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपतर्फे पिंपरी विधानसभा मतदार संघातून प्रबळ दावेदार मानले जात आहे. पिल्ले यांनी वरिष्ठ पातळीवर चांगली ‘फिल्डिंग’ लावली आहे, अशी चर्चा  आहे. युती न झाल्यास पिल्ले यांची भाजपची उमेदवारी निश्चित असल्याचा दावा पक्षातील कार्यकर्ते करत आहेत. या पार्श्वभूमीवर पिल्ले यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघात मोर्चेबांधणी  केलेली असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.