Hinjawadi : पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पार्किंगची चोख व्यवस्था

एमपीसी न्यूज – शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम मंगळवार (दि. 18) रोजी सायंकाळी पावणे पाच वाजता श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे-बालेवाडी येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी केंद्र आणि राज्यातील अतिमहत्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने पार्किंग व्यवस्था चोख ठेवली आहे. दुचाकी, कार आणि मोठ्या वाहनांची वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे मेट्रोच्या तिस-या मार्गिकेच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय राज्यमंत्री हरदीप सिंह पुरी, पालकमंत्री गिरीश बापट, मंत्री दिलीप कांबळे, विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी येणा-या नागरिकांनी साडेतीन पर्यंत कार्यक्रम स्थळी पोहोचण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

अति महत्वाच्या आणि महत्वाच्या व्यक्तींच्या वाहनांसाठी हॉटेल ऑर्चीड पार्किग मेन गेट मधून प्रवेश देण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार वाहने पार्क करून चालत कार्यक्रम स्थळी येणार आहेत. नागरिक व कार्यकर्त्यांच्या वाहनांना महाराजा गेट मधून प्रवेश देण्यात आला आहे. कारमधून येणा-या नागरिक व कार्यकर्त्यांना हॉटेल ऑर्चिडच्या मागच्या बाजूला कार पार्किंग मध्ये वाहने पार्क करून चालत कार्यक्रम स्थळी जाता येणार आहे. जे नागरिक व कार्यकर्ते बस मधून येणार आहेत. त्यांनी महाराजा गेटवर उतरून कार्यक्रमस्थळी जावे. बस चालकांनी नागरिकांना महाराजा गेटवर सोडल्यानंतर सर्व्हिसरोडने सरळ जाऊन सूर्या अंडरपास मधून यु टर्न घ्यावा. तिथून मिटकॉन येथे पार्किगच्या जागेत बस पार्क कराव्यात.जी वाहने ठरवून दिलेल्या ठिकाणी वाहने लावणार नाहीत, अशी वाहने क्रेनने उचलून पार्किंगच्या ठिकाणी लावण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.