Pune : अट्टल गुन्हेगाराला अटक करून ३७ लाखांचा ऐवज जप्त; देशभरातील १२७ गुन्ह्यांची उकल

एमपीसी न्यूज – एका अट्टल गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून 36 लाख 91 हजार 650 रुपयांचा चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पुणे पोलिसांच्या युनिट पाचने केली. या कारवाईमुळे महाराष्ट्रासह अन्य राज्यातील 127 गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यामध्ये पुणे शहरातील 82 गुन्हे उघडकीस आले आहेत.

सलीम अली हुसेन खान उर्फ मुन्ना कुरेशी उर्फ मोहमद हमीद हबीब कुरेशी (वय 46, रा. सेवन टॉवर रोड, टोली चौकी, हैद्राबाद. मूळ रा. टाटानगर झोपडपट्टी, गोवंडी, मुंबई) असे अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे. त्याचा साथीदार ईश्वर उर्फ चिंट्या शिंदेवळ (रा. येरवडा, पुणे) यालाही अटक केली आहे. या दोघांसह चोरीचे साहित्य विकणारे शरीफ मोहम्मद ख्वाजा मैनुद्दीन शेख, बिलाल उर्फ अशोक गोविंद प्रधान, अब्दुल सत्तार मोहम्मद नजीर अहमद सत्तार, मोघल अन्वर अली करीम बेग, प्रभू कल्लाप्पा नंजवडे (सर्व रा. हैद्राबाद) यांना देखील पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

आरोपी कुरेशी हा मे 2018 रोजी कारागृहातून सुटला होता. त्यानंतर तो महाराष्ट्रासह देशातील मोठ्या शहरांमध्ये विमानाने तर कधी स्वतःच्या आलिशान कारने (एम एच 02 / ए क्यू 0201) जाऊन त्या शहरातील साथीदारांच्या मदतीने चो-या करीत असे. घरफोड्या करून पोलिसांना गुंगारा देऊन तो पसार होत असे. पोलिसांकडे असलेल्या त्याच्या सर्व पत्त्यांवर आणि नातेवाईकांकडे चौकशी करून पोलिसांनी अनेक वेळेला त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पथके तयार करून ती त्याच्या मागावर तैनात केली.

21 जानेवारी 2020 रोजी पुणे गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांना अट्टल चोरटा विमानतळ परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून अट्टल आरोपी कुरेशी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने हैद्राबात येथून पुण्याला काही वेळेला विमानाने तर काही वेळेला कारने येऊन साथीदारांच्या मदतीने चोरी करण्याच्या ठिकाणांची टेहळणी केली. स्वतःकडे असलेल्या साहित्याच्या मदतीने तो चोरी करून चोरी केलेला माल आरोपी साथीदार किंवा स्वतः हैद्राबादला घेऊन जात असे. तपास करत असताना पुणे पोलिसांनी कुरेशीचा पुण्यातील साथीदार ईश्वर याला देखील अटक केली.

चोरी केलेले साहित्य दोघेजण हैद्राबाद येथील त्यांचे साथीदार आणि नातेवाईक यांच्या मदतीने विकत असत. पोलिसांनी त्या साथीदार आणि नातेवाईकांचा शोध घेऊन पाच जणांना आणखी अटक केली.  आरोपींकडून 36 लाख 91 हजार 650 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये 830 ग्रॅम सोन्याचे दागिने, 6 किलो 275 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आहेत. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची तसेच मुद्देमाल सापडण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पुणे, नाशिक, नागपूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे व इतर राज्यात चो-या केल्याचे आरोपींनी सांगितले. पोलीस तपासामध्ये महाराष्ट्रासह अन्य काही राज्यातील तब्बल 127 गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यामध्ये 82 गुन्हे पुण्यातील आहेत. तर अन्य महाराष्ट्रातील अन्य शहरे आणि इतर राज्यातील आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.