Chinchwad : सराईत गुन्हेगाराला अटक; दोन गावठी कट्टे जप्त

चिंचवड पोलीसांची कामगिरी

एमपीसी न्यूज – नाशिक येथील दोन गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या आरोपीला चिंचवड पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली. त्याच्याकडून दोन गावठी पिस्टल आणि तीन काडतुसे असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

चेतन रामलाल कुशवाह (वय 28, रा. इंद्रायणी नगर, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक मधील एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्यातील फसवणुकीच्या दोन गुन्ह्यांमध्ये फरार असलेला आरोपी चेतन चिंचवड रेल्वे स्थानकाजवळ येणार असल्याची माहिती चिंचवड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून चेतन याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे दोन गावठी पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे असा ऐवज मिळाला. त्यावरून त्याला अटक करण्यात आली.

चेतन याच्याविरोधात पिंपरी आणि भोसरी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे आणखी दोन गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्यावर पुणे जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई देखील करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, पोलीस हवालदार पांडुरंग जगताप, पोलीस नाईक स्वप्निल शेलार, विजयकुमार आखाडे, राजेंद्र सिरसाठ, पोलीस शिपाई गोविंद डोके, पंकज भदाने, अमेाल माने, महिला पोलीस नाईक वंदना गायकवाड यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.