Sangvi : फेसबुक पेजवरून कर्ज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणा-यास अटक

सायबर सेलची कारवाई

एमपीसी न्यूज – बनावट फेसबुक पेजद्वारे कर्ज देण्याचे आमिष दाखवून दोघांची फसवणूक करणा-या एकाला अटक केली. ही कारवाई पिंपरी-चिंचवड सायबर सेलने केली. बिरजू दिनकर पाटील (रा. चंदननगर,पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल पारधी यांचा वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय होता. व्यवसायात तोटा होत असल्याने त्यांना कर्जाची गरज होती. त्यांच्या फेसबुक अकाउंटवर Krishnaji Agarwal या नावाने फेसबुक अकाऊंटवरून जीओ फायनान्सची जाहिरात साहिल यांना मिळाली. जाहिरातीत कर्ज देण्याबाबत सांगितले होते. त्यानुसार साहिल यांनी जाहिरातीत दिलेल्या क्रमांकावर फोन केला. आठ लाख रुपये कर्ज हवे असल्याचे सांगितले. समोरच्या व्यक्तीने कृष्णाजी अग्रवाल असल्याचे सांगून जीओ फायनान्समधून कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवले.

कर्ज मंजूर करण्यासाठी प्रत्येक लाख रुपयांचा तीन हजार रुपये कमिशन द्यावे लागेल, असे समोरच्या व्यक्तीने सांगितले. त्यानुसार साहिल यांनी आरोपीला 24 हजार रुपये पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यावर पाठवले. तसेच महत्वाची कागदपत्रे देखील पाठवली. आरोपीने वेगवेगळी करणे सांगून आणखी 15 हजार रुपये भरण्यास सांगितले. साहिल यांनी आणखी 15 हजार रुपये भरले. त्यानंतर आरोपीने साहिल यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन फोन बंद केला. याबाबत पिंपरी-चिंचवड सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.

सायबर सेलने तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे तपास करून बिरजू याला ताब्यात घेतले. त्याने या गुन्ह्यासह तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एक गुन्हा केल्याचे मान्य केले. यावरून त्याला अटक करण्यात आली. बनावट लोन देण्याच्या नावाने इंटरनेटवर असणा-या जाहिरातीची खात्री करूनच लोनसाठी कागदपत्रे द्यावीत. तसेच कोणत्याही कारणासाठी कोणालाही आपल्या बँकेची माहिती व ओटीपी देऊ नये, असे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.

ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुकत श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस उपनिरीक्षक निलेश बोडखे, पोलीस उपनिरीक्षक स्वाती लामखडे, पोलीस कर्मचारी अतुल लोखंडे, भास्कर भारती, नितेश बिचेवार, पोपट हुलगे, कृष्णा गवळी, नाजुका हुलावळे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.