Pune News : रुग्णांच्या नातेवाईकांना डॉक्टर असल्याचे सांगून पैसे लुबाडणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज : ससून रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना डॉक्‍टर असल्याचे सांगत गंडा घालणाऱ्या भामट्याला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. तो नातेवाईकांना फोन करुन रुग्णाला तातडीने महागड्या इंजेक्‍शनची गरज असल्याचे सांगत ऑन लाईन पध्दतीने पैसे भरायला भाग पाडत होता. त्याने आजवर तब्बल 21 जणांना गंडा घातला असून त्याच्याविरुद्द विविध पोलीस ठाण्यात 21 गुन्हे दाखल आहेत.

दोन दिवसापुर्वीच त्याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. अमित जगन्नाथ कांबळे(37,रा.निंबाळकरवाडी, नवी पेठ) असे अटक आरोपीचे नाव आहे. यासंदर्भात सविस्तर असे की, ससून रुग्णालयात गंभीर आजारावर उपचार घेणारे रुग्ण दाखल होत असतात.

आरोपी याचा फायदा घेत रुग्णांच्या नातेवाईकांचा फोन नंबर मिळवत होता. त्या नंबरवर फोन करुन तो डॉ.देशपांडे बोलतोय असे सांगत होता. रुग्णाला तात्काळ इंजेक्‍शनची गरज आहे, संबंधीत इंजेक्‍शन रुग्णालयाच्या स्टॉकमध्ये उपलब्ध नाही. हे इंजेक्‍शन बाहेरुन मागवावे लागणार आहे. मेडीकलवाले माझ्या ओळखीचे आहेत, तुम्ही बाहेरुन इंजेक्‍शन घेतले तर जास्त पैसे जातील. तुम्ही मला ऑनलाईन पैसे पाठवा मी तुम्हाला कमी किंमतीमध्ये इंजेक्‍शन मिळवून देतो असे सांगून तो पैसे उकळत होता.

 यासंदर्भात बंडगार्डन पोलीस ठाण्यात नुकत्याच दाखल झालेल्या गुन्हयात फिर्यादी उमाशंकर तिवारी यांची 22 हजार रुपये व विजय गुदले यांनी 20 हजार रुपये ऑन लाईन घेऊन फसवणूक करण्यात आली होती. तांत्रीक विश्‍लेषणाच्या आधारे त्याला ससून रुग्णालयातून ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस हवालदार शेख, हरीष मोरे, संतोष पगार, पोलीस नाईक रुपेश पिसाल, अनिल कुसाळकर, कैलाश डुकरे, पोलीस शिपाई सागर घोरपडे, किरण तळेकर, अंकुश खानसोळे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.