Pune News : मनसेच्या अ‍ॅड. रूपाली पाटील यांना फोनवर धमकी देणार्‍याला सातार्‍यातून अटक

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार अ‍ॅड. रूपाली पाटील ठोंबरे यांना फोनवरून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्याला खडक पोलिसांनी सातार्‍यातील मेढा येथून अटक केली आहे. मोहन अंबादास शितोळे (51) असे आरोपीचे नाव आहे. तो देवऋषी म्हणून मिरवतो. खडक पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल होती.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला अध्यक्षा रूपाली पाटील या मनसेकडून पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवत आहेत. त्यांनी नुकताच सातारा जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर शनिवारी (दि. 21) त्यांना दाभाडे नावाच्या व्यक्तीने फोन करून ‘मी सातारा जिल्ह्यातून बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीने आमदार होण्याचा प्रयत्न करू नकोस. अन्यथा पुण्यात जिथे असशील तिथे संपवून टाकू,’ अशी धमकी दिली होती. याबाबत रुपाली पाटील यांनी पोलिसात तक्रार दिली होती.

खडक पोलीस या गुन्ह्याचा तपास करताना त्यांनी मोबाईल लोकेशनवरून पंढरपूर गाठले. परंतु, तेथे पोहचल्यानंतर त्यांना समजले की, एका कडून हा मोबाईल हरविला असल्याचे समजले. पुढे हाच धागा पकडत खडक पोलिसांनी तपास सुरू ठेऊन आरोपी शितोळे हा सातार्‍यातील मेढा येथे असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन त्याला ताब्यात घेऊन अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.