Dharmveer : धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे, एक सुपरहिट अनुभव!

एमपीसी न्यूज (हर्षल विनोद आल्पे) – धर्मवीर! (Dharmveer) खूप दिवसांनी आपल्या मराठी भाषेत एक परिपूर्ण असा चित्रपट तयार झाल्याचा आनंद वाटतो आहे. ज्यात सर्व काही आहे, एका चित्रपटात जे काही आवश्यक असते ते सगळे या चित्रपटात आहे. खरं सांगायचे तर सामान्य प्रेक्षकांना प्रबोधन आणि मनोरंजनाची अपेक्षा असते आणि गंमत म्हणजे हा चित्रपट ती अपेक्षा पूर्ण करतो.

धर्मवीर (Dharmveer) आनंद दिघे साहेब हे ठाण्यातील अत्यंत प्रेम आणि आदराने घेतले जाणारे नाव. केवळ इतकंच नव्हे तर अनेकांच्या घरातील देवघरात ज्यांची भक्तिभावाने पूजा केली जाते, असे देवत्व प्राप्त झालेले राजकीय व्यक्तिमत्व. त्यांचा चरित्रपट उलगडायचा म्हणजे काही खायचे काम निश्चितच नव्हे. ते एक पेललेले शिवधनुष्यच म्हणायला हवे नाही का..?

ज्यावेळी हा चित्रपट करायचे डोक्यात आले असेल चित्रकर्त्यांच्या, त्यावेळी हे खूप मोठे धाडस आहे याची जाणीव चित्रकर्त्यांना निश्चित असेल. अभिनेता मंगेश देसाई याने हा चित्रपट निर्मित करायचे ठरवले आणि त्यांनी जमवाजमव सुरु केली. संवेदनशील लेखक आणि प्रभावशाली दिग्दर्शक असलेले प्रवीण तरडे यांची त्यांना समर्थ साथ लाभली.

Pune News : स्मृती इराणी यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 40 ते 50 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

बाकी सगळ्या पात्रांसाठी कलाकार मिळाल्यावर मुख्य भूमिका म्हणजेच दिघे साहेबांच्या भूमिकेसाठी त्यांना योग्य कलाकार मिळाला अन तो म्हणजे अभिनेता प्रसाद ओक. आणि चित्रपट पाहाताना त्याची निवड त्याने अत्यंत योग्य रीत्या सार्थ ठरवली आहे. सर्वात प्रथम म्हणजे त्याचे दिसणे, यासाठी त्याने आणि मेकअपमन विद्याधर भट्टे यांनी अपार मेहनत घेतल्याचे दिसते.

या चित्रपटातील प्रसाद यांची भूमिका नट म्हणून खूप काही शिकवणारी आहे. दिघे साहेबांच्या बारीकसारीक हालचाली, बोलण्याची पद्धत त्यांनी बेमालूम पद्धतीने सादरीकरण म्हणजे चित्रपट संपल्यावर बाहेर पडताना आपल्याला दिघे साहेब म्हणून प्रसाद ओकच डोळ्यासमोर तरळत राहातो आणि त्यांच्या प्रभावशाली भूमिकेची हीच पोचपावती आहे.

बाकीच्या सर्वच कलाकारांनी त्यांना समर्थ साथ दिली आहे. विशेषत: आनंद दिघे साहेबांचे जवळचे शिलेदार असलेले मंत्री एकनाथ शिंदे साहेबांची महत्त्वाची भूमिका करत असलेले क्षितीज दाते यांनी त्यांची भूमिका फारच उत्तमरीत्या सादर केली आहे तसेच अभिनेता मकरंद पाध्ये यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेत कमाल केली आहे. मो दा जोशी या महत्त्वाच्या भूमिकेत विजय निकम अगदी सहजरीत्या वावरलेले आहेत.

चित्रपटाच्या लेखनात आणि दिग्दर्शनात उणीव काढायला जागाच नाही. लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी करून फारच उत्तमरीत्या आणि प्रामाणिकपणे ही कलाकृती सादर केली आहे .

जी गोष्ट लेखन आणि दिग्दर्शनाची तीच गोष्ट संगीताची ही आहे. चित्रपटातील सर्वच गाणी छान जमली आहे. चिनार महेश आणि विश्वजीत/अविनाश नंदेश उमप यांनी फारच उत्तम संगीत दिले आहे. विशेषत: गुरुपोर्णिमा आणि अष्टमी, आणि सगळ्यात शेवटी प्रत्येकाच्या डोळ्यात हमखास पाणी येणारे गाणे “माझा आनंद हरपला” ही गाणी हृदयाचा ठाव घेतात. या सर्वच गाण्यांचे चित्रण ही अप्रतिम झाले आहे. यातील गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन उमेश जाधव यांनी अफाट केले आहे.

Pune News : रस्त्यावरील पार्कींगसाठी मोजावे लागणार जास्त पैसे

सिनेमाचे छायाचित्रण केदार गायकवाड यांनी अतिशय सुंदररीत्या केले आहे. चित्रपटाच्या परिभाषेत जिथे जिथे मौखिक संवाद टाकण्यापेक्षा कॅमेरा बोलला पाहिजे, तिथे तिथे गायकवाड यांचा कॅमेरा अप्रतिमरीत्या बोलला आहे. संकलनाच्या बाबतीत थोडी कात्री कमी चालली असती तरी चालली असती. काही प्रसंग पटकन गेल्यासारखे वाटतात. अर्थात या मागे काही विचार मयूर हरदास यांचा निश्चित असेल.

पण एकूणच या चित्रपटाचा (Dharmveer) परिणाम फारच सुंदर आहे. हा चित्रपट प्रत्येकाने एकदा तरी बघायलाच हवा. खूप दिवसांनी इतका सुंदर आणि आपल्याला खूप काही देऊन जाणारा चित्रपट सिनेमागृहात जाऊनच बघायला हवा

इतकेच….!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.