Article by Hurshal Alpe : धर्म, मंदिर, मस्जीद आणि एक वेगळाच दृष्टीकोन!

एमपीसी न्यूज (हर्षल विनोद आल्पे) – सध्या चालू असलेल्या घटनांबद्दल खूप दिवसांनी माझ्या एका मित्राशी चर्चा झाली. हा मित्र माझ्यापेक्षा साधारण 15 एक वर्षांनी लहान आहे आणि आत्ताच्या भाषेत सांगायचे तर मिलेनियल आहे. खरं तर त्याचा दृष्टीकोन हा तसा वेगळाच आहे. प्रवाहाच्या विरुद्ध पोहणे त्याला नेहमीच आकर्षित करते. “याने काय होईल”हे त्याचे आवडते पालुपद आहे. काहीही ऐकले की पहिले हे पालुपद आलेच पाहिजे आणि दुसरे म्हणजे “so what ???” हा प्रश्न जोडीला आहेच!

भल्याभल्यांच्या तर्कांना हा “याने काय होईल” या प्रश्नाने गपगार करतो. त्यादिवशी आम्ही असेच गप्पा मारत होतो आणि आमच्यात एक आजोबा येऊन बसले आणि तावातावात काशी, मथुरा, अयोध्या आणि इतर बऱ्याच ऐतिहासिक माहित असलेल्या आणि नसलेल्या गोष्टींबद्दल बोलायला लागले. कसे इतिहासात जुलमी राजवटींनी आपली मंदिरे तोडून मशिदी केल्या, आपल्या धर्माची प्रतीके कशी नष्ट करण्यात आली? आणि आता ती कशी आपण परत मिळवतोय, असे सगळे ते आजोबा बोलत होते.

दरम्यान, आमचा हा मित्र… त्याने सगळे ऐकून घेतल्यावर त्यांने त्याचा नेहमीचा प्रश्न न राहवून विचारलाच, “की याने होईल काय? समजा ही सगळी मंदिरे असल्याचे सिद्ध झाले, त्याने पुढे सामान्य माणसाला मिळणार काय? त्याच्या समस्या लगेच कमी होतील का? महागाई कमी होईल का?” या मित्राची प्रश्नांची सरबत्ती अशी सुरू झाली की संपण्यातचे नाव घेईना… अखेर महागाईचा विषय आल्याबरोबर आजोबा शांतच झाले. शेवटी महागाईची झळ त्यांना ही पोहोचतच होती, पण तरीसुद्धा ही ते नवीन तर्क शोधत होते जे त्यांच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होते.

प्रश्नांची सरबत्ती सुरू असताना आमच्या मित्राचा तर्काचा अजून एक बाण बाहेर आला तो म्हणाला, “माननीय न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने लागला नाही तर?”

आजोबा म्हणाले लगेचच उत्तरले, “दंगल होईल, लोक हे सहनच करू शकणार नाही”

त्यावर मित्र म्हणाला “आमची पिढी खरतर या भानगडीत पडेल का? मला शंका आहे , कारण या सगळ्याने होणार काय आहे? हे मात्र आमच्या पिढीला कोडे आहे. आमची पिढी ज्ञानाच्या बाबतीत जास्त चौकस आहे. त्यांना हवे तेवढे ज्ञान आज उपलब्ध आहे. एखाद्या प्रश्नाचे उत्तर ते त्यांना हव्या त्या पद्धतीने लगेच मिळवू शकतात. मग आम्ही का रस्त्यांवर दगड घेऊन उतरायचे?” या प्रश्नाचे उत्तर त्या आजोबांकडेच काय, माझ्याकडे ही नव्हते. आम्ही एकमेकांकडे पाहत बसलो.

हा सगळा विचार सुरु असतानाच माझे माझ्या इतिहास संशोधक मित्राकडे जाणे झाले. तेव्हा ही तिथे हा विचार सुरूच होता. त्याच्याशी बोलल्यावर तर माझ्या गोंधळात अजूनच भर पडली. तो म्हणाला परकीय आक्रमणं होण्याआधी अन् मुघलांच्या ही आधी धर्माधर्मामध्ये तेढ होती, शीतयुद्ध सुरु होती. काही दुसऱ्या धर्माच्या प्रार्थनास्थळाच्या जागेवर आपल्या धर्माची मंदिरे उभारली गेल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. मग ती ही जमीनदोस्त करावीत का? असा प्रश्न त्त्याने उपस्थित केला. मी त्याच्याशी वाद घातला पण आतून मला तसे काही जास्त मुद्दे सुचत नव्हते. (अभ्यास कमी असल्यामुळे म्हणा किंवा आजवर झालेल्या संस्कारामुळे परंपरागत दृष्टीकोन सुटता सुटत नव्हता.) बरं.. त्या संशोधक मित्राची माझ्याबरोबर त्याचा अभ्यास शेअर करण्याची पूर्ण तयारी होती. वेळ हा माझ्याकडेच नव्हता. नंतर कधीतरी त्यांच्याकडे जाईन या विचाराने हा विषय तात्पूरता बाजूला सारला.

सध्यातरी वाढत्या महागाईमुळे पोटापाण्याच्या सोयीकडे जास्त लक्ष द्यावंस वाटतंय, त्याच्याचसाठी देवाकडे प्रार्थना करणारे आम्ही. साध्या साध्या अडचणींमुळे जीव मेटाकुटीला येत असताना देऊळ आणि मस्जितच्या या वादात बाजू कोणाची खरी हे विचार करायला वेळच नाही. काय वाटतं मंडळी…?

कालाय तस्मै नम:

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.