Article by Rajan Wadke : जाणून घ्या रशिया-युक्रेन युद्धाचे मूळ! (Video)

एमपीसी न्यूज (राजन वडके) – गेली अनेक वर्षे धुसफूस सुरू असलेल्या युक्रेन आणि रशिया या दोन देशांच्या वादावर गेल्या 22 फेब्रुवारी 2022 ला युद्धाची ठिणगी पडली.  रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी त्या दिवशी युक्रेनच्या पूर्वेकडील  लुहान्स्क आणि दोनेत्स्क या दोन प्रांतांचे स्वातंत्र्य जाहीर केले. त्यांनी केलेल्या या  घोषणेमुळे जागतिक राजकारण ढवळून निघाले. रशिया युक्रेनवर हल्ला करणार नाही, हा अमेरिकेचा दावा 24 तारखेला युक्रेनवर लष्करी कारवाई सुरू करत पुतिन यांनी फोल ठरवला. त्यानंतर दोन्ही देशांत सुरू झालेल्या युद्धांत गेल्या दहा दिवसांत  शेकडो नागरिकांचा बळी गेला असून, मोठी वित्तहानी झाली आहे. जागतिक राजकारणाबरोबरच अर्थकारणावरही याचे परिणाम जाणवू लागले आहेत. युरोपीय देश आणि रशियाच्या मध्ये असलेल्या युक्रेनला आपल्या सुरक्षा आणि अर्थकारणाच्या  दृष्टीने  दबावाखाली ठेवणे विस्तारवादी रशियाच्यादृष्टीने महत्वाचे आहे. या दोन देशांत युद्ध तर सुरू झाले. मात्र, याची झळ आता युक्रेन व रशियासह जगभरातील सर्वसामान्य नागरिकांना बसू लागली आहे. काय आहे, युक्रेन आणि रशिया यांच्या या युद्धाचे मूळ? जाणून घेऊयात…

 

 

युक्रेनच्या पूर्वेकडील लुहान्स्क आणि दोनेत्स्क या दोन प्रांतांमधील युक्रेनच्या लष्कराचे अस्तित्त्व आपल्याला संपुष्टात आणायचे असल्याचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी म्हटले होते. 2014 मध्ये या दोन्ही भागांचा ताबा फुटीरतावाद्यांनी घेतल्यापासून त्यांनी दोनेत्स्क पिपल्स रिपब्लिक (Donetsk People’s Republic – DNR) आणि लुहान्स्क पिपल्स रिपब्लिक (Luhansk People’s Republic – LNR) च्या स्थापनेची घोषणा केली. या दोन्ही प्रांतांच्या सीमा रशियाला लागून आहेत.

या दोन्ही प्रांतांनी स्वतंत्र अस्तित्त्वं जाहीर केले असले तरी आर्थिक आणि लष्करी पाठबळासाठी ते पूर्णपणे रशियावर आवलंबून आहेत. हे दोन्ही प्रांत ‘ताप्तुरता ताबा असलेले प्रदेश’ म्हणजेच “temporarily occupied territories” असल्याचा दावा युक्रेनने केला आहे. क्रायमियाबाबतही युक्रेनचे हेच म्हणणे आहे.

रशियाने 2014 मध्ये इथे घुसून या भागाचा ताबा घेतला. दोनेत्स्क पीपल्स रिपब्लिक आणि लुहान्स्क पीपल्स पब्लिकमध्ये 2018 मध्ये निवडणुका झाल्या. परंतु, या निवडणुकांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली नाही. या निवडणुकीत विजयी झालेल्या डेनिस पुशिलिन आणि लिओनिड पेसाश्निक या दोघांनीही आपल्या प्रांतांनी रशियाचा भाग व्हावे, असे आवाहन केले. पुतिन यांना युक्रेनविषयी एवढा आकस का वाटतो? याचं उत्तर या दोन्ही देशांचा इतिहास, संस्कृती, सुरक्षा आणि अर्थकारणात दडले आहे.

काय आहे युक्रेन आणि रशियाचा इतिहास?

या सगळ्या प्रकरणाची सुरुवात नवव्या शतकापासून होते, जेव्हा पूर्व युरोपात स्लाविक वंशाच्या टोळ्यांचा देश किवान रुस अस्तित्वात आला. आजच्या युक्रेन, रशिया आणि बेलारूस या देशांचा जन्म याच किवान रुसमधून झाला, असे येथील लोक मानतात. दहाव्या शतकात किवान रूसचा राज्यकर्ता प्रिन्स वोलोदिमीर होता, प्रिन्स व्लादिमीर द ग्रेट म्हणूनही तो ओळखला जातो. त्याने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करून प्रसारही केला. रशिया तसेच युक्रेनसह अनेक देशांत तो संत व्लादिमीर म्हणूनही ओळखला जातो. जवळपास चार शतके या किवान रूसचे वर्चस्व या देशांवर कायम होते. मात्र, किवान रूसच्या पाडावानंतर वर्चस्व संपले. पूर्व युरोपात वेगवेगळ्या प्रादेशिक सत्ता निर्माण झाल्या. मंगोल साम्राज्य, पोलंड अशा बाहेरच्या सत्तांचे वर्चस्व या प्रदेशावर होते. सतराव्या आणि अठराव्या शतकात युक्रेन पुन्हा रशियन साम्राज्याचा भाग बनला.

सोव्हिएत कालखंडातील युक्रेन

1917 मध्ये रशियन राज्यक्रांतीनंतर तिथली राजेशाही संपुष्टात आली. मग 1922 मध्ये कम्युनिस्ट म्हणजे साम्यवादी विचारसरणीच्या सोव्हिएत युनियनचा (युनियन ऑफ सोव्हिएत सोशिअॅलिस्ट रिपब्लिक्स) उदय झाला. त्यावेळी युक्रेन या सोव्हिएत युनियनच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होता. युक्रेन आणि रशिया हे दोन देश सोव्हिएत युनियनचा भाग म्हणून तब्बल 69 वर्षे एकत्र राहिले. सोव्हिएत युनियन आणि अमेरिकेच्या शीतयुद्धाच्या काळात युक्रेन हा अमेरिकेच्या विरोधात होता. मात्र, काळात युक्रेन आणि सोव्हिएत युनियन दोन देशांचे संबंध फारसे चांगले नव्हते. 1932-33 मध्ये युक्रेनमध्ये पडलेल्या मोठ्या दुष्काळात लाखो लोकांचा मृत्यू झाला. होलोडोमोर नावाने ओळखला जाणारा तो दुष्काळ मानवनिर्मित होता. त्याला सोव्हिएत युनियनची धोरणे जबाबदार असल्याचा आरोप आजही युक्रेनचे अनेक नागरिक करतात.

दरम्यान सोव्हिएत युनियनमधील गरिबी, अमेरिकेबरोबरच्या आणि अंतर्गत शीतयुद्धाचे दुष्परिणाम आणि साम्यवाद मागे पडून नव्या विचारांचा झालेला उदय, सोव्हिएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी त्यावेळी स्वीकारलेले बदल यामुळे अखेर 1991 मध्ये सोव्हिएत युनियनचे 15 देशांमध्ये विघटन झाले. युक्रेनने स्वातंत्र्य जाहीर केलं. या सर्व गोष्टींची सल व्लादिमीर पुतिन यांच्यासारख्या काही रशियन नेत्यांच्या मनात तीस वर्षांनंतरही कायम आहे.

रशियाच्या दृष्टीने युक्रेनचे भौगोलिक आणि सामरिक महत्त्व

युक्रेनची राजधानी कीव्ह आणि रशियाची राजधानी मॉस्कोमधलं अंतर केवळ 800 किलोमीटर आहे. सोव्हिएतच्या पाडावानंतर रशिया हा युक्रेनकडे पूर्व युरोपातील देशांना जोडणारा मुख्य दुवा आणि पाश्चिमात्य देशांना दूर ठेवणारा ‘बफर झोन’ म्हणून पाहात आला आहे. साहजिकच युक्रेन सामरिकदृष्ट्या कायमच रशियासाठी अतिशय महत्त्वाचा राहिला आहे. शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत युनियनचा मोठा अण्वस्त्रसाठाही युक्रेनमध्येच ठेवला होता. काळा समुद्र आणि भूमध्य सागरातील आपल्या व्यापारी मार्गांचा विचार करता युक्रेन आपल्या बाजूने आणि दबावाखाली असणे हे रशियासाठी कायमच प्राधान्याचे राहिले आहे. या बफर झोनमध्ये `नाटो` अर्थात नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन फौजा आल्यास ते रशियाला दिलेलं थेट आव्हान समजून योग्य उत्तर देऊ, असा पवित्रा पुतिन यांनी घेतला आहे. युरोपियन राष्ट्रांनी युक्रेनला शस्त्रास्त्रे पुरवणेही त्यांना मान्य नाही.

इथे हे लक्षात घ्यायला हवे, की युक्रेन हा युरोप खंडाचा भाग असला, तरी तो युरोपियन युनियनचा सदस्य नाही. हा देश `नाटो` राष्ट्रगटांतही नाही. एवढ्यात तो सदस्य होण्याची शक्यताही नही. तसेच जर्मनी व फ्रान्स त्यास मान्यता देणार का , हा ही प्रश्न आहे.मात्र गेल्या काही दशकांत कीव्हमध्ये युरोपीय विचारांचा प्रभाव वाढत गेला आहे. त्यामुळे रशिया समर्थक आणि युरोप समर्थक दोन गट देशात पडले आहेत. काही तज्ञांच्या मते युक्रेनमध्ये ही विभागणी आधीपासूनच होती. कारण एक देश असला, तरी युक्रेन भाषिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या एकसंध नव्हता. युक्रेनच्या पश्चिम आणि मध्य भागात युक्रेनियन भाषा बोलली जाते. तर दक्षिण आणि पूर्व भागातील प्रांतांमध्ये प्रामुख्याने रशियन मातृभाषिक लोक राहतात. भाषेशी निगडीत असलेली हीच ओळख 2014 मध्ये संघर्षाचे कारण ठरली. त्यानंतर युक्रेनमध्ये युरोप समर्थक सत्तेत आले. त्यावेळी रशियन भाषिक क्रायमिया द्वीपकल्पाने रशियात जाण्याचा निर्णय घेतला.

महत्त्वाकांक्षी पुतिन

रशियाला पुन्हा प्रभावशाली बनवण्याचा आपला उद्देश पुतिन यांनी कधीच लपवून ठेवला नाही. अध्यक्षपदावर असताना आपल्या पहिल्या भाषणात पुतिन यांनी, आपण देशाला नवा आकार देणार असल्याचा उल्लेख केला होता, हे लक्षात घेतले पाहिजे. सर्व रशियन लोकांना एकत्र आणणारा नेता, अशी ओळख निर्माण करण्यासाठी ते उत्सुक आहेत. त्यामुळे युक्रेन परत मिळवायच्या महत्वाकांक्षेने पुतिन यांना पछाडले असल्याचे निरीक्षण रशियाविषयीच्या आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांनी नोंदवले आहे. या महत्वाकांक्षेपोटीच सोव्हिएत युनियनचा भाग असलेल्या जॉर्जियावर पुतिन यांनी 2008 मध्ये हल्ला केला होता. तेव्हापासून जॉर्जियाचे साऊथ ओसेटिया आणि अबखाझिया हे भाग रशियाच्या नियंत्रणाखाली आहेत, याची ही नोंद घेणे महत्वाचे ठरते.युक्रेनविषयीही पुतिन यांची मते आणखी तीव्र आहेत आणि त्यांनी ती अनेकदा स्पष्टपणे मांडली आहेत. युक्रेनमधल्या रशियन भाषिकांचे ते वेळोवेळी समर्थन करत आले आहेत. त्यामुळेच त्यांनी क्रायमियाचे रशियात विलिनीकरणाचा निर्णय घेतला होता.

आता सात वर्षांनी पुन्हा एकदा तशीच स्थिती निर्माण झाली आहे. पुतिन यांनी दोनेस्क आणि लुहान्स्का या युक्रेनमधल्या फुटिरतावादी प्रदेशांचं स्वातंत्र्य मान्य केले आहे. युक्रेन आणि रशियात युद्ध पेटले आहे. या पार्श्वभूमीवर `नाटो`च्या फौजा युक्रेनच्या आणि पर्यायानं रशियाच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या महायुद्धाची शक्यता व्यक्त करण्यात येत असली तरी, बहुतांश देश सद्यःस्थितीत युद्ध करण्याच्या मनःस्थितीत नाहीत. सर्वांनीच सावधगिरीचा पावित्रा घेतला आहे. दोन्ही देशांनी सामंजस्याची भूमिका स्वीकारावी, असे आवाहन केले जात आहे. या दोन देशांच्या संघर्षाचे जागतिक अर्थकारणावर परिणाम दिसू लागले आहेत. दोन्ही देशांत युद्धविराम होणे गरजेचे आहे. अन्यथा आधीच कोरोना महामारीमुळे पोळलेल्या सर्वसामान्य नागरिकांना महागाईचे चटके असह्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.