Article by Sanjeevani Kamble : शिक्षणाचा जागर – स्वातंत्र्याचा जोगवा

एमपीसी न्यूज – समाजात पूर्वीपासूनच मुलींविषयी असलेली अनास्था आणि त्यांच्यासोबत होत असलेला अन्याय आणि दुजाभाव या भावना अजूनही बदललेल्या नाहीत. याच परिस्थितीवर मात करत फक्त स्वतःच्याच नाही तर आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठीही झटणाऱ्या संजीवनी साळूबाई कांबळे हिची कहाणी तिच्याच शब्दात…

————-

तुमची मुलगी आता खूप मोठी झाली, तिचे लग्न का नाही लावून देत? आम्ही तर आमच्या मुलींचं 18 वर्षाच्या आतच लग्न लावून दिलं, ज्याची त्याची अमानत ज्याच्या त्याच्या घरी गेलेली बरी, मुली शिकून काय करतील? शिकलेल्या मुली नाक घालवतात. अशा अनेक गोष्टी अजूनही मागास समाजात मुलींच्या आई-बापाला ऐकाव्या लागतात.

सोबतच समाजात मुलींविषयी सुरु असणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या घटना ऐकल्या की, मग ती घटना देशाच्या किंवा जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात घडलेली असली तरी तिचा परिणाम गावकुसातील, वाड्यावस्तीतील मुलींवरच नाही तर स्वतःला प्रतिष्ठित म्हणवून घेणाऱ्या व घराची अब्रू कायम मुलींच्या शरीरामध्ये सामावून ठेवणाऱ्या समाजातील मुलींवर जास्त होताना आपल्याला दिसतो. अशी कुठेही मुलींवर अन्याय घडल्याची घटना ऐकीवात आली कि या समाजातील मुलींचे सर्वात आधी शिक्षण थांबवले जाते आणि पटापट लग्न करून दिलं जातं.

काय कमाल आहे ना, ज्या शिक्षणाने मुलांना स्वावलंबी बनविले जाते, समाजात जगण्यासाठी लायक बनविले जाते तेच शिक्षण जर मुलीने घेतले तर ती अतिशहाणी होते, ती शिक्षणाचा गैरवापर करेल की काय, अशी भीती समाजाच्या मनात निर्माण होते. म्हणजे स्त्री किंवा मुलगी जेवढी गरीब गाय असेल, जेवढं ती इतरांचा ऐकत असेल तेवढीच ती सगळ्यांना आवडणारी होते, कारण ती समाजाला अपेक्षित असणाऱ्या स्त्री प्रमाणे दुसऱ्यावर अवलंबून राहिली की, ती समाजाला आदर्श स्त्री / मुलगी वाटू लागते. आणि हे आपल्याला सगळीकडे दिसतं. कोणतीही टीव्ही मालिका तुम्ही घ्या, त्याच्यात बहुतांश शिकलेल्या आणि शहरातील मुली या वाया गेलेल्या आणि खलनायिका दाखविल्या जातात तर गावातील, बिचारी, अडाणी मुलगी ही अन्याय सहन करून करून प्रत्येकाच्या मनात घर करते. थोडक्यात काय तर स्त्रियांना इतरांच्या मनात घर करायचे असेल तर त्यांना काही काळ नव्हे आयुष्यातील उमेदीची अनके वर्ष अन्याय सहन करावा, अशी समाजाची अपेक्षा असते.

याचे जिवंत उदाहरण म्हणजे माझा जीवन प्रवास आहे, मी लहान असतानाच माझे वडील वारले, आई अशिक्षित असल्यामुळे, तिच्या हातात कमाईचे काहीच साधन नव्हते आणि नाही. तिच्या पदरात आम्ही तिघी बहिणी. त्यातच आईने समाजाच्या दबावाला बळी पडून , बहिणीचे लग्न ती वयात आल्या आल्या उरकून टाकलं , कारण बाप नसलेल्या मुलींना संभाळणं म्हणजे किती जोखीम. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळं रोज पोट भरणं मुश्कील तर शिक्षणाला पैसा कुठून आणणार म्हणून मी दहावीत असल्यापासूनच सुट्ट्यांमध्ये काम करून स्वतःच्या शिक्षणाची जबाबदारी स्वतः घेतली. आत्ता मी S.Y.Bcom या वर्षांमध्ये शिकते आहे. काम करता करता मी फक्त माझ्याच शिक्षणाची जबाबदारी घेतली नाही तर माझ्या लहान बहिणीच्या देखील शिक्षणाची जबाबदारी मीच घेतली आणि याचा मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो.

या संपूर्ण प्रवासात मी वर्क फॉर इक्वॅलिटी या संस्थेच्या संपर्कात आले. त्यामुळे जगातील माझ्या वयातील मलाला युसूफझाई,  जिने मुलींना शिक्षण मिळावं म्हणून एवढ्या लहान वयात जीवाची पर्वा न करता, धर्मवेड्या लोकांच्या विरोधात एकटी नेटाने उभी राहिली, आणि पर्यावरणाचे संरक्षण करणारी व खंबीरपणे मोठ्यांना “तुम्ही आमच्या पिढीची वाट लावली” असं निक्षून सांगणाऱ्या ग्रेटा थन्बर्ग सारख्या अशा अनेक मुलींविषयी मला समजलं त्यामुळं माझा पुढे जाण्याचा उत्साह आणि ताकद शंभर पटीनं वाढली.

आपण काहीही करू शकतो हा आत्मविश्वास वाढला आणि आता थांबायचं नाही, स्वतःसाठीच नाही तर समाजातील अशाच माझ्यासारख्या मुलींना सोबत घेऊन आपली ताकद वाढवायची आणि समाजात मुलींवर होणारे अन्याय, अत्याचार थांबविण्यासाठी खूप काम करायचे, मुलींना शिक्षणाची संधी मिळण्यासाठी आणि त्यांचे बालविवाहासारख्या कुप्रथांमधून सुटका करण्यासाठी खूप काम करायचे असे ठरवले. पण हा निर्धार करतांना समाजातून शिक्षण थांबविण्यासाठी आणि लवकर लग्न करण्यासाठी येणारा दबाव मुलींसाठी खूपच त्रासदायक असतो. शिक्षणामुळे नवीन विचार समाजात रुजविताना समाजाच्या रोषाला आणि नाचक्कीला पण समोरं जावं लागतं.

कधीकधी खूप मनस्ताप होतो असं वाटतं हे सर्व सोडून समाजाने जे सांगितलं ते मुकाट करावं. पण अशावेळी मला अन्यायाला झुगारून न्यायासाठी बंड करणाऱ्या, स्त्रियांच्या सन्मानाला तिलांजली देणाऱ्या रूढी परंपरा विरोधात लढणाऱ्या सावित्रीमाईंचे रूप आठवते आणि पुन्हा मी नवीन जोमाने शिक्षणाचा जागर आणि मुलींच्या स्वातंत्र्याचा जोगवा मागण्यासाठी कंबर कसून लढायला तयार होते.

– संजीवनी साळूबाई कांबळे
S. Y. Bcom, वय 18 वर्षे
सल्लागार समिती विश्वस्त
वर्क फॉर इक्वॅलिटी सामाजिक संस्था

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.