Article by Vinita Deshpande: रंगवल्ली

भारतीय संस्कृतीत परंपरागत एकूण ६४ कलांचा उल्लेख आढळतो. प्रत्येक कलेचे अंगभूत वेगळे वैशिष्ट्य आहे. या कला मानवी जीवनाशी एकरूप झालेल्या आहेत. श्री गणपतीला हा १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती मानले जाते. स्थापत्य, शिल्प, नाट्य, संगीत, चित्रकला अशा विवध ६४ कला आहेत. आज जागतिक कला दिन आहे त्यानिमित्त भारतीय संस्कृतीत विशेष महत्व असलेल्या आणि चित्रकृतीच्या प्रकारात मोडणाऱ्या रंगवल्ली अर्थात रांगोळी या कले विषयी जाणून घेऊयात…  विनिता श्रीकांत देशपांडे (लोकसंस्कृतीच्या अभ्यासक आणि सहसंयोजक प्राचीन कला विधा, संस्कार भारती, महाराष्ट्र प्रांत) यांचा विशेष लेख…


रंगवल्ली

मानवातील कुतूहल आणि सर्जनशीलतेची कलात्मक अभिव्यक्ती म्हणजे भू-अलंकरण. काळाच्या प्रवाहात मानवाच्या जाणिवांच्या कक्षा रुंदावत गेल्या आणि निसर्गाच्या शक्तीचे मानवाला अवलोकन झाले, पंचमहाभूत तत्व अर्थात पृथ्वी, आप, वायु, तेज आणि आकाश यांचे महत्व लक्षात आले. या तत्वामुंळे आपले जीवन समृद्ध होते मात्र या तत्वांचा कोप अर्थात नैसर्गिक आपत्ती विनाशाचे कारण ठरते याची प्रचिती येताच मानव या तत्वांची पूजा-अर्चा करु लागला. उपलब्ध

साधनांचा वापर करुन आपल्या भवतालच्या परिसरात- अंगणात, भिंतीवर, तो आपल्या भावना आपले विचार व्यक्त करु लागला. ते करत असतांना अनाहूत कलेचे संकेत तयार होत गेले. एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे असा अभिव्यक्तीचा अर्थात कलेचा प्रवास सुरु झाला.  प्रत्येक पिढी त्यात आपली भर घालत होती. सरळ रेषा, वक्र रेषा, बिंदू, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, अर्धवर्तुळ यांच्या संयोगाने विविध आकृत्या तयार होत गेल्या. त्या आकृत्यांमध्ये विशिष्ट प्रमाणबद्धता आकार घेऊ लागली. आणि मग विविध आकाराचे आकृतिबंध तयार झाले. या आकृतिबंधात सामान्यत: सभोवतालच्या निसर्गातील घटकांचे प्रतिकात्मक रेखाटन आढळून येतात.

विविध भूअलंकरण प्रकारांमध्ये सर्वत्र प्रचलित आणि सर्वाधिक लोकप्रिय आहे ती म्हणजे रंगवल्ली अर्थात रांगोळी, अखंड भारताला एका सूत्रात गुंफणार्‍या घटकांपैकी एक महत्वाचा घटक. या कलेच्या उत्पत्तीचा निश्चित काळ सांगणे कठिण आहे. संशोधक आणि तज्ञ मंडळींच्या मते रंगवल्ली  मूर्तिकला आणि चित्रकला पूर्वी अस्तित्वात असावी. धर्माच्या अनुषंगाने या कलेचा उगम झाला असे मानले जाते.

भारतात सर्वत्र आपल्याला रांगोळीचे विविध आकार आणि प्रकार बघायला मिळतात. रांगोळी, निसर्गाप्रती मानवाने प्रकट केलेली कृतज्ञता, समृद्धी आणि आनंद व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे. रांगोळी काढण्यामागचा उद्देश्य आपल्या आसपासचा परिसर सुशोभित करणे आणि मांगल्याचे प्रतीक अंकित करणे असा दिसून येतो. सर्वसामान्यांची कला आणि सौंदर्यदृष्टी हे रांगोळीचे वैशिष्ट्ये म्हणता येतील. भारतात ती चिरकाल अबाधित आणि चिरंतन असण्याचे श्रेय महिलावर्गाच्या रोज रांगोळी काढण्याच्या सवयीला जाते. भारतात सर्वत्र प्रत्येक घरातील स्त्रियांचे हे दैनिक कार्य होते आणि आहे. सूर्योदयापूर्वी सडासंमार्जन करुन तुळशी वृंदावनापुढे, उंबरठ्यापुढे घरातील स्त्रियांनी रांगोळी काढण्याची प्रथा आजही प्रचलित आहे.

भारत हा सण आणि उत्सवांचा राष्ट्र आहे. प्रत्येक सण, विविध उत्सव, व्रत-वैकल्ये, मंगलकार्यात रांगोळी काढण्याची प्रथा आहे. जसे जसे सणवार, व्रतवैकल्य, उत्सव आणि मंगलकार्य यांमध्ये विविधता आणि नवीनता  समाजात रुजत गेली तसे तसे रांगोळी कलेच्या प्रांगणात विस्तार होत गेला आणि नवे आकृतीबंध, नवी रंगसंगती आकार घेत नवे संकेत रुजू लागले. सर्वत्र रांगोळीसाठी वापरण्यात येणार्‍या घटकांमध्ये विविधता आणि कमी अधिक प्रमाणात समानता आढळते. प्रत्येक काळात सर्वत्र उपलब्ध साहित्य जसे पिठी, धान्य, रंगीत वाळू वा माती, फुलं, पानं यांच्या साह्याने रंगवल्ली रेखाटण्यात आली. शिरगोळ्यांचे चूर्ण आणि भाताच्या फोलपाटापासून तयार करण्यात येणारी रांगोळी आता चुनखडी, संगमरवर दगडापासून, इतर तत्सम पदार्थांपासून तयार करण्यात येते.

पिढी दर पिढी स्थलांतरीत आणि हस्तांतरीत होतांना रांगोळीत प्रयोग करण्यासाठी महिलांना भरपूर वाव होता. महिलांच्या कुशाग्र बुद्धी, सौंदर्यदृष्टी, निरिक्षणशक्ती तसेच सवय आणि प्रयोगातून रांगोळी कला म्हणून विकसित होत गेली, समृद्ध होत गेली. प्राचीनकाळापासून धर्मविषयक कल्पना व्यक्त करण्यासाठी प्रतीकांचा फार मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात आला. या प्रतीकांची मुळे समाजात खोलवर रुजलेली असतात. अनुभव, कल्पना, विचार, तत्व किंवा देवता यांच्या प्रभावी अभिव्यक्तीसाठी मानवी जीवनाच्या बहुतांश क्षेत्रात प्रतीकांचा उपयोग केला जातो.

प्रतीके मूलभूत विचारांचे प्रतिनिधित्व करतात. सूचकता हे प्रतीकाचे सामर्थ्य होते. प्रगल्भ आणि प्रभावी अभिव्यक्ती हे प्रतीक निर्मितीचे उद्धेश्य मानले जाते. कला, मूलतः प्रतीकात्मक असते. रंगवल्लीतील प्रतीके आणि चिन्हे सांकेतिक अभिव्यक्ती आहे. शब्दांशिवाय व्यक्त केलेल्या या संकेतांमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. प्रतीके, तत्कालीन संस्कृतीचे महत्व तर कथन करतातच तसेच ते मानवीजीवनाचे अनेक पैलू उलगडतात. या प्रतीकांमधून मानवीजीवनाचा आढावा घेतांना तत्कालीन विचारधारा आणि मानवाच्या प्रगतीच्या पाऊलखुणांचा मागोवा घेणे सुलभ होते.

  रंगवल्लीतील पारंपारिक आकृती आणि चिन्ह जसे – गो-पद्म, शंख, चक्र, गदा, स्वस्तिक, चंद्र, सूर्य, तारे, त्रिशूल, वज्र, कलश, लक्ष्मीची पावले, वनस्पती- कमळ, तुळस, त्रिदल, पानं-फुलं, प्राणी- सर्प, कासव, मीन, वाद्य, अखंड भारताला एका सूत्रात गुंफतात. रंगवल्लीतील प्रतीकांचा प्रपंच विस्तृत आहे. या चिन्हांचे संदर्भ आपल्याला वेद, पुराणे, प्राचीन संस्कृत साहित्य, आगम ग्रंथ तसेच शिल्परत्न, चित्रलक्षण या ग्रंथामध्ये सापडतात.

प्राचीनकाळापासून चित्रकलेचे दोन प्रकार सांगितले जातात; शाश्वतक आणि तात्कालिक किंवा क्षणिक. रंगवल्ली तात्कालिक/क्षणिक प्रकारात तर भित्तीचित्रे किंवा जमीनीवर काढलेले चित्रे ही काहीकाळ टिकत असल्यामुळे शाश्वत प्रकारातील मानली जातात. “शिल्परत्न” या प्राचीन ग्रंथात “रसचित्र” अर्थात ओल्या पदार्थापासून निर्मित चित्र आणि “धूलिचित्र” चूर्ण किंवा भुकटीसारख्या पदार्थापासून निर्मित चित्र असे वर्गीकरण केले आहे. रसचित्र हे कापड, काड्या आणि कुंचल्याने काढले जात असे तर धुलिचित्र हे बोटाने काढल्या जातात. रंगवल्ली अर्थात “धूलिचित्र” या प्रकारातील आहे. कला म्हणून विकसित होतांना रांगोळीत भवतालच्या निसर्गातील विविध घटक विभिन्न आकार आणि छटा व्यक्त झालेल्या आढळतात. या घटकांकडे बघता रांगोळीचे दोन प्रकार आहेत: आकृतीप्रधान आणि वल्लरीप्रधान. भारतात विभिन्न भाषा-विभिन्न प्रथा आहेत मात्र कला म्हणून रंगवल्लीला सर्वत्र विशेष म्हणजे सर्व स्तरावर मान्यता मिळाली म्हनूनच ती सर्वमान्य अभिव्यक्ती ठरते. आज भारतीय सांस्कृतिक क्षेत्रात रांगोळी एक पारंपारिक लोककला म्हणून सर्वाधिक लोकप्रिय आहे. लोककलेचा बहुतांश आविष्कार हा सामूहिक असतो. तो लोकजीवनात संपृक्त झाला असतो. लोकसंस्कृतीतील सामाजिक, धार्मिक, श्रद्धा, चालीरीती, यांच्यात एकरूप झालेली कला म्हणजे रंगवल्ली.

कला आणि संस्कृती या दृष्टीने रंगवल्लीचा विचार करतांना लक्षात येते की ही कला  व्यक्तीकेंद्रित असली तरी ती एका विशिष्ट लोकसमूहाचे नेतृत्व करत असते. ही कला समाजातील सामन्यांच्या कलादृष्टीला चैतन्य तर देतेच ही सर्वांना एका धाग्यात गुंफते. रंगवल्ली रोज मिटते म्हणूनच ही कला शाश्वत आहे. जसा सूर्य रोज अस्त होतो आणि प्रकाशाची नवी चाहूल घेऊन येतो तसेच आपल्या कलेतील जाणीवा नव्याने व्यक्त करता याव्या यासाठी रांगोळी रोज धरेत विलीन होते. ही कला शाश्वत आहे  म्हणूनच संस्कृती आणि समाजाचा हा गोफ ही अखंड आहे, शाश्वत आहे. कला आणि संस्कृती या दोन्ही विभिन्न ज्ञानशाखा असल्या तरी या दोन्ही संकल्पनांचा समन्वय परस्परांच्या जडणघडणीत महत्वाची भुमिका साकार करत असतात. संस्कृतीला अनुसरून केलेली कलानिर्मिती संस्कृतीच्या संवर्धनाचे निमित्त ठरते.

  • विनिता श्रीकांत देशपांडे (लोकसंस्कृतीच्या अभ्यासक आणि सहसंयोजक प्राचीन कला विधा, संस्कार भारती, महाराष्ट्र प्रांत)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.