Article of Prashant Divekar on 75th Independence Day: स्वातंत्र्याचा अमृत कलश

एमपीसी न्यूज – भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा आज 15 ऑगस्ट रोजी प्रारंभ होत आहे. 1947 ते 2021 हा 74 वर्षांचा काळ अनेक चढ-उतार, आनंद- दुःख, यश-अपयश, प्रगती-अधोगती अशा संमिश्र अनुभवाचा इतिहास आहे. 75वे वर्ष अमृत अनुभव देणारे असावे, अशा अपेक्षेने आपण सारेजण या वर्षाची आतुरतेने वाट पहात आहोत. वाचूयात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दिवेकर यांचा विशेष लेख….
—————————————————————————-

स्वातंत्र्याचा अमृत कलश

लेखक – प्रशांत दिवेकर

अमृत! समुद्र मंथनातून मिळालेले दिव्य रसायन! मृताला नवीन जीवन देणारे, सारे संपले असे वाटले असताना उमेदीने ‘पुनश्च  हरी  ओम’ हा  विश्वास देणारे, अंधाराचे साम्राज्य पसरले, अशा सामूहिक भावनेला संपवून तेजाचे नवे किरण पसरवणारे, मरगळ झटकून चैतन्य निर्माण करणारे  अमृत!

बाराशे वर्षांच्या अखंड लढ्याला आलेले सुयश म्हणजे 15 ऑगस्ट 1947 ला मिळालेले स्वातंत्र्य! सार्‍या जगामध्ये मानाचे स्थान असणारा वैभवसंपन्न देश आक्रमकांना बाराशे वर्षे तोंड देत होता. लढाऊ वृत्ती न सोडता संघर्ष करीत होता. कधी विजय, कधी पराजय! देशाच्या सीमा  अकुंचित होत होत्या. संपत्तीचा नाश होत होता, पण कुठे ना कुठे, प्रतिकाराच्या लढाया चालूच होत्या. सारा इतिहास आपण जाणतोच!

इंग्रज देश सोडून गेले. देशाचे दोन तुकडे करून गेले. पण अखेर भारतमाता स्वतंत्र तरी झाली. खंडीत का होईना, पण  भूमी परकीयांच्या  जोखडातून मुक्त झाली. ‘वंदे  मातरम’ या जयघोषात मिळालेले स्वातंत्र्य शाश्वत टिकवण्याचा निर्धार भारतीय जनतेने  केला. अमृतमहोत्सवी  वर्षात पदार्पण करताना आपण अभिमानाने म्हणू शकतो की, हा निर्धार आपण प्रत्यक्षात आणला!

खूप स्वप्नांचे गोड ओझे घेऊन देशाची वाटचाल सुरू झाली. प्रश्न मोठे होते. आव्हाने खडतर होती. संकटे थांबत नव्हती. स्वप्नपूर्तीचे प्रयत्न तरीही  चालूच होते. स्वातंत्र्याचा अर्थ समजावून घ्यायचा होता. प्रगतीच्या व्याख्या ठरवायच्या होत्या. नव्या युगाची सुरुवात करताना जुन्या चुका  टाळायच्या होत्या. अपमानाच्या खुणा पुसून टाकायच्या होत्या, अत्याचाराच्या विरोधात दृढ मानसिकता निर्माण करायची होती. ‘मी देशासाठी, देश माझा’ ही अद्वैताची जाण जागवायची होती. समाज हाच देव मानून शिव भावे जीव सेवा करण्याचा संस्कार रुजवायचा  होता.

हा सारा विचार घेऊन स्वतंत्र भारताची वाटचाल चालू झाली. 75 वर्षे पूर्ण करताना या स्वप्नांपैकी किती पूर्ण  झाली? माझा  भारत, खरे तर माझी  भारतमाता आज कोणत्या अवस्थेत आहे? “आम्ही पुत्र अमृताचे, आम्ही पुत्र या धरेचे, उजळून आज दावू भवितव्य मातृभूचे,” असा निश्चय केलेले  कितीजण आम्हाला दिसत आहेत? स्वातंत्र्य चळवळ चालू असताना जी उदात्त देशभक्ती प्रगट होत होती, तीच पुन्हा जगणारे आणि स्वार्थाला  थारा न देणारे किती आदर्श निर्माण झालेत? दुःख, दारिद्र्य, रोगराई, निरक्षरता यावर मात करण्यात किती यश मिळाले आहे?

मनात हे सारे विचार तर येतातच. सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, असे नाही. काही उत्तरे नकारात्मक सुद्धा असतील. पण सकाळीच आकाशवाणीच्या बातम्यात ऐकले की, सलग पाचव्या वर्षी अन्नधान्य उत्पादनात विक्रमी वाढ झाली आहे. कोरोना संकट आणि शेतकरी आंदोलन या पार्श्वभूमीवर हे यश अमृतमय आहे. शेतकरी आणि कृषी उत्पादन हा आपल्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. भारतीय स्वातंत्र्य  काळातील ही सकारात्मक कामगिरी  मानावी  लागेल!

क्रीडा क्षेत्रात खूप आनंदाचे वातावरण आहे. ऑलिम्पिक  स्पर्धेत यावेळी सातजण पदक विजेते ठरले. सुवर्ण, रौप्य, कांस्य पदके मिळवून  अमृतमय यश मिळाले. त्याबरोबर काही खेळाडू थोड्या फरकाने पदक मिळवू शकले नाहीत, पण स्पर्धेत त्यांनी कामगिरीचा ठसा उमटवला.  पंतप्रधान स्वतः खेळाडूंशी बोलले, विजेत्यांचे अभिनंदन केले आणि पराभूत खेळाडूंचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. त्यांची उमेद वाढविली.  सारा देश एकदिलाने क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आनंदित झाला. क्रिकेट या खेळातही भारताचे नाव अग्रस्थानी आहे.

संरक्षण क्षेत्रात गेल्या 75 वर्षांत देशाने प्रचंड प्रगती केली आहे. आपले सारे शेजारी नमुनेदार आहेत. आपल्या सेनादलातील सैनिक तर समर्थ  आहेतच, पण देशाचे नेतृत्व खंबीर असल्याने सैनिकांना अधिक स्वातंत्र्य आणि प्रेरणा मिळते आहे.

प्रत्येक दिवाळी जवान लोकांबरोबर सीमेवर साजरी करणारा राष्ट्रनेता संरक्षक दलासाठी अमृत संजीवनी मानावा लागेल! समाजासमोर आदर्श  निर्माण करण्याचे काम सेनेचे जवान करत आहेत, त्यामुळे तरुणाई फौजी बनण्यात धन्यता मानू लागली आहे.

शिक्षण क्षेत्रात 75 वर्षांत चांगली वाटचाल झाली आहे. 130 कोटींच्या या देशात शाळा, कॉलेज आणि शिक्षण संस्था कितीही असल्या तरी  कमीच पडणार. पण दुर्गम भागात, खेडोपाडी शिक्षण पोचले आहे. शिकून मोठे व्हा, असा  आशीर्वाद देणारी माऊली घरोघरी निर्माण झाली आहे. बुद्धिमान विद्यार्थी आपल्या भारताचे दूत असावेत, याप्रमाणे जगभर संचार करीत आहेत. कोरोना संकटाचे सावट असतानाही शिक्षण चालू  राहिले, हेही मोठे यश आहे.

उद्योग क्षेत्र कात टाकून नवनवे टप्पे पूर्ण करीत आहे. आत्मनिर्भर या मंत्राने भारलेला देश जगावर आता अवलंबून रहायचे नाही, या ध्येयाने  वाटचाल करीत आहे. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, पण सुरुवात तर  झाली आहे. प्रचंड  लोकसंख्या ही लायबिलिटी तर आहेच, पण  इतकी प्रचंड बाजारपेठ ही ताकदही ठरू शकते, हे आपण अनुभवतो आहोत.

कोरोना संकटात सारे जग हादरून गेले. उत्तम आरोग्य यंत्रणा असलेले प्रगत देश थरकापले. आपले  कसे  होणार, असा प्रश्न होता. या संकटात  भारताने स्वतःला सिद्ध केले आहे. संकटाला संधी बनवून आरोग्य क्षेत्र सज्ज झाले आहे. सेवा व्रत घेतलेल्या आरोग्य दूत आणि धन्वंतरी यांच्या  एकत्रित प्रयत्नांमुळेच आपण टिकून राहिलो आहोत. पीपीई किट निर्मिती असो, की लसीकरण असो, भारत यशस्वी ठरतो आहे. सर्वांत महत्वाचे  असे की, या कोरोना संकटाला एकदिलाने तोंड देण्यासाठी, टक्कर देऊन निरामय समाज जीवन बनविण्यासाठी सारा देश उभा ठाकला.  किरकोळ अपवाद सोडले, तर मतभेद विसरून या संकटाशी मुकाबला केला गेला. अमृतमहोत्सवी वर्षाची ही सर्वात मोठी अमृतमय उपलब्धी  आहे.

गेली  दीड-दोन वर्षे आपण सारे लढण्यासाठी सरावलो आहोत. आर्थिक, मानसिक, शारीरिक सारी लढाई जिंकण्याचा अथक प्रयत्न करतो आहोत. 15 ऑगस्टचे ध्वजवंदन सुद्धा कदाचित घरूनच करावे लागणार आहे. अमृतमय जगण्याचे स्वप्न पाहत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात प्रवेश  करतो आहोत.

गेल्या 75 वर्षांत काय मिळवले, ते लिहिताना खूप काही मिळवायचे बाकी आहे, याची जाणीव आहेच. 75 वर्षांत काय गमावले, तेही लक्षात  आहे. स्वातंत्र्याचा जमा-खर्च मांडताना नियतीच्या पानावर घाम आणि रक्ताच्या शाईने तो लिहावा लागतो, याचे भान आणि जाण सगळ्यांनीच ठेवली  पाहिजे.

अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने खूप सारे कार्यक्रम आयोजित होतील. सार्‍या सरकारी कार्यालयांमध्ये रोज राष्ट्रगीत गायन होणार आहे.  घराघरापर्यंत तिरंगा ध्वज फडकविला जावा, यासाठी  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) “हर घर तिरंगा” अभियान करत आहे. राष्ट्रभक्ती पर गाण्यांच्या स्पर्धा, स्वातंत्र्य संग्रामाचे कथा कथन, चित्रकला स्पर्धा या आणि अशा कार्यक्रमाने अमृत महोत्सवाचा जल्लोष वाढणार आहे.  येणार्‍या वर्षभरातील विविध उपक्रमांद्वारे स्वातंत्र्याचा अमृत कलश सर्व सामान्यांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

एक  देशभक्त नागरिक, चांगला माणूस म्हणून आपणही या अमृतमहोत्सवाचा एक भाग बनूया. जे शक्य असेल, ते चांगले काम करूया. स्वातंत्र्य  योद्धे व त्यांचे कार्य स्मरू या. एखादी व्यक्ती साक्षर करण्याचा प्रयत्न करून, एखाद्या गरजू व्यक्तीला यथाशक्ती मदत करून, शासनयंत्रणेचे सर्व  आदेश व कायदे पाळून, समाजात चांगले काम करणार्‍यांचे कौतुक करूनही आपण या महोत्सवाचा आनंद घेवूया. कोणतेही वाईट काम  करायचे नाही, 75 वर्षांच्या स्वतंत्र देशाला अभिमानास्पद वाटेल, तेच काम करायचे, असा निश्चय  करूया!

विसरून जाऊ सर्व निराशा 

स्वप्न उद्याचे फुलवूया 

इतिहासातून धडा घेऊनी 

भविष्य आपुले घडवूया!

अक्षर शिकूनी ज्ञान मिळवूनी

घडवूया नूतन सृष्टी 

विज्ञानाचे पंख लावूनी

श्रद्धेला देवू दृष्टी!

स्वराज्य आले सुराज्य येण्या 

वेळ आता ना लागेल 

घराघरातून देशभक्ती

आणि समाजभक्ती जागेल!

स्वातंत्र्याच्या अमृत वर्षी 

समाज जागृत होईल 

जगात सार्‍या भारतभूचे

स्थान अबाधित राहील!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.