MS Dhoni Retires: तो आला, त्यानं पाहिलं आणि…… त्यानं जिंकलं !

article on cricketer mahendra singh dhoni's retirement

एमपीसी न्यूज – 2007 साली ट्वेन्टी ट्वेन्टीचा पहिला विश्वचषक, 2011 सालचा एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफी आयसीसीच्या तीनही मानाच्या स्पर्धा जिंकून देणारा धोनी हा भारताचा एकमेव कर्णधार ठरला. स्वातंत्र्यदिनाच्या संध्येला टीम इंडियाच्या मिस्टर कुल महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आणि सर्व क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला.

असं म्हटलं जातं की, भारतात क्रिकेट हा एक धर्म आहे. जिथं क्रिकेटपटूंना डोक्यावर घेतल जातं. प्रत्येकाचा एक काळ असतो आणि टीम व देशाला सुद्धा कायम एका हिरोची गरज असते. काही काळ सौरभ गांगुली हा भारतीय टीमचा चेहरा होता.

सचिन तेंडुलकरने तर प्रत्येक भारतीयाच्या मनावर अधिराज्य गाजवलं आणि क्रिकेटचा देव म्हणून भारतीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटला भरभरून मनोरंजन दिले. तसेच सेहवाग व अशी बरीच नवे घेता येतील. अशात एक सामान्य खेड्यातला आणि सामान्य कुटुंबातला खेळाडू भारतीय संघात आला आणि त्याने भारतीय क्रिकेटची परिभाषाच बदलली.

महेंद्रसिंह धोनी असे त्या खेळाडूचे नाव त्याला कुणी मिस्टर कूल, कुणी मास्टर माईंड तर कुणी थाला तर कुणी सर्वोत्तम फिनिशर्स किंवा गेम चेंजर म्हणून संबोधतो. मध्यमवर्गीय घरात जन्मलेला तसेच क्रिकेटची किंवा खेळांचा वारसा नसलेला हा खेळाडू पुढे जाऊन भारताचा सर्वोत्तम कॅप्टन होतो हे आश्चर्य नसून त्यामागे मेहनत, निष्ठा, निर्णय सामर्थ्य आणि सर्वांच्या क्षमतांचा योग्य वापर करून घेणे हे आहे.

खेळात हारजीत होत असते काही वेळा अनपेक्षित निकाल देखील लागतो. परंतु, या हारजित यापेक्षाही खेळात सर्वोत्तम देण्याची, शंभर टक्के जीव ओतण्याची त्याची तयारी होती. शेवटपर्यंत प्रयत्न हा त्याचा यशाचा सर्वात मोठा गाभा होता.

महेंद्रसिंह धोनीने डिसेंबर 2004 साली बांगलादेश विरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यातून आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरवात केली. या मॅचमध्ये पहिल्याच बॉलला धोनी रन आऊट झाला. पण, धोनी हा लंबी रेस का घोडा होता आणि त्याने ते सिद्ध करून दाखवले.

2007 नंतर धोनीकडे वन डे आणि कसोटी संघाचीही जबाबदारी देण्यात आली. 2009 साली त्यानं भारताला कसोटी क्रमवारीत नंबर वन वर नेऊन ठेवलं. त्यानंतर जवळपास दोन वर्ष भारतीय संघ कसोटीच्या आयसीसी क्रमवारीत पहिल्या स्थानावर कायम होता. धोनीच्या नेतृत्वात भारतानं घरच्या मैदानात 21 कसोटी जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे.

धोनीच्या नेतृत्वात भारतानं आजवर 110 वन डे, 27 कसोटी आणि 42 टी ट्वेन्टी सामने जिंकले आहेत. त्यामध्ये 2007 सालचा ट्वेन्टी ट्वेन्टीचा पहिला विश्वचषक, 2011 सालचा एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफी आयसीसीच्या या तीनही मानाच्या स्पर्धा जिंकून देणारा धोनी हा भारताचा एकमेव कर्णधार ठरला आहे.

एवढं यश आणि प्रसिद्धी नावापुढे असताना देखील धोनी यशाने कधी हरळून गेला नाही ना अपयशाने खचून गेला. यश मिळालं की, ते टीमच्या नावाने करायचं आणि अपयश आपल्या खांद्यावर घ्यायचे असा धोनीचा स्वभाव सर्वांना परिचयाचा आहे आणि म्हणूनच कदाचित तो सर्वांपेक्षा विरळा ठरतो.

फलंदाजी असो, यष्टीरक्षण असो की संघनायकाची भूमिका धोनीने प्रत्येक जबाबदारी अगदी चोख पार पाडली एवढंच नव्हे तर प्रत्येक बाबतीत धोनीने आपला दर्जा एवढा उंचावून ठेवला आहे की, त्याला पर्याय शोधताना निवड समितीचा कस लागणार एवढं नक्की.

समोरच्या टीमची खडा न खडा माहिती घेणे. त्यानुसार आपली रणनिती तयार करणे यामध्ये धोनी माहीर होता. त्याप्रमाणे फिल्डींग सेट करणं, गोलंदाजांना यष्टीमागून सल्ले देणे हे सर्वांनी अनुभवले आहे. कर्णधार पदाची धुरा 10 वर्षांपेक्षा जास्त काळ धोनीने आपल्या खांद्यावर यशस्वीपणे वाहीली.

धोनीने 350 एकदिवसीय, 90 कसोटी आणि 98 ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांत मिळून धोनीच्या खात्यात 17 हजार 266 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यांत दहा हजार धावा करणाऱ्याचा मानही धोनीनं मिळवलाय. यष्टीमागेही त्यानं कमाल करताना आजवर तब्बल 829 फलंदाजांना माघारी धाडलंय.

आयपीएलमध्ये धोनीने 190 सामने खेऴत 137.85 च्या सरासरीने 4,432 धावा केल्या आहेत. त्याच्या नेतृत्वात चेन्नईने तीन वेळा आयपीएल टायटल जिंकले आहे.

वाढते वय आणि ढासळत चाललेला फॉर्म यामुळे धोनीने आता निवृत्ती घ्यावी अशी मागणी सर्वच स्तरातून होत होती. तर क्रिकेटचे जाणकार धोनी अजून क्रिकेट खेळू शकतो तो फिट आहे असे सांगत होते. मात्र, निवृत्तीचा निर्णय घ्यायला धोनी स्वतंत्र होता आणि त्याने भारतीय स्वतंत्रदिनी आंतराष्ट्रीय क्रिकेट मधून आपली निवृत्ती जाहीर केली. भारतीय संघ जिंकल्यानंतर तो जसा शांतपणे बाहेर जायचा तसाच तो गाजावाजा न करता निवृत्ती जाहीर करून मोकळा झाला.

हार-जीत यापेक्षाही लढणं फार महत्वाचं आहे आणि हा विचार भारतीय संघात रुजवण्यात धोनीची भूमिका निर्णायक आहे. माझ्या सोबत धोनी असेल तर मी युद्धावर देखील जायला तयार आहे असे मत भारतीय क्रिकेट टीमचा माजी प्रशिक्षक गॅरी क्रस्टर्न यांनी एका मुलाखतीत व्यक्त केले होते.

धोनीने भारतीय संघाला विजयाची सवय लावली धोनीने देशाला भरभरून दिले आहे. म्हणून कर्णधार विराट कोहलीच्या भाषेत सांगायचे तर क्रिकेट मधून निवृत्त झाला असला तरी धोनी नेहमी सर्वांच्या हृदयात राहील हे खरे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.