Pimpri News: आयुक्तसाहेब! ‘आपलीच प्रतिमा होते आपलीच वैरी’

भाजप म्हणेल तेच बरोबर अशी भूमिका घेतल्याने स्वतःवर भाजपधार्जिणे शिक्का बसण्यास आयुक्त कारणीभूत ठरल्याचे ठळकपणे निदर्शनास आले.

एमपीसी न्यूज (गणेश यादव)- पक्षपातीपणा करणे, भाजपच्या कलाने संपूर्ण कारभार, भाजप पक्ष कार्यालयात जाणे, विरोधकांना कवडीचीही किंमत न देणे, बजेट न देणे, शिवसेना खासदारांना वेळ न देणे, भाजप आमदार म्हणतील तेच बरोबर अशी मागील तीन वर्षे भूमिका घेतल्याने पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर हे स्वतःच भाजपधार्जिणे शिक्का बसण्यास कारणीभूत ठरल्याचे दिसून आले आहे. पण, राज्यातील सत्तातरानंतर भाजपधार्जिणी प्रतिमा मात्र आयुक्तांना वैरी ठरली आहे. आता आयुक्त विरोधात जावू लागल्याची सत्ताधा-यांना खंत वाटत असून त्यांनी त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडायला सुरुवात केली आहे. सत्ताधारीच विरोधात जाऊ लागल्याने आयुक्तांना पुढील कारभार करणे जिकिरीचे होणार आहे. त्यामुळे ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी आयुक्तांची परिस्थिती झाली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत फेब्रुवारी 2017 मध्ये भाजपची पहिल्यांदाच सत्ता आल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महापालिकेत आयुक्त असलेले श्रावण हर्डीकर यांना पिंपरी पालिकेत आयुक्त म्हणून पाठविले होते. 27 एप्रिल 2017 रोजी हर्डीकर यांनी आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेतला होता.

महापालिकेतील सव्वा तीन वर्षे आयुक्त हर्डीकर यांनी पूर्ण भाजपच्या कलाने कारभार केला. भाजप आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, पालिकेतील पदाधिकारी म्हणतील तीच पूर्व दिशा होती. चुकीचे काम होत असल्याचे दिसून येत असतानाही ते रोखण्याचा प्रयत्न आयुक्तांनी केला नाही, असे बोलले जाते.

भाजप पक्ष कार्यालयात जाण्यापर्यंत त्यांची मजल गेली. विरोधकांना कवडीचीही किंमत देत नव्हते. राष्ट्रवादी, शिवसेना नगरसेवकांना बजेट कमी देत होते. शिवसेना खासदारांना देखील वेळ दिला जात नसे. भाजप म्हणेल तेच बरोबर अशी भूमिका घेतल्याने स्वतःवर भाजपधार्जिणे शिक्का बसण्यास आयुक्त कारणीभूत ठरल्याचे ठळकपणे निदर्शनास आले.

यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना नगरसेवकांकडून आयुक्तांवर हल्लाबोल केला जात होता. भाजपचे घरगडी, प्रवक्ते, दलाल अशा विविध उपमा आयुक्तांना देत होते. सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सनदी अधिकारी असूनही हर्डीकर यांच्याकडून पक्षपतीपणा केला जात आहे. पालिकेत चुकीच्या पद्धतीने काम करतात. विरोधकांची कामे करत नाही. मानसन्मान देत नाहीत असा आरोप 1 ऑक्टोबर 2018 रोजी पिंपरीत केला होता.

तरी देखील आयुक्त हर्डीकर कार्यपद्धतीत बदल करत नव्हते. कारण, तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आयुक्तांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी भाजपला अनुकूल अशी भूमिका घेणे सोडले नाही. नागपूरवरुन आल्याने भाजपधार्जिणे अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली.

भाजप आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्या कलानेच त्यांनी निर्णय घेतले. ते म्हणतील तीच पूर्व दिशा होती. भाजपचा नगरसेवक विरोधात बोलला तरी हे सत्ताधारी असून विरोधात कसे बोलू शकतात, अशी विचारणा काहीही संबंध नसताना आयुक्त करत असे.

तत्कालीन राज्य सरकारमध्ये सहभागी असलेले शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना भेट नाकारण्याचे धाडस आयुक्त हर्डीकर यांनी केले होते. दुसरे खासदार श्रीरंग बारणे यांच्या सूचनांकडे देखील वारंवार दुर्लक्ष करत असे. त्यांच्या मताला महत्व देत नव्हते.

पण, आता राज्यातील सत्ता बदलताच आणि शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार येताच आयुक्त हर्डीकर यांनी आपले सूर बदले, कार्यपद्धतीही बदलली. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीच्या कलाने ते वागत आहेत.

तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केलेले आरोप, पत्रांना आयुक्त खिजगणतीत देखील धरत नव्हते. कवडीचीही किंमत देत नसे. आता मात्र राष्ट्रवादीने पत्रक काढले. तरी, त्याची दखल घेत आहेत. पूर्वीपण चुकीचे प्रकार घडत होते. अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे स्पष्टपणे दिसत होते.

आयुक्त ते रोखू शकत होते. पण, त्यांनी हेतुपुरस्सर त्याकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप झाले. सत्ताधा-यांना मोकळे रान सोडले होते. त्यांच्या वर्तणुकीतून ते जाणवतही होते. आता मात्र आयुक्त भाजप विरोधात जावू लागल्याची खंत सत्ताधा-यांना वाटत आहे.

त्यातूनच भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्त हर्डीकर यांना टार्गेट केल्याची चर्चा सुरु आहे. आयुक्तांच्या संदिग्ध भुमिकेमुळे भाजपची प्रतिमा जनतेत अविश्वास करणारी ठरत आहे.

निविदा मान्य करताना निविदा दरामध्ये तफावत ठेवून आयुक्तांनी संशयास्पद मान्यता दिल्याचा आरोप करत जगताप यांनी विविध कामांची लेखी माहिती मागविली. आता महापौर उषा ढोरे यांनी देखील आयुक्तांकडून भाजपला बदनाम करण्याचा डाव आखला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

यावरुन भाजपचा आयुक्तांवरील विश्वास उडाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्यांच्या कारभाराविरोधात आक्रमक पवित्रा सत्ताधारी घेत आहेत. अगोदर भाजपधार्जिणे आता राष्ट्रवादी धार्जिणे असल्याचा आरोप आयुक्त हर्डीकर यांच्यावर होऊ लागले आहेत.

त्यामुळे नेमके चुकंतय कुठे याचे आत्मपरिक्षण आयुक्त हर्डीकर यांनी करणे गरजेचे आहे. आजपर्यंत पालिका इतिहासात अनेक आयुक्त येवून गेले. मात्र, हर्डीकर यांच्याएवढे आरोप कोणत्याही आयुक्तांवर झाले नाहीत.

कोरोना महामारीतील खरेदीतही आयुक्तांच्या प्रशासनावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. हे गंभीर आहे. याची दखल राज्य सरकार घेत आहे. शिवसेनेने वारंवार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. तेही त्यांच्या कारभारावर नाराज आहेत. मास्क खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. पण, कारवाई करण्यासाठी आयुक्तांचे हात धजावत नाही.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नाराज असल्याने आणि त्यातच पालिकेतील सत्ताधारीही विरोधात गेल्याने आयुक्त हर्डीकर यांना यापुढे काम करणे कठीण होणार आहे. राज्य सरकारने अनेक सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या. मात्र, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार आयुक्तांची बदली करण्यास तयार होत नाहीत.

तीन वर्षांचा कालावधी संपला. तरी, आयुक्तांवर ‘नाखूश’ असल्याने दादा त्यांची बदली करत नसल्याचे समजते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक वर्ष आयुक्त हर्डीकर यांना पालिकेतच ठेवतील अशी सध्याची परिस्थिती आहे.

‘तुम्ही जे पेरले तेच उगवले आहे, तुमचे तुम्ही निस्तारा’ अशी राष्ट्रवादी प्रमुखांची भूमिका असल्याचे कळते. आता बदली केली तर, भाजप आक्षेप घेवू शकते. पाठीमागे बदलीची चर्चा सुरु असताना भाजपच्या एका माजी पदाधिका-यांने आयुक्त सक्षम असल्याचे सांगत बदलीला विरोध केला होता. तीन वर्षांचा कार्यकाल संपूनही अजितदादांनी आयुक्तांना ‘नाखुशीनेच’ ठेवले असल्याचे बोलले जात आहे.

आता पालिकेतील सत्ताधारीच विरोधात जावू लागले आहेत. यामुळे आयुक्त हर्डीकर यांना पुढील कारभार करणे जिकिरीचे होणार आहे. ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी आयुक्तांची परिस्थिती झाली आहे. बदली पाहिजे असली. तरी, सध्याच्या परिस्थितीत मिळणे दुरापास्त मानले जाते.

आयुक्त हर्डीकर जोपर्यंत आपल्या बाजूने होते. तोपर्यंत सत्ताधारी भाजपकडून आयुक्तांचे कौतुक केले जात होते. आता मात्र आयुक्तांनी सद्सद्विवेक बुद्धीचा वापर केला. तरी, ते राष्ट्रवादीधार्जिणे होतात असा साक्षात्कार सत्ताधारी भाजपला होऊ लागला आहे. भाजपची आणि आयुक्तांचीही भूमिका बदलली आहे. हा खेळ विरोधातील राष्ट्रवादी, शिवसेना बघत बसली असून त्यांना आनंदाच्या उखळ्या फुटत आहेत.

सत्ताधारी भाजपचे आमदार, पदाधिकारी विरोधात गेले तरी आयुक्त बिनधास्त!

आयुक्त श्रावण हर्डीकर यांना नागपूरवरुन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरीत पाठविले आहे. फडणवीसांशी त्यांचे घरगुती संबंध आहेत. विरोधी पक्षनेते असतानाही शहरात आल्यानंतर फडणवीस आयुक्तांच्या मोरवाडीतील बंगल्यावर गेले होते. आदरातिथ्य घेतले होते.

आयुक्त आपल्या विरोधात असल्याचा भाजपला आता कितीही साक्षात्कार झाला असेल. तरीही याची प्रदेशपातळीवर कोणीही दखल घेणार नाही. तशी सुतराम शक्यताही दिसून येत नाही. कारण, भाजपचे राज्यातील सर्वोच्च नेते मानले जात असलेले देवेंद्र फडणवीस यांच्याशी ‘यारी दोस्ताना’ असल्याने आयुक्त बिनधास्त आहेत. आपले कोण काय वाकडे करु शकणार नाही, अशा अर्विभावात ते आहेत.

सत्ताधारी आणि विरोधकांकडून आयुक्तच सॉफ्ट टार्गेट!

शहरातील राजकीय नेते, पदाधिका-यांची मोठी नातीगोती आहेत. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी एकमेकांविरोधात जाहीरपणे बोलत नाहीत. बोलले तर मवाळ भाषेत, नाव न घेता बोलतात. एकमेकांना टार्गेट करत नाहीत.

मग, शेवटी आयुक्तांवर निशाणा साधून त्यांना ‘सॉफ्ट’ टार्गेट केले जात आहे. आयुक्तच सर्वांच्या निशाण्यावर येतात. हे देखील चुकीचे आहे. विरोधकांनी देखील चुकीच्या कामाविरोधात थेटपणे सत्ताधा-यांवर आरोप करण्याचे धाडस दाखवावे. नाहक प्रत्येकवेळी आयुक्तांना सॉफ्ट टार्गेट करणे योग्य नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.