Special Child Problem In Pandemic : त्याची शाळा बंद,  हीच आमच्यासाठी परिक्षा…

एमपीसी न्यूज (स्मिता जोशी) – कोरोनाची साथ सुरु झाली, शाळा बंद झाली आणि अपूर्वला चोवीस तास घरातच राहावे लागले. त्याची शाळा बंद झाली पण आमची मात्र परीक्षा सुरु झाली. कारण शाळा नसल्याने त्याच्या ऊर्जेला वाटच मिळत नव्हती आणि मग त्याला कायम कसे गुंतवून ठेवता येईल याचे मार्ग शोधणे ही आमची कसोटीच लागली. मागील सहा महिन्यांपासून आम्ही दोघे चोवीस तास अखंड लढत आहोत. पण आता एका क्षणी आमचा देखील धीर सुटू लागला आहे. त्यामुळे आता अपूर्वची शाळा सुरु व्हावी, हीच आमची प्रार्थना आहे, असे भावनाविवश होऊन मधुकर(नाव बदलले आहे) सांगत होते.

कोरोनाच्या साथीमुळे सगळे जगच बदलून गेले. शाळा बंद झाल्या. मुलांना आणि पालकांना सुरुवातीला मजा वाटली. मात्र समाजातील एका खास घटकांच्या आईवडिलांची मात्र कसोटी सुरु झाली. काही कारणांनी जी मुले मानसिकदृष्ट्या कमकुवत आहेत अशा विशेष मुलांना देखील घरीच थांबावे लागले. पण त्यामुळे त्यांच्या अनेक समस्या निर्माण झाल्या. अशाच एका खास मुलाच्या म्हणजे अपूर्वच्या आईवडिलांनी त्यांची व्यथा शेअर केली.

मधुकर आणि त्यांच्या पत्नी माधुरी(नाव बदलले आहे) यांनी त्यामानाने ब-याच उशीरा मूल दत्तक घ्यायचे ठरवले. मधुकर एका अ‍ॅड एजन्सीमध्ये काम करत होते आणि माधुरी त्यांना मदत करत असत. मुंबईत आपला सुखाचा संसार करणा-या या जोडप्याला मूलबाळ नव्हते. म्हणूनच त्यांनी मूल दत्तक घ्यायचे ठरवले. २०१० मध्ये त्यांनी एका संस्थेतून एका मुलाला दत्तक घेतले. तेव्हा तो साधारणपणे दोन – अडीच वर्षांचा होता. लहान अपूर्व घरात आल्यामुळे दोघांचाही दिवस खूपच व्यस्त जाऊ लागला. पण काही महिन्यांनंतर अपूर्वला फीट्स येऊ लागल्या. मधुकर यांनी लगेचच त्या संस्थेकडे त्याबद्दल विचारणा केली. पण त्या संस्थाचालक महिलेने अपूर्वला अशी काही सवयच नाही, असे सांगून कानावर हात ठेवले.

मग मात्र मधुकर यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पण काय करणार आपले नशीब म्हणून त्यांनी परिस्थिती स्वीकारायची ठरवली. पण दोघांचेही वय लहान मुलाचा सांभाळ करण्यासाठी तसे जास्तच असल्याने त्यांना खूपच कठीण जाऊ लागले. त्यातच अपूर्वला थोड्या वेळाच्या का होईना पण दिवसातून साधारणपणे पंधरा-वीस वेळा फीट्स येत असत. मुंबईतील नामांकित रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु झाले. अपूर्वच्या आजाराला तसं पाहिलं तर वैद्यकीय परिभाषेत योग्य असे नाव नाही. त्याला मेंटली चॅलेन्जन्ड असेच म्हटले जाते.

सकृतदर्शनी नॉर्मल वाटणारा अपूर्व हायपर अ‍ॅक्टिव्ह आहे. म्हणजे तो अतिकार्यक्षम आहे, ज्यामुळे तो एका ठिकाणी स्वस्थ बसू शकत नाही. आणि त्यामुळे तो ब-याच वेळा त्रासदायक ठरु शकतो. ही मुले स्वभावाने जिद्दी असतात. काही गोष्टींचे आकलन त्यांना लगेच होते. अपूर्वच्या बाबतीत तर असे आहे की त्याला त्याचे आईवडिल कोणत्या गोष्टीने चिडू शकतात हे बरोबर ठाऊक आहे.

काही वर्षांनंतर मधुकर यांनी अपूर्वला शाळेत घातले. पण तेथे त्याच्याकडे योग्य लक्ष दिले जात नसे. कारण तो स्पेशल मुलगा आहे हे माहित असले तरी त्याला कशा प्रकारे शिकवायला हवे हे त्या शाळेला माहितच नव्हते. शेवटी मधुकर यांनी खास अपूर्वच्या शिक्षणासाठी पुण्याला येण्याचे ठरवले. सुरुवातीला त्याला शाळेत अ‍ॅडमिशन मिळाली. पण वेगळीच समस्या समोर उभी राहिली. अपूर्वच्या त्रासामुळे त्यांना कोणीही भाड्याने घर द्यायला तयार होत नसत. कारण अपूर्व शांतपणे बसूच शकत नसे. त्यामुळे त्याच्या त्रासदायक खोड्यांमुळे शेजारी वैतागून जात. अखेरीस एका सहृदय व्यक्तीमुळे त्यांना भाड्याचे घर मिळाले. त्याचबरोबर अंकुर विद्यामंदिर येथे शाळेत अ‍ॅडमिशन देखील मिळाली. जीवन थोडेसे सुसह्य होत आहे असे वाटत असतानाच लॉकडाऊन सुरु झाला. शाळा बंद झाली आणि पुन्हा सुरु झाली एक वेगळीच लढाई.

चोवीस तास घरात असणा-या अपूर्वच्या ऊर्जेला गुंतवून ठेवणे हे चॅलेंज समोर आले. कारण त्याआधी शाळा सुरु असताना सकाळी साडेआठ ते अडीच शाळा, त्यानंतर चार ते पाच खेळ, संध्याकाळी स्केटिंग असा अपूर्वचा भरगच्च दिनक्रम होता. त्यात त्याला पूर्णपणे गुंतवल्यामुळे तो खूष असे. आदित्य सर हे त्याचे एक लाडके खेळाचे टीचर पण आहेत. पण या लॉकडाऊनमुळे त्याची कोणाशीच गाठभेट नाही. त्यामुळे हे काय सुरु आहे हेच त्याला कळत नव्हते.

सुरुवातीला त्याला थोडे मोबाईलच्या माध्यमातून गुंतवून ठेवायला सुरुवात केली. हळूहळू त्याला मोबाईलवर व्हिडिओ बघण्याची गोडी लागली. म्हणजे जी गोष्ट त्याला द्यावी की नाही याचा प्रश्न पडला होता तीच गोष्ट आता त्याची करमणूक करत आहे. आता अपूर्व मोबाईलला चांगला सरावला आहे. व्हिडिओ बघण्यात रमून जातो. तो मोबाईल योग्यरित्या हाताळतो देखील. पण आता कुठेतरी शाळा सुरु होणे हे त्याच्या सारख्या मुलांसाठी गरजेचे बनले आहे. त्यामुळे आता अपूर्वसारख्या मुलांच्या पालकांचे अनेक प्रश्न समोर येऊ लागले आहेत.

आपल्या समाजात खास मुलांकडे निकोप दृष्टीने बघितलेच जात नाही. त्यांना विचित्र वागणूक दिली जाते. यातदेखील अनेक प्रकार आहेत पण त्यांना आपण एकच लेबल लावून टाकतो. या स्पेशल मुलांचा योग्य पद्धतीने विचार करुन त्यांच्यासाठी आवश्यक ती सोय करणे ही सध्याची गरज बनली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांकडे सरकारने सहानुभूतीने पाहावे आणि योग्य ती उपाययोजना करावी, असे या निमित्ताने मधुकर यांचे म्हणणे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.