The Bird’s Nest: पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा !!

तीन मजली खोपा हा तसा दुर्मीळ असतो. तो बनवण्यासाठी नर देखील अनुभवी असावा लागतो. पहिल्याच वर्षी खोपा बांधणारा नर तीन मजली खोपा बांधत नाही.

एमपीसी न्यूज- आपल्या कुटुंबाला सुखासमाधानात राहता येण्यासाठी सुंदर घर तयार करण्याचा प्रत्येक कुटुंबप्रमुखाचा आयुष्यभर संघर्ष सुरु असतो. आधी मी, माझी मुले, नंतर त्यांची मुले या टुमदार, सुंदर घरात राहतील. चार भिंतींना घरपण देतील, इथेच वाढतील, बागडतील, नंतर मोठी भरारी घेण्यासाठी बाहेर देखील पडतील. पण मोठी झाल्यावर या घराच्या ओढीने नक्की परत येतील, अशीच स्वप्ने आई वडील दोघेही घरकुल सजवताना बघत असतात.

ही गोष्ट झाली माणसांची. पण पाखरांची दुनियाच वेगळी असते. त्यांची पिल्ले मोठी झाल्यावर त्यांना कवेत घ्यायला आभाळ असते. ते घराच्या ओढीने कधीच परत येत नाहीत. पण म्हणून त्यांचे बाबा त्यांच्यासाठी उबदार घरटे तयारच करत नाहीत असे नाही हं. मोठे झाल्यावर कायमचे उडून जाणा-या पिल्लांसाठी नर अत्यंत सुंदर, माणसाला देखील संपूर्ण आयुष्यात करता येणार नाही असे कलाकुसरीने युक्त असे देखणे घरटे बनवतो.

आपण साधारणपणे हे एक मजली घरटेच बघतो. पण नुकतेच असे तीन मजली सुंदर घरटे एका ठिकाणी दृष्टीस पडले. आणि सुगरण पक्ष्यांच्या त्या देखण्या तीन मजली खोप्याचे कौतुकच वाटले. मनात आलं, म्हणून त्या पठ्ठ्याने एका पामच्या झाडावर चक्क तीन मजली बिल्डिंगच उभारली होती.

पक्षी अभ्यासक उमेश वाघेला यांच्याशी या विषयी चर्चा केल्यावर त्यांनी सांगितले की, तीन मजली खोपा हा तसा दुर्मीळ असतो. तो बनवण्यासाठी नर देखील अनुभवी असावा लागतो. पहिल्याच वर्षी खोपा बांधणारा नर तीन मजली खोपा बांधत नाही. क्वचित प्रसंगी पाच मजली खोपा देखील पाहण्यात आला आहे.

पक्ष्यांमधील सुगरण पक्ष्याचे घरटे हे या कलाकुसरीचा उत्तम वस्तुपाठच असते. अत्यंत बारीक काड्यांनी विणलेले, आत मऊ मऊ कापसाची गादी असलेले हे घरटे ज्याला आपण खोपा म्हणतो ते नर सुगरण पक्षी आपल्या पिल्लांसाठी बांधतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला थोडा पाऊस पडून गेल्यावर त्याचे हे बांधकाम सुरु असते.

पिवळ्या डोक्याच्या त्या इवल्याशा जीवाची त्यावेळची धडपड अगदी पाहण्यासारखी असते. एकाचवेळी तो साधारण तीन ते चार खोपे विणण्यास सुरुवात करतो. त्यातील दोन ते तीन पूर्ण होतात. एखादा अर्धवटच राहतो. कदाचित त्याची कलाकुसर त्याच्याच मनास येत नसावी. त्यावेळी खोपा बांधण्यासाठी जे गवत, पातळ काड्या लागतात त्या आणण्यासाठी तो या झाडावरुन त्या झाडावर न थकता असंख्य फे-या मारतो.

सुगरणीचे हे घरटे साधारणपणे बाभळीच्या झाडावरच असते. त्यातदेखील तो किती डोकं चालवतो बघा हं. बाभळीच्या झाडावर काटे असतात. त्यामुळे साप, सरपटणारे इतर प्राणी तिथे येत नाहीत आणि त्या खोप्यातील अंडी सुरक्षित राहतात. एकदा का खोपा बांधून तयार झाला की मादी सुगरण पक्षी त्याची पाहणी करते. तिला जो खोपा पसंत पडतो त्यात ती अंडी घालते. आणि ती अंडी उबवण्याचे काम तिचेच असते.

पिल्ले बाहेर आली की नर सुगरण त्यांना अन्न आणून भरवतो. उडण्यासारखी मोठी झाली की एक दिवस घरट्याच्या बाहेर आकाशात झेपावतात. पण त्यावेळी आणखी एक खोपा बांधण्यासाठी ती सक्षम झालेली असतात.

सुप्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या अत्यंत सुंदर कवितेत सांगितलंच आहे, अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिन झोका झाडाले टांगला ! याच कवितेत बहिणाबाई पुढे म्हणतात, तिची उलूशीच चोच तेच दात तेच ओठ, तुला देले रे देवान दोन हात दहा बोटं …

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.