Charholi: च-होली, मोशीत कृत्रिम पाणी टंचाई; हंडा मोर्चा काढण्याचा विरोधकांचा इशारा 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या पवना धरणात 100 टक्के पाणीसाठा असतानाही शहराच्या काही भागात नियमित पाणीपुरवठा होत नाही. च-होली, मोशी परिसरातील पाणी पुरवठा गेल्या 15 दिवसांपासून विस्कळीत झाला असून अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. दरम्यान, पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांनी कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केल्याचा आरोप करत त्वरित पाणीपुरवठा सुरळित करावा. अन्यथा हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी दिला आहे. 

प्रभाग क्रमांक तीन च-होली, अक्षयनगर, आदर्शनगर कॉलनी या भागात गेल्या 15 दिवसांपासून पाणीपुरवठा अपुरा व अनियमित होत आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून पुरेसा वेळ देखील पाणीपुरवठा होत नाही. पाणी येण्याची वेळ देखील चुकीची आहे. नागरिक नोकरीवर, कामावर गेल्यानंतर सकाळी साडेअकरा ते अडीच या वेळेत पाणी येते. पाणी कमी दाबाने येत असल्याने शेवटच्या भागापर्यंत पोहचत नाही. तसेच पाण्याची वेळ देखील चुकीची आहे. त्यामुळे पाण्याची वेळ बदलणे गरजेचे आहे.

सकाळी पाच ते नऊ  अशी पाण्याची वेळ केल्यास परीसरातील पाण्याच्या टाक्या भरुन पाणी शेवटच्या भागापर्यंत पोहचेल. तसेच पाण्याचा पुरवठा पूर्ण दाबाने होईल. यावर त्वरीत तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा पाणीपुरवठा विभागाच्या विरोधात हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी दिला आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.