Artists and Politics : कलाकार आणि राजकारण..!!!

एमपीसी न्यूज – हर्षल आल्पे – कलाकार आणि राजकारण (Artists and Politics) खरतर हे दोन्ही विविध आणि वेगवेगळे विषय आहेत. पण, तरी कुठे तरी हे दोन्ही विषय कधी न कधी एकमेकांशी संबंधित असतातच. बघा तुम्ही! कला क्षेत्रात एखादा राजकारणी वृत्तीचा माणूस असू शकतो. तर, दुसरीकडे राजकारणात आतून कलाकार असेलेले बरेच जण आहेत. बरं! कलेत राजकारण असतेच, ते तुम्ही आम्ही किती नाही म्हंटले तरी ते असते. जिथे स्पर्धा येते, जिथे पुढे जायची ईर्ष्या असते, त्या प्रत्येक क्षेत्रात राजकारण आहेच.

मात्र, कधी कधी एखाद्या कलाकाराची इच्छा नसतानाही कलेची सेवा करत करत तो कधी मुरब्बी राजकारणी बनतो, हे त्याचे त्याला सुद्धा कळत नाही. मुळात हुशारी आणि राजकीय चातुर्य यांच्यातील मधली रेष फारच पुसट आहे. त्यात पुन्हा आपल्यातला चांगुलपणा आणि स्वार्थीपणे केलेल्या कलेशी तडजोडी आणि त्यातून नकारात्मक होऊन वाईट विचारसरणीशी चाललेला संग, अन् त्यात मिसळलेला मीपणा, यातही पुसट रेष असते. या रेषा जेव्हा पुसट होत जातात, तेव्हा एका क्षणी आपण कलाकार राहत नाही, आणि आपण माणूस म्हणूनही उरत नाही. फक्त माणसाच्या रुपातले हिंस्त्र जनावर होतो. आणि हिंस्त्र जनावर हे कधीच कुणाचेच नसतात. ज्याने आपल्याला जगवले, त्यालाच खायला आपण सोकावलेले असतो. आणि यात काहीतरी गैर आहे याची जाणीवही राहात नाही. “पापी पेट का सवाल” या बिरुदावालीप्रमाणे पोटासाठी संघर्ष करत आपण राजकारणात ओढले जातो, हेही तितकेच खरे. त्यातून आपले माणूसपण आपण पोटासाठी त्यागतो. आणि इथूनच आपला ऱ्हास सुरु होतो. स्वार्थीपणाच्या वृत्तीने आपल्याला गिळंकृत केलेले असते.

आज नाट्य, चित्रपट आणि इतर बऱ्याच कलांमध्ये असे बरेच लोक शिरलेले आहेत; जे या वृत्तीचे आहेत. स्वार्थासाठी ते कुणालाही खाऊ शकतात. नवीन माणूस म्हणून त्यांना ओळखणेही महाकठीण आहे. कारण इथे सगळेच चांगुलपणाचा बुरखा पांघरून बसलेले आहेत. हा बुरखा कुणाकुणाचा घट्ट असतो, तर कुणाचा अगदीच पातळ असतो.

सर्वात धोकादायक लोक ते; जे सुरुवातीलाच आपल्याशी नाते जोडतात. आणि एकदा का आपण त्यांच्या नात्यात आलो की मग आपण त्यांच्यासाठी सर्वांत सोपी शिकार ठरतो. ते कधीही आपल्याला खाऊ शकतात, अथवा स्वत: शिकार नाही केली तरी दुसऱ्याला ते आपली शिकार करायला देऊ शकतात. आणि परिस्थिती अशी असते, की आपल्या डोळ्यासमोर ते कधीच वाईट राहत नाहीत. पण, आपल्या संपण्याला तेच कारणीभूत असतात. त्यांना त्यांच्या कृत्त्याबद्दल शिक्षा होतेच असेही नाही. न्यायाच्या कक्षेत काही वेळा ते येतच नाहीत.

कलाकाराला (Artists and Politics) राजाश्रय कायमच लागत असतो.  या राजाश्रय मिळण्याच्या ओढाताणीत अनेक कलाकार राजकीय पक्षांचे गुलामी स्वीकारणे पसंद करतात. कधी कळतपणे तर कधी नकळतपणे. ते गुलाम होऊनच जातात. तर, काही कलाकारांना कळतसुद्धा नाही, की ते जगतानाच फक्त नव्हे तर ते गेल्यावरही कुणाच्या तरी वाईट राजकारणाचा बळी होतात. त्यांच्या जाण्यानंतरही घाणेरडे राजकारण सुरूच राहते. तर, काही कलाकार राजकारणाचा बळी ठरून जिवंत असतानाच काळाच्या पडद्याआड जातात. त्यांची नंतर कुणीच आठवण ठेवत नाही.

त्यामुळेच असे वाटत राहाते, की कलाकाराने राजकारणाचा भागही होऊ नये आणि आपल्या कलासक्त जीवनात राजकारणाला थारा असता कामा नये. निस्पृह जीवन जगणे हा जरी आदर्शवाद झाला, तरी तसे जगणे हे नेहमीच सुखावह असते. नाही तर समुद्राच्या असंख्य लाटा किनाऱ्यावर धडकत असतात, येत असतात, जात असतात. आपण फक्त त्या पैकी फक्त एक थेंब असतो. ज्याला अस्तित्व तर नसतेच, पण एका जागी स्थिरही राहाता येत नाही. कारण थांबला तो संपला, मातीत गेला. हाच या राजकारणाचा नंतरचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो.

राजकीय मत असणे वेगळे, प्रत्यक्ष त्यात उतरणे वेगळे आणि कुणी तरी सांगितलेली, लिहिलेली गोष्ट लोकांसमोर पुढे मांडणे आणि त्याबद्दल शिक्षा भोगणे, सगळ्यात शेवटी उध्वस्त झालेले आयुष्य सावरायला कुणीच येत नाही. विरोधक तर तिथे नसतातच, पण जे सुरुवातीला आपल्या बाजूने असतात, त्यांचा स्वार्थ पूर्ण झाल्यावर तर तेही बघायला जात नाहीत. आपल्या बाजूने बोलणारी व्यक्ती आज आहे कि नाही हे सुद्धा त्यांना माहीत नसते.

राजकारणात (Artists and Politics) सगळे तात्पुरते असल्याने, तुमच्याकडून आज काम झाले की तुम्ही कोण? आम्ही कोण? इतिहासात असे अनेक दाखले तुम्हाला देता येतील; जे कालांतराने विस्मृतीत गेले आणि समाजातले फक्त बोटांवर मोजण्याइतके लोक फक्त त्यांचा स्मृतिदिन आठवत बसतात आणि डोळे ओले करतात.

न्याय मात्र कधीच आपल्यासाठी कागदांच्या जंजाळात बेपत्ता घोषित झालेला असतो. तो होऊ नये असे वाटत असेल तर प्रवाहाच्या दिशेने तलवार घेऊन जाताना एकदा विचार करायलाच हवा, कलाकाराने..सगळ्यांनीच..!!!

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.