Pune News: पुणे पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड रिंगणात

एमपीसी न्यूज – पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या पाच जिल्ह्याचा समावेश असलेल्या  विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अरुण लाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपचे सांगलीतील संग्राम देशमुख आणि महाविकास आघाडीचे
अरुण लाड यांच्यात सरळ लढत होणार आहे.

कोरोनामुळे लांबणीवर पडलेली पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक नुकतीच जाहीर झाली आहे. गुरुवारी (दि. 12) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.  1 डिसेंबर रोजी मतदान तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सलग दोनवेळा पुणे पदवीधरचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे यावेळीही मतदारसंघ ताब्यात ठेवण्यासाठी भाजपने तयारी सुरु केली आहे. तर, राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या महाविकासआघाडीने मतदारसंघात खेचून आणण्यासाठी जोर लावला आहे.
भाजपने सांगलीतील संग्राम देशमुख यांना तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही सांगलीतील अरुण लाड  यांना उमेदवारी दिली आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, विधानपरिषद निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातून औरंगाबाद विभागात राष्ट्रवादीचे श्री. सतीश चव्हाण तर पुणे विभागातून राष्ट्रवादीचे श्री. अरुण लाड यांना महाविकास आघाडीतर्फे उमेदवार म्हणून घोषित करण्यात येत आहे. दोन्ही उमेदवार या निवडणूकीत विजयी होतील, याचा आम्हाला विश्वास आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.