Pune News : आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे भारतरत्न पं भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘अभिवादन’चे आयोजन

एमपीसी न्यूज – सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे आयोजक असलेल्या आणि भारतरत्न पं भीमसेन जोशी यांनी स्थापन केलेल्या आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधत ‘अभिवादन’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवाजीनगर येथील राहुल चित्रपटगृहाच्या शेजारी असलेल्या सवाई गंधर्व स्मारक या ठिकाणी 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यान सायं 4.30 वाजता सदर कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून प्रथम येणा-यास प्राधान्य या तत्त्वावर त्यासाठी प्रवेश देण्यात येईल. स्थानिक प्रशासनाने घालून दिलेल्या कोविड संदर्भातील सर्व नियमांचे पालन या दरम्यान करण्यात येणार आहे.

किराणा घराण्याचे कलाकार विशेषत: भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे शिष्य आणि काही तरुण आश्वासक कलाकारांचे कलाविष्कार हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असेल, अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली.

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात एस आकाश (बासरी) आणि यज्ञेश रायकर (व्हायोलिन) यांच्या सहवादनाने होईल. एस आकाश यांनी पं. व्यंकटेश गोडखिंडी यांच्याकडे बासरी वादनाचे सुरुवातीचे शिक्षण घेतले असून सध्या पं रोणू मुजुमदार व पं जयतीर्थ मेवुंडी यांकडून ते बासरी व शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेत आहेत.

यज्ञेश हे प्रसिद्ध व्हायोलिन वादक पं मिलिद रायकर यांचे सुपुत्र व शिष्य असून वयाच्या 4 थ्या वर्षी त्यांनी कार्यक्रमांमध्ये पहिल्यांदा एकल वादन केले होते. यानंतर रोंकिनी गुप्ता यांचे गायन होईल. रोंकिनी या प्रशिक्षित शास्त्रीय गायिका असून गंधर्व महाविद्यालयामधून त्यांनी संगीत विशारद पदवी पूर्ण केली आहे.

ग्वाल्हेर घराण्याचे चंद्रकांत आपटे यांकडे त्यांचे सुरुवातीचे शिक्षण झाले असून उस्ताद दिलशाद खान, पं समरेश चौधरी आणि दिवंगत उस्ताद अब्दुल रशीद खाँ साहेब यांचेही मार्गदर्शन त्यांनी लाभले आहे. पहिल्या दिवसाचा समारोप भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ शिष्य पं उपेंद्र भट यांच्या गायनाने होईल.

कार्यक्रमाच्या दुस-या दिवसाची (5 फेब्रुवारी) सुरुवात आश्वासक तरुण वादक असलेले अभिषेक बोरकर यांच्या एकल सरोद वादनाने होईल. अभिषेक हे मेहर सेनिया घराण्याचे प्रसिद्ध सरोद वादक पं शेखर बोरकर यांचे सुपुत्र व शिष्य आहेत. यानंतर स्निती मिश्रा यांचे गायन होईल.

स्निती यांनी ग्वाल्हेर घराण्याचे डॉ. दामोदर होता यांचे शिष्य गुरू रघुनाथ साहू यांकडून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे. याबरोबरच मुंबईतील गंधर्व संगीत विद्यापीठामधून त्या संगीत विशारद आहेत. कार्यक्रमाच्या दुस-या दिवसाचा समारोप भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे सुपुत्र व शिष्य श्रीनिवास जोशी यांच्या गायनाने होईल.

अभिवादन या सांगीतिक कार्यक्रमाच्या तिस-या व शेवटच्या दिवसाची (6 फेब्रुवारी) सुरुवात ही किराणा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक आणि भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे शिष्य आनंद भाटे यांच्या गायनाने होईल. तर नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारने पद्मविभूषण या देशातील दुस-या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केलेल्या किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे गायन होईल. भारतरत्न पं भीमसेन जोशी यांवरील एका विशेष चित्रफितीच्या सादरीकरणाने कार्यक्रमाचा शेवट होईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.