Pune News : पुणे महापालिकेत एकही प्रश्न न विचारणारे तब्बल 71 नगरसेवक 

एमपीसी न्यूज : शहरातील विविध विषयांवर महापालिकेतील नगरसेवक लेखी स्वरुपात प्रशासनाला प्रश्न विचारून माहिती घेतात. या चार वर्षात काँग्रेसचे नगरसेवक व गटनेते आबा बागुल यांनी सर्वाधीक 109 लेखी प्रश्न विचारले असून सभागृहातील तब्बत 71 नगरसेवकांनी निवडून आल्यापासून एकही प्रश्न विचारलेला नाही. लेखी प्रश्न विचारण्यात शिवसेना नगरसेवक अवल्लस्थानी असून त्यांची टक्केवारी 80 आहे. त्यानंतर काँग्रेस 77.78 टक्के, राष्ट्रवादी 53.85, भाजप 53.61, मनेसे व अपक्षांती टक्केवारी 50 इतकी आहे.

महापालिकेतील नगरसेवकांनी 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2021 या चार वर्षाच्या कालावधीत वॉर्डस्तरीय निधीचा वापर कसा केला, नगरसेवकांची सभागृहातील उपस्थिती किती, कोणत्या पक्षाच्या नगरसेवकांनी सर्वाधीक लेखी प्रश्न विचारले आहेत, विविध समित्यांवर नगरसेवकांना मिळालेली संधी, आणि गुन्हे दाखल असलेल्या नगरसेवकांची माहिती परिवर्तन संस्थेने माहिती अधिकारात मिळवली आहे.

यामध्ये नगरसेवकांनी आपला सर्वाधीक निधी ड्रेनेज व पावसाळी लाईन टाकणे व दुरुस्तीसाठी वापरला असून तो 15 कोटी 31 लाख 42 हजार 413 रुपये आहे. त्यानंतर नगरसेवकांनी ज्यूट व कापडी पिशव्या वाटपावर 11 कोटी 57 लाख 30 हजार 999 रुपये खर्च केले आहे. याशिवाय आपत्ती मदतकार्य व कोविड विषयक कामासाठी 6 कोटी 59 लाख 51 हजार 836 रुपये, सफाई व राडोरोडा उचलण्यासाठी 5 कोटी 71 लाख 54 हजार 799 रुपये, पथदिवे  व विद्युत विषयक कामांसाठी 5 कोटी 52 लाख 31 हजार 087 रुपये खर्च केले आहेत.

आजवर सर्वाधिक भ्रष्टाचार ज्या ड्रेनेज विषयक कामांवध्ये व कापडी पिशव्या वाटपामध्ये झाला आहे, नेमके त्याच कामांसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नगरसेवकांनी प्राधान्य दिल्याचे समोर आले आहे. कोविडचा काळ सोडला तर आरोग्य विषयक कामासाठी नगरसेवकांनी काहीच खर्च केला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये परिवर्तन संस्थेचे इंद्रनील सदलगे, भक्ती भावे, भरत बनाटे, ओशिन शर्मा व प्रणव जाधव यांनी वरील माहिती दिली.

मनसेच्या नगरसेवकांची सर्वाधिक उपस्थिती 

महापालिकेच्या सभागृहात मनसेच्या दोन नगरसेवकांची सर्वाधिक म्हणजे 83.50 टक्के उपस्थिती आहे. त्या पाठोपाठ सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांची 80.04 टक्के, काँग्रेस 77.11, राष्ट्रवादी काँग्रेस 71.72, शिवसेना 71.50 टक्के आणि अपक्ष 59.25 टक्के अशी उपस्थिती आहे. यामध्ये भाजपच्या नगरसेवका गायत्री खडसे यांची सर्वाधीक 95 टक्के उपस्थिती असून भाजप पुरस्कृत अपक्ष नगरसेविका रेश्मा भोसले यांची सर्वात कमी 30 टक्के उपस्थिती आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.