Pune News : …अन् चंद्रकांतदादांनी आशा बुचकेंना व्यासपीठावर बोलावून घेतलं

एमपीसी न्यूज – पुण्यात आज सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचा भूमिपूजन सोहळा सुरू आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरिश बापट, नीलम गो-हे यांच्यासह पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित आहेत.

याच कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या जुन्नर तालुक्यातील आशा बुचके उपस्थित होत्या. परंतु त्यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले नव्हते. काही वेळानंतर व्यासपीठावर आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नजरेस ही बाब आली आणि त्यांनी निवेदन करणाऱ्या सुधीर गाडगीळ यांना आशा बुचके यांना व्यासपीठावर बोलावून घेण्यास सांगितले आणि आशा बुचके व्यासपीठावर येऊन स्थानापन्न झाल्या. आशा बुचके यांनी 19 ऑगस्ट रोजी भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

आशा बुचके या पुणे जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या माजी गटनेत्या आहेत. आक्रमक नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेकडून जुन्नर विधानसभेची निवडणूकही लढवली होती. मात्र केवळ पाच हजार मतांच्या फरकाने त्यांना मनसेच्या शरद सोनावणेंकडून पराभव स्वीकारावा लागला होता. 2019 मध्ये मनसेचे तत्कालीन आमदार शरद सोनवणे शिवसेनेत आले आणि त्यांना विधानसभेचे तिकीट मिळाले. त्यानंतर बुचकेंनी अपक्ष निवडणूक लढवत तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.