Ashadhi Ekadashi 2020: देशाची कोरोनाच्या संकटातून सुटका कर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं विठ्ठलाला साकडं

Ashadhi Ekadashi 2020: Save the country from the Corona Crisis, Chief Minister Uddhav Thackeray prays to Vitthal

एमपीसी न्यूज- आषाढी एकादशीनिमित्त आज (दि.01) पहाटे तीन वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा करण्यात आली. विणेकरी विठ्ठल बढे आणि अनुसया बढे (रा. चिंचपूर. जि. अहमदनगर) या वारकरी दांपत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान मिळाला. महाराष्ट्राची, देशाची कोरोनाच्या संकटातून सुटका कर, असे साकडे मुख्यमंत्री ठाकरे यांनी विठ्ठलाला घातले.

दरम्यान, सावळ्या विठुरायाच्या ओढीने आषाढी यात्रेच्या अनुपम्य सोहळ्यात सहभागी होण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपूर येथे दाखल होत असतात. शेकडो वर्षांच्या परंपरेत या वर्षी पहिल्यांदाच खंड पडला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी यात्रेचा सोहळा वारकऱ्यांविना पार पडत आहे.

कोरोनामुळे यंदा मानाच्या नऊ पालख्या आणि प्रत्येक पालखीसोबत फक्त 20 वारकऱ्यांना प्रवेश देण्यात आला होता. यावेळी विठ्ठल मंदिराचा गाभारा रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आला होता. विठ्ठल मूर्तीला जलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर दुग्धाभिषेक व पुन्हा जलाभिषेक करण्यात आला.

चंदनाचा टिळा, बुक्का लावून मूर्तीला सुंदर पोशाखांनी सजवण्यात आले. टिळ्यावर तुळशीचे पान लावण्यात आले. तुळशीसह पुष्पहार घालण्यात आला. यानंतर पंचारती झाली. त्यानंतर आरतीने महापूजेची सांगता झाली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पंढरपूर नगरपालिकेला यात्रा अनुदान म्हणून पाच कोटी रुपयांचा धनादेश नगराध्यक्षा साधना भोसले यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी आदित्य ठाकरेही उपस्थित होते.

श्री विठ्ठलाला गुलाबी रंगाचा अंगरखा, जांभळ्या रंगाचा शेला व त्याच रंगाचे सोवळे नेसवण्यात आले. विठ्ठल पूजेनंतर रुक्मिणीमातेची महापूजा झाली. मातेला भरजरी शालू नेसवण्यात आला. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानाच्या वारकऱ्यांसोबत संवाद साधला. त्यावेळी त्यांचे पुत्र व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेही उपस्थित होते.

विणेकरी विठ्ठल बडे मानाचे वारकरी

यंदा आषाढीला मुख्यमंत्र्यांसोबत ‘मानाचा वारकरी’ म्हणून मंदिरातील विणेकरी विठ्ठल बडे यांना चिठ्ठीने मिळाला. विठ्ठल बडे हे मंदिराच्या सभामंडपात विणेकरी आहेत. लॉकडाऊनमध्येही त्यांनी सेवा बजावली. यंदा मानाचा वारकरी निवडण्यासाठी मंदिरातील सहा विणेकऱ्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या सोडत पध्दतीने निवडल्या. त्यात 84 वर्षीय विठ्ठल बडे यांची निवड झाली. यंदा दर्शन रांग नाही. त्यामुळे मानाचा वारकरी निवडणे हे जिकिरीचे होते.

याप्रसंगी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, उपायुक्त राजेंद्र भोसले, विशेष पोलीस महानिरीक्षक (कोल्हापूर) डॉ. सुहास वारके, मिलिंद नार्वेकर, तेजस ठाकरे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचीही उपस्थिती होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.