Chinchwad News : पोस्ट मार्टम नोटस आणि इतर कागदपत्रे देण्यासाठी एएसआयने मागितली 50 हजारांची लाच

एमपीसी न्यूज –  एका व्यक्तीच्या भावाच्या पत्नीचे पोस्ट मार्टम नोटस आणि इतर कागदपत्रे देण्यासाठी चिंचवड पोलीस ठाण्यातील एका एएसआयने 50 हजारांची लाच मागितली. त्यातील पाच हजार रुपये अॅडव्हान्स स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एएसआयला रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (दि. 25) वाल्हेकरवाडी पोलीस चौकीत करण्यात आली.

विठ्ठल अंबाजी शिंगे (वय 57) असे लाच घेतलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे (एएसआय चे) नाव आहे. याप्रकरणी 36 वर्षीय व्यक्तीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या भावाविरुद्ध चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज आला आहे. तसेच तक्रारदार यांच्या भावाच्या पत्नीचे पोस्ट मार्टम नोटस आणि इतर कागदपत्रे तक्रारदार यांना हवी होती. त्यासाठी त्यांनी पोलिसांना विनंती केली. मात्र आरोपी एएसआयने तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपये लाचेची मागणी केली.

तक्रारदार यांनी तडजोड करून 25 हजार रुपये देण्याचे ठरवले. दरम्यान तक्रारदार यांनी एसीबीकडे याप्रकरणी तक्रार केली. तडजोड केलेल्या लाच रकमेतील पाच हजार रुपये अॅडव्हान्स म्हणून बुधवारी देण्याचे ठरले. वाल्हेकरवाडी पोलीस चौकीत ही लाच देण्यात येणार असल्याने एसीबीने पोलीस चौकीत सापळा लावला.

तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपये अॅडव्हान्स लाच घेताना आरोपी एएसआय एसीबीच्या जाळ्यात रंगेहाथ अडकला. एसीबी पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

चिंचवडचे पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्षात

दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी चिंचवड पोलीस ठाण्यात एक खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या प्रकरणी चिंचवडचे पोलीस निरीक्षक यांना नियंत्रण कक्षात अॅटॅच करण्यात आले आहे. तर एका उपनिरीक्षकाला देखील चिंचवड मधून हलविण्यात आले आहे. तसेच एका पोलीस कर्मचा-याला निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी बुधवारी (दि. 25) रात्री दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.