Nigdi News : पाण्याच्या बॅरलवर लघुशंका करणाऱ्यांना जाब विचारल्याने कोयत्याने वार; खुनी हल्ला प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज – पाण्याच्या बॅरलवर लघुशंका करणाऱ्या तिघांना एका व्यक्तीने जाब विचारला. त्या कारणावरून जाब विचारणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यात कोयत्याने वार करत, वीट व सिमेंटच्या दगडाने मारून ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 23) रात्री ओटास्कीम निगडी येथे घडली.

जितेंद्र जाधव (वय 20), सातलींग सांगोळगी (वय 19, दोघे रा. ओटास्कीम, निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांसह एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अविनाश विठ्ठल लांडगे (वय 38, रा. ओटास्कीम, निगडी) यांनी शुक्रवारी (दि. 24) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास आरोपी हे फिर्यादी यांच्या घराच्या मागे ठेवलेल्या पाण्याच्या बॅरलवर लघुशंका करीत होते. हा प्रकार फिर्यादी यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरोपींना याबाबत जाब विचारला. त्यावरून आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले. त्यानंतर वीट आणि सिमेंटच्या दगडाने मारून फिर्यादी यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला.

खुनी हल्ला केल्यानंतर आरोपींनी पिस्टल दाखवून दहशत निर्माण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलिसांनी आरोपी जितेंद्र आणि सातलींग या दोघांना अटक केली. तसेच अल्पवयीन मुलाला नोटीस देऊन सोडले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

याच परिसरात सोमवारी (दि. 20) मध्यरात्री पाच जणांना एका व्यक्तीचा किरकोळ कारणावरून खून केला आहे. आजवर ओटास्कीम परिसरात खुनाचे अर्धशतक झाले आहे. तर 65 पेक्षा अधिक खुनी हल्ले झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.